Saturday, September 12, 2026
Homeसातारानामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांतर्गत वाचन विषयावर विविध कार्यक्रम...

नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांतर्गत वाचन विषयावर विविध कार्यक्रम संपन्न.

फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग परिपत्रकाप्रमाणे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम अंतर्गत शनिवार दिनांक 11/01/2025 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध उपक्रमांसाठी मार्गदर्शक म्हणून प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फलटणचे प्राचार्य मा. श्री. अमित सस्ते उपस्थित होते.
सर्वप्रथम महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये ‘वाचन कौशल्य कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन भाषा विभागाच्या ‘वाचन उपक्रम समिती’ द्वारे करण्यात आले होते. या कार्यशाळेची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविका मध्ये प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी आज बदलत्या काळात या उपक्रमाची आवश्यकता का निर्माण झाली हे स्पष्ट केले तसेच कार्यशाळेचे स्वरूप स्पष्ट केले. यानंतर प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व प्रमुख पाहुण्यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ व श्रीराम एज्युकेशन सोसायटीची वार्षिक दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे प्राचार्य मा. श्री. अमित सस्ते यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचन संस्कृती’ याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी वाचन संस्कृती, वाचन शब्दाची उत्पत्ती, वाचनाची आवश्यकता, महत्त्व, वाचन कसे करावे, ग्रंथालय म्हणजे ज्ञान भांडार, महत्त्वाची पुस्तके, वाचना मुळेच वैचारिक बैठक तयार होते, ग्रंथांमुळे महापुरुष कसे घडले?, वाचन एक मूलभूत गरज, वाचाल तर वाचाल, वाचना द्वारे व्यक्तिमत्वाचा विकास, वाचनाद्वारे समाज व राष्ट्रनिर्मिती या विविध विचारांद्वारे वाचनाची आवश्यकता स्पष्ट केली तसेच शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तकाचे सामूहिक वाचन’ उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचे शांतपणे वाचन केले व त्या पुस्तकांमधील विचार, वैशिष्ट्ये, उद्देश, आशय सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच पुस्तकावर आधारित विचार मंथन केले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने ग्रंथालयाची स्वच्छता केली. त्यामध्ये कपाटांच्या काचा पुसल्या, विषयवार ग्रंथांची विभागणी करून ती क्रमवार ठेवली, ग्रंथालय अभ्यासिका याची स्वच्छता केली, ग्रंथालयातील केरकचरा साफ केला. त्यानंतर ग्रंथालय अभ्यासिका मध्ये बसून पुन्हा पुस्तकांचे सामूहिक वाचन केले.
यावेळी भाषा विभागाद्वारे विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य मा. श्री. अमित सस्ते सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनाचे पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांनीही त्याचा लाभ घेतला. यावेळी मा. श्री. सस्ते सरांनी ग्रंथ प्रदर्शनाचे महत्त्व सांगितले तसेच वाचनीय पुस्तकांची नावे व प्रेरणादायी पुस्तके वाचण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संदेश बिचुकले व मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सतेज दणाणे तसेच कला, वाणिज्य विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. अशाप्रकारे ‘वाचन संकल्प महाराष्ट्रचा’ उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments