Saturday, August 22, 2026
Homeसाताराफलटणमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण अद्यापही अधांतरी; अनुयायांमध्ये तीव्र नाराजी

फलटणमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण अद्यापही अधांतरी; अनुयायांमध्ये तीव्र नाराजी

फलटण :- फलटण शहरात 23 एप्रिल 1939 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक भेट दिली होती. त्यांनी येथे घेतलेल्या सभेत सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या विचारांची मशाल पेटवली होती. याच दिवशी तत्कालीन संस्थांनाधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी बाबासाहेबांना राजवाड्यात चहासाठी आमंत्रित केले होते. आजही हे शहर त्या पावन क्षणांचा साक्षीदार आहे. मात्र, या शहरात उभ्या असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे आणि परिसराचे सुशोभीकरण अजूनही केवळ आश्वासनापुरतेच राहिले आहे, हे खेदजनक वास्तव आहे.

1969 साली आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते आणि इंदुमती मोहन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आंबेडकर पुतळ्याचे भव्य अनावरण झाले होते. त्यानंतर तब्बल 56 वर्षे उलटून गेली, पण सुशोभीकरणाचे काम सुरू झालेले नाही. नुकतीच बाबासाहेबांची 134 वी जयंती संपूर्ण देशभर जल्लोषात साजरी झाली, त्याच पार्श्वभूमीवर पुतळ्याच्या दुर्लक्षित अवस्थेची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

पूर्वी अनेक वेळा राजकीय नेत्यांनी पत्रकार परिषदांमधून आणि जाहीर सभांमधून कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचा दावा केला होता. मात्र तो निधी खरोखर मंजूर झाला होता का? की निवडणुकांच्या तोंडावर आंबेडकरी अनुयायांची मते मिळवण्यासाठी राजकीय थापा मारण्यात आल्या? या प्रश्नांनी आता अनुयायांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण केला आहे.

एका बाजूला तेलंगणामध्ये बाबासाहेबांचा 175 फूट उंच पुतळा दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आला, तर दुसरीकडे फलटणमध्ये पुतळ्याच्या आसपासच्या भागाचे साधे सौंदर्यीकरणही रखडलेले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर केवळ राजकारण होत आहे का? डॉ. आंबेडकरांच्या नावावर राजकीय भांडवल तर उभं केलं जात नाही ना? अशी रास्त शंका अनुयायांमध्ये निर्माण झाली आहे.

या ऐतिहासिक स्मृतीस्थळाच्या नाममात्र सुशोभीकरणावरून, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि बाबासाहेबांच्या कार्याशी केलेली ही बेइमानी उघड होऊ लागली आहे. आता प्रश्न हाच आहे — पुतळ्याचे सौंदर्यीकरण कधी होणार? की पुन्हा एकदा आश्वासनांचे नवे खेळ रंगणार?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments