Sunday, September 13, 2026
Homeसातारामहाराष्ट्र गौरव यात्रेचे फलटणमध्ये जल्लोषात स्वागत; ना. मकरंद पाटील आणि आ. सचिन...

महाराष्ट्र गौरव यात्रेचे फलटणमध्ये जल्लोषात स्वागत; ना. मकरंद पाटील आणि आ. सचिन पाटील यांची उपस्थिती

फलटण : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या जडणघडणीतील मोलाचा वाटा उचललेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘महाराष्ट्र गौरव महोत्सव’ व ‘गौरव यात्रा’चे आयोजन केले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ एप्रिल ते ४ मे दरम्यान ही भव्य गौरव यात्रा होत आहे.

फलटणमध्ये या गौरव यात्रेचे जिंती नाका येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, महानंदचे माजी व्हा. चेअरमन डी. के. पवार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, शहराध्यक्ष राहुल निंबाळकर, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, अशोकशेठ सस्ते, बाळासाहेब खलाटे, बाबा भोई यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गौरव यात्रेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील सहा महसूल विभागांतून कलश यात्रा काढण्यात येत आहे. या कलशांमध्ये छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची माती आणि राज्य समृद्ध करणाऱ्या नद्यांचे पाणी संकलित करण्यात येत आहे. मुंबईत सर्व गौरव रथांचे एकत्रित आगमन होणार असून, त्यानंतर भव्य समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यात्रेच्या दरम्यान कराड येथील प्रीती संगमाजवळ स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करून पुढील प्रवासास सुरुवात झाली. सातारा, वाई, नायगाव (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मभूमी), शिरवळ (सुभान मंगल किल्ला), लोणंद (वारी मुक्कामस्थळ), आणि ऐतिहासिक फलटण (छ. सईबाई व छ. संभाजी महाराज यांचे माहेर व आजोळ) येथे गौरव यात्रेचे जंगी स्वागत झाले.

या गौरव यात्रेत सहभागी होता आल्याने आपण स्वतःला भाग्यवान समजतो, असे आमदार सचिन पाटील यांनी नमूद केले. यात्रेच्या स्वागतानंतर स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

फलटणमध्ये झालेल्या या स्वागत सोहळ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे स्मरण व नव्या पिढीसमोर आदर्श उभा करण्याचा निर्धार या यात्रेतून दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments