Friday, August 21, 2026
Homeफलटणशिष्यवृत्तीधारक तनिष्का जगतापचा भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) यांचेकडून गौरव

शिष्यवृत्तीधारक तनिष्का जगतापचा भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) यांचेकडून गौरव

शिष्यवृत्तीधारक तनिष्का जगतापचा भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) यांचेकडून गौरव

फलटण, प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी आयु. बाबासाहेब दिलीप जगताप यांची कन्या तनिष्का पारिजातका बाबासाहेब जगताप हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरावरील शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळविला. विशेष म्हणजे तिने हे यश खुल्या प्रवर्गातून मिळविल्याने तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

तनिष्काच्या या यशाबद्दल भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कार्यकारिणी सदस्य तसेच बीबीएम फॅमिली (BBM Family) यांच्या संयुक्त विद्यमाने तिचा शालेय साहित्य, पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे यांनी तनिष्काच्या परिश्रमांचे कौतुक करत तिने भविष्यात प्रथम श्रेणीची प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

माजी संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड यांनी आजच्या स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करत तनिष्कासाठी योग्य मार्गदर्शन व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची गरज अधोरेखित केली. तिच्या यशामागे आई-वडिलांचेही मोठे योगदान असल्याचे नमूद करून भविष्यातील प्रत्येक टप्प्यावर बीबीएम फॅमिली तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समाजप्रबोधनकार महावीर भालेराव यांनी तनिष्काने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत प्रवेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ती प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर पुन्हा मोठ्या स्वरूपात तिचा सत्कार करण्याची संधी मिळावी, अशी शुभेच्छाही त्यांनी दिली.

भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी आपल्या मनोगतात, “जगताप परिवाराच्या अंगणात पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला नसून दोन तेजस्वी हिरे जन्माला आले आहेत. तनिष्का ही बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असल्यामुळेच तिने हे यश संपादन केले आहे. स्पर्धेच्या युगातील आव्हानांना जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने सामोरे जात तिने आणखी मोठी यशाची शिखरे गाठावीत,” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.

तनिष्काची आई पारिजातका जगताप यांनी लेकीच्या यशामागे सर्वांचे मार्गदर्शन व आशीर्वाद असल्याचे सांगत उपस्थितांचे आभार मानले. तर वडील आयु. बाबासाहेब जगताप यांनी दोन्ही कन्यांनी जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या बळावर भविष्यात अधिक मोठे यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सत्काराला उत्तर देताना तनिष्का हीने आपण सर्वांनी माझ्याकडून केलेल्या अपेक्षांची मी आठवण ठेवून जरूर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असे सांगितले. तसेच आपल्या सर्वांचे असेच आशीर्वाद व मार्गदर्शन मिळावे अशीही अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व बुद्धपूजेचे संचालन माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. रामचंद्र मोरे यांनी केले. त्यांनी वंदना सूत्रपठन करून दोन्ही कन्यांना आशीर्वाद दिले. उपस्थितांचे आभार माजी संघटक आनंद जगताप यांनी मानले.

भारतीय बौद्ध महासभेच्या BSI मिशन–२५ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंचवीस कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments