Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रबॅलेट पेपरवर मतदानासाठी ग्रामस्थांचा निर्धार; प्रशासनाचा विरोध कायम

बॅलेट पेपरवर मतदानासाठी ग्रामस्थांचा निर्धार; प्रशासनाचा विरोध कायम

मारकडवाडी, माळशिरस (सोलापूर): माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतदान प्रक्रियेवरून वाद चिघळला आहे. ईव्हीएम मशीनवरील शंका उपस्थित करून ग्रामस्थांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीला नकार दिल्यानंतरही ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ३) मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवरच करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय, १८ ते २० ग्रामस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. आमदार उत्तम जानकर यांच्या गटातील ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत बॅलेटवरच मतदान घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रशासनाचा स्पष्ट नकार

निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी ग्रामस्थांची मागणी फेटाळली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि मतदान व मतमोजणी दरम्यान कोणताही आक्षेप नोंदवला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बॅलेट पेपरद्वारे होणारी ही प्रक्रिया कायदेशीर नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ग्रामस्थांची भूमिका आणि तयारी

ग्रामस्थांनी मतदान प्रक्रिया माध्यमांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्याचे ठरवले आहे. तीन मतदान केंद्रांसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून प्रशासनाच्या विरोधानंतरही किती ग्रामस्थ मतदान करतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात

या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या या कृतीवर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments