Tuesday, August 11, 2026
Homeफलटणकोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराची उत्साहात सांगता

कोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराची उत्साहात सांगता

कोळकी बुद्ध विहार येथे श्रामणेर शिबिराची उत्साहात सांगता


फलटण : कोळकी बुद्ध विहार येथे भंते धम्मानंद बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली दि. २८ एप्रिल २०२६ ते ७ मे २०२६ या कालावधीत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या श्रामणेर शिबिराची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. दहा दिवस चाललेल्या या शिबिरात धम्म, शिस्त, करुणा, मैत्री, समता आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रशिक्षण देण्यात आले.या शिबिरामध्ये 9 उपासकांनी श्रामणेर दीक्षा घेतली होती. यामध्ये माळशिरस तालुक्यातील मोरोची गावच्या 3 युवकांनी व उर्वरित सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा तालुक्यातील 6 युवकांनी श्रामणेर दिक्षा घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. भीमराव लोंढे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे संघटक, केंद्रीय शिक्षक आयु. दादासाहेब भोसले यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी सातारा जिल्हा पूर्व चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, संघटक अर्जुन ननावरे, सातारा जिल्हा पूर्वच्या महिला अध्यक्ष आयुनि सुजाता गायकवाड, आयु. शिवाजी सावंत, तालुका संघटक आयु. श्रीनिवास धाईंजे, आयु. श्रीमंतराव घोरपडे, आयु. अरुण गायकवाड, तालुका सरचिटणीस आयु. केशव ठोंबरे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु. दादा कांबळे, माजी सरचिटणीस भिकू भोसले, तालुक्याचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. अरविंद निकाळजे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आयुनि कांताताई काकडे, प्रचार व पर्यटन विभाग सचिव विजय लोंढे, संस्कार सचिव धीरज मोरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना आयु. दादासाहेब भोसले म्हणाले की, “फलटण तालुक्यात ज्या गावांमध्ये अजून भारतीय बौद्ध महासभा पोहोचलेली नाही, त्या प्रत्येक गावात आपण धम्माचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. कार्यकर्त्यांचे प्रबोधन आणि संघटन मजबूत होणे काळाची गरज आहे. प्रत्येक गावात शाखा आणि समता सैनिक तयार झाले तरच समाज सशक्त बनेल. धम्म म्हणजे समतेचा आणि न्यायाचा मार्ग आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, संस्कार आणि संघटन पोहोचले तरच परिवर्तन घडू शकते. त्यामुळे यापुढील काळात तालुका शाखेने भारतीय बौद्ध महासभेने दिलेल्या 24 शिबिरांचं आयोजन करून धम्माचा विचार जनसामान्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा.

पुढे ते म्हणाले, ”भगवान बुद्धांनी दिलेला ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हीच खरी धम्मसेवा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगावी जाऊन बाल संस्कार शिबिरे घेऊन नवीन पिढीत नैतिकता, शिस्त आणि मानवता रुजवली पाहिजे. वर्षावासाच्या निमित्ताने ज्या ज्या गावांमध्ये धम्म पोहोचला नाही त्या गावांमध्ये पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्माचा विचार घेऊन जाण्याची जबाबदारी तालुका शाखेने पार पाडावी.”

केंद्रीय शिक्षिका आयुनि सुजाता गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “धम्म हा केवळ पूजा-अर्चेचा विषय नसून तो जीवन जगण्याची वैज्ञानिक आणि मानवतावादी पद्धत आहे. महिलांनी आणि तरुणांनी समाज परिवर्तनासाठी पुढे येऊन करुणा, मैत्री आणि समतेचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत.
यावेळी सुजाता गायकवाड यांनी धम्मपदातील ओळींचा उल्लेख करून मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,
मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।
मनसा चे पदुट्ठेन, भासति वा करोति वा॥
ततो नं दुक्खमन्वेति, चक्कं व वहतो पदं॥

मराठी अर्थ : मन हे सर्व गोष्टींचे पूर्वगामी आहे. मनच श्रेष्ठ आहे आणि सर्व काही मनातून निर्माण होते.
जर एखादी व्यक्ती दूषित मनाने बोलते किंवा कृती करते, तर दुःख तिच्या मागे तसेच लागते जसे बैलगाडीचे चाक बैलाच्या पावलामागे फिरते.”

मनोपुब्बङ्गमा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया।
मनसा चे पसन्नेन, भासति वा करोति वा॥
ततो नं सुखमन्वेति, छायेव अनपायिनी॥

अर्थ : मन हे सर्व गोष्टींचे पूर्वगामी आहे. मनच श्रेष्ठ आहे आणि सर्व काही मनातून निर्माण होते.
जर एखादी व्यक्ती प्रसन्न आणि शुद्ध मनाने बोलते किंवा कृती करते, तर सुख तिच्या मागे कधीही न सोडणाऱ्या सावलीप्रमाणे सतत राहते.

केंद्रीय शिक्षक आयु. श्रीमंतराव घोरपडे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भगवान बुद्धांनी अंधश्रद्धेपेक्षा प्रज्ञेला महत्त्व दिले. म्हणूनच प्रत्येकाने विचारपूर्वक जीवन जगून समाजात बंधुभाव निर्माण करावा. शिबिरात शिकलेले धम्माचे संस्कार आपल्या गावात नेऊन प्रत्येक गावात शाखा आणि सैनिक निर्माण करण्याचे कार्य करावे.त्यासोबतच्या हे शिबिर यशस्वी होण्यासाठी तालुका कार्यकारिणीने खूप मेहनत घेतली त्यांच्या कार्याला ही धन्यवाद व पुढील धम्मकार्यासाठी शुभेच्छा.”

आयु.शिवाजी सावंत म्हणाले, भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था असून सर्व श्रामणेरांनी येणाऱ्या काळामध्ये धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सक्रिय राहिला पाहिजे. या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला जे धम्माचे विचार मिळाले आहेत ते विचार आपल्या घरापासूनच रुजवण्यास सुरुवात करा. आपण सर्वांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या धम्म कार्याला गती देण्यासाठी तालुका शाखे सोबत काम करायला तयार व्हावे. धम्म म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग असून आपण सर्वांनी बौद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे आपलं आचरण करावे. “

यावेळी बोलताना फलटण तालुक्याचे संघटक श्रीनिवास धाईंजे म्हणाले, ” शिबिर यशस्वी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. संख्या जरी कमी असली तरी चांगले शिबीर राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक अडचणी आल्या पण आम्ही सर्वांनी एकजुटीने शिबिर पार पाडण्यासाठी प्रयत्न केला.या शिबिरामध्ये क्वांटिटी कमी असली तरी कॉलिटी चांगली ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचलो लोकांनी आश्वासने ही दिली पण लोक फिरकले नाहीत.

अध्यक्षीय समारोप करताना आयु. भीमराव लोंढे म्हणाले की, “शिबिर यशस्वी होण्याचे श्रेय कोण्या एका व्यक्तीचे नसून सर्व कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे आहे. या शिबिराच्या माध्यमातून मी भिक्षु संघाचे संघनायक भंते धम्मानंद बोधी, केंद्रीय शिक्षक आयु.श्रीमंत घोरपडे, आयु. नानासो मोहिते, आयु. अरुण गायकवाड, आयु. दादासाहेब भोसले, जिल्ह्याचे व तालुक्याचे सर्व पदाधिकारी, ज्यांनी भिक्षु संघासाठी नाष्टा, भोजनदान व फलाहार दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचलो. प्रतिसाद जरी कमी आला तरी आम्ही या शिबिरामध्ये त्याची गुणवत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला. अनेक अडचणी आल्या. अनेकांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे अगदी कमी कालावधीत आम्ही हे शिबिर यशस्वी करू शकलो.”

यावेळी भंते धम्मानंद बोधी यांनी श्रामणेर भिक्षूंचे बौद्ध धम्माच्या संस्कार विधीप्रमाणे बौद्ध परंपरेमध्ये श्रामणेर (सामणेर) भिक्षूंनी काही कालावधी नंतर भिक्षूजीवन सोडून पुन्हा गृहस्थ जीवन स्वीकारायचे असल्यास त्यासाठी “चिवर उतरविणे” किंवा “संघातून निवृत्ती” असा संस्कार केला.

पाली विनयात याला सामान्यतः “सिक्खा पच्चक्खान” (शिक्षेचा त्याग) किंवा “पब्बज्जा परित्याग” असे म्हटले जाते. या वेळी श्रामणेर भिक्षुनी बुद्ध, धम्म आणि संघाला वंदन करून आपण पूर्वीचे जीवन स्वीकारत असल्याची घोषणा केली.भंते धम्मानंद बोधी यांनी चिवर उतरवले.यावेळी धम्मानंद बोधी यांच्या हस्ते श्रामणेर भिक्षूंना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. दहा दिवसांपासून श्रामणेर भिक्षुंनी ग्रहण केलेला धम्माचा उपदेश व त्यांच्यात झालेला बदल व येणाऱ्या काळात करावयाच्या कामाविषयी आपली मनोगते व्यक्त करून धम्माचा प्रचार व प्रसार करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सरचिटणीस आयु. केशव ठोंबरे यांनी केले. शिबिराच्या सांगता समारंभात उपस्थितांनी बुद्ध, धम्म आणि संघाला वंदन करून सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments