Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: जेवण न पोहोचल्याने उपाशी राहिले होते बिग बी,...

माझ्या हिश्श्याचे किस्से: जेवण न पोहोचल्याने उपाशी राहिले होते बिग बी, ‘चेहरे’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी हॉटेलमध्ये केवळ सूप पिऊन काढली रात्र

[ad_1]

रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आज, २३ मार्च हा माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवशीच मला पहिला सिनेमा मिळाला होता, हे मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितले होतेच. आज मी तुम्हा साऱ्यांना माझ्या वाढदिवसाशी संबंधित एक आणखी संस्मरणीय किस्सा सांगणार आहे.

तो २३ मार्च १९९८ चा दिवस होता. माझा वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी लोकांचे फोन येत होते. पुष्पगुच्छांनी घर भरले होते. त्या दिवशी मी पार्टी किंवा डिनर ठेवले नव्हते. दुपारच्या वेळी बच्चन साहेबांचा फोन आला. त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, ‘रूमी, मी बाबूजींना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. लवकर घरी पोहोचलो, तर रात्री तुमच्या घरी येईन.’

मला वाटले, बच्चन साहेब औपचारिकता म्हणून असे म्हणत असतील, ते थोडेच आपल्या घरी येतील? रात्री कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं, याची सायंकाळी आम्ही घरात चर्चा करत होतो. तेवढ्यात बच्चन साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला की, रूमीजी, बच्चन साहेब आठ वाजता तुमच्या घरी पोहोचतील. ही गोष्ट मी घरात सांगितली आणि साऱ्या कुटुंबात एकदम उत्साह संचारला. बच्चन साहेब घरी येणार असल्याने त्यांचे स्वागत, आदरातिथ्य कसे करायचे, या विचारात आम्ही पती-पत्नी पडलो.

माझ्या पत्नीच्या हातच्या जेवणाची चव साऱ्या फिल्म इंडस्ट्रीला माहीत होती. पण, वेळच इतका कमी होता की बच्चन साहेबांसाठी काय बनवायचे, असा प्रश्न तिला पडला. तर, बच्चन साहेबांसोबत कंपनी देण्यासाठी कुणाला बोलवायचे, या विचारात मी होतो. मी गोविंदा, डेव्हिड साहेब, लाली भाभी, हनी इराणी, रमेश तोराणी यांना फोन करुन विनंती केली की, कृपया लवकर आमच्या घरी या, बच्चन साहेब येणार आहेत.

बच्चन साहेब वेळेचे किती पक्के आहेत, ते सगळ्यांना माहीत आहेच. बरोबर आठ वाजता ते पोहोचले. सोबत जया भाभीजी, अभिषेकही आले होते. हनीच्या समवेत निशी प्रेमही आली. लोक आपल्यासाठी अगदी वेळात वेळ काढून येतात, ते आपल्यावर इतके प्रेम करतात आणि स्वत: बच्चन साहेबही घरी येतात, यापेक्षा वाढदिवसाची मोठी भेट काय असू शकते? माझ्या आयुष्यातील ती एक संस्मरणीय संध्याकाळ ठरली. या गोष्टीवरुन मला नूह नारवी यांचा एक शेर आठवतोय…

आप जिन के क़रीब होते हैं

वो बड़े ख़ुश-नसीब होते हैं…

आपल्या घरी स्वत:च्या हाताने काही बनवून बच्चन साहेबांना आपण खाऊ घालू शकलो नाही, याची सल माझ्या पत्नीला पुढे कायम राहिली. असो. ही गोष्ट २०१९ ची आहे. डिसेंबर महिना होता. आम्ही ‘चेहरे’ सिनेमाच्या शूटिंगसाठी पोलंडला गेलो होतो. बर्फाच्छादित डोंगरावर असलेल्या एका स्किइंग रिसॉर्टमध्ये आम्ही बच्चन साहेबांसोबत शूटिंग करत होतो. तिथे बर्फामध्येच चारी बाजूंनी काचा लावलेले एक किचन होते. माझी पत्नी हनानने बच्चन साहेबांसाठी डिनर बनवायचे ठरवले आणि ती तिथे जाऊन कामाला लागली. शूटिंग सुरू असताना सगळे लोक किचनजवळ जाऊन डोकावायचे. कारण किचन काचेचे होते आणि आतमध्ये हनान स्वयंपाक करत होती.

बच्चन साहेबांनीही तिथे जाऊन पाहिले. मी म्हणालो, बघा, आज हनान तुमच्यासाठी जेवण बनवतेय.. त्यांनी ‘काय बनवतेय?’ असे विचारल्यावर तिने भेंडी, बटाट्याची भाजी, दाल, पनीर अशा सगळ्या पदार्थांची नावे सांगितली. आज भाभीजींच्या हातचे जेवण मिळणार, म्हणून सिनेमाचे निर्माते आनंद पंडितही खुश झाले. बच्चन साहेबांनीही आपले रात्रीचे जेवण बनवू नका, असे त्यांच्या हॉटेलला कळवले. पॅकअप झाले. एव्हाना हनानने जेवण तयार केले होते.

तो बच्चन साहेबांच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी ते परत जाणार होते. त्यामुळे किचनमधले सगळे कर्मचारी त्यांच्यासोबत फोटो काढण्यात गुंतले. मी त्यांना म्हणालो, आधी सगळ्यांचे जेवण पॅक तरी करा.. तर त्यांनी सांगितले की, रात्री सगळ्यांचेच जेवण पाठवून देऊ. बच्चन साहेब सात वाजता जेवतात, आम्ही त्या वेळेपर्यंत जेवण त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोच करु. सहनिर्माता वैशल मला म्हणाला, रूमी भाई, तुम्ही निश्चिंत राहा. जेवण वेळेवर पोहोचेल.. त्यानंतर आम्ही सगळे हॉटेलवर पोहोचलो.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास बच्चन साहेबांचा सहायक प्रवीणचा फोन आला की, जेवण अजून पोहोचले नाही.. मी वैशलला फोन केला. त्याने सांगितले की, आम्ही इथेच आहोत, जेवणाचे पार्सल पाठवतोच आहे. साडेआठला पुन्हा प्रवीणचा फोन आला. तो म्हणाला, सरांच्या जेवणाची वेळ उलटून गेलीय, त्यांना खूप भूकही लागलीय. जेवण कधीपर्यंत येईल..? मी वैशलला पुन्हा फोन केला. तेव्हा त्याने सांगितले.. स्किइंग रिसॉर्टचा पूर्ण रस्ता बर्फाच्छादित असल्याने मेन गेटपासून आतमध्ये, ज्या इमारतीच्या वर किचन आहे, तिथवर पोहोचायला ३५-४० मिनिटे लागतात. तिथे एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. वरून एखादी गाडी आली, तर ती जाईपर्यंत खालून गाडी सोडत नव्हते. पण, चुकीने दोन्हीकडून गाड्या सोडल्या गेल्या आणि त्या बर्फावरुन घसरत एकमेकांना धडकल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे बर्फ हटवला जाईल, गाड्या काढल्या जातील आणि रस्ता क्लिअर होईल तेव्हाच इथून जेवण पाठवता येईल.

नऊच्या सुमारास पुन्हा प्रवीणचा फोन आल्यावर त्याला घडलेला प्रकार कथन केला आणि या कारणामुळे जेवण तयार असूनही ते बच्चन साहेबांपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगितले. मग प्रवीणने तिथल्या किचनमध्ये जाऊन सूप बनवून आणले आणि त्यांना प्यायला दिले. इतक्या उशिरापर्यंत त्यांना भुकेले राहावे लागले होते.

मला आणि माझ्या पत्नीला आजपर्यंत या गोष्टीचे दु:ख वाटते आहे की, बच्चन साहेब घरी आले होते तेव्हा त्यांना स्वयंपाक करुन जेऊ घालू शकलो नाही आणि जेवण बनवले तेव्हा ते वेळेवर हॉटेलमध्ये पोहोचले नाही, म्हणून ते खाऊ शकले नाहीत. पण, बच्चन साहेब खूप मोठ्या मनाचे आणि महान व्यक्ती आहेत. दुसऱ्या दिवशी ते शूटिंगला आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर नाराजीची, तक्राराची जराशीही छटा नव्हती की, तुमच्या जेवण बनवण्यामुळे मला रात्री उपाशी राहावे लागले. बच्चन साहेबांना सलाम! आज त्यांच्यासाठी त्यांच्या ‘याराना’मधील हे गाणे ऐका…

छूकर मेरे मन को,

किया तूने क्या इशारा…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments