वेध मुत्सद्देगिरीचा…: देशाच्या परराष्ट्र धोरणाचा प्रतिभावान भाष्यकार

0
17
वेध मुत्सद्देगिरीचा…:  देशाच्या परराष्ट्र धोरणाचा प्रतिभावान भाष्यकार


डॉ. रोहन चौधरी10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

श्याम सरन

एक चांगला मुत्सद्दी हा केवळ राजनयिक अधिकारी नसतो, तर तो एक संशोधक आणि विचारवंतही असतो. आपल्याला मिळालेल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर देशाला दिशा देणे आणि बदलत्या परिस्थितीवर भाष्य करून परराष्ट्र धोरणातील कच्चे दुवे दाखवणे किंवा संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करणे ही देखील मुत्सद्द्याची जबाबदारी असते. श्याम सरन यांनी निवृत्तीनंतरही या जबाबदारीची जाणीव जपल्याचे त्यांच्या कार्यातून जाणवते.

एक मुत्सद्दी आपल्या कर्तव्याची पूर्तता कशाप्रकारे करू शकतो, याचे बेजोड उदाहरण म्हणजे सरन यांचे परराष्ट्र धोरणावरील भाष्य. संशोधन करणाऱ्या डझनभर संस्थाची जबाबदारी, वृत्तपत्रीय लिखाण तसेच शेकडो व्याख्यानांतून परराष्ट्र धोरण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते आजही तितक्याच आत्मीयतेने करत आहेत. वर्तमानातील जागतिक राजकारण आणि भारतीय परराष्ट्र धोरण समजून घ्यायचे असेल, तर सरन यांचे लिखाण अभ्यासणे अनिवार्य आहे.

परखड, तटस्थ आणि वास्तववादी ही त्यांच्या संशोधनाची वैशिष्ट्ये. सरन यांच्या ‘हाऊ इंडिया सीज द वर्ल्ड : कौटिल्य टू द ट्वेन्टीथ सेंच्युरी’ आणि ‘हाऊ चायना सीज इंडिया अँड द वर्ल्ड’ या पुस्तकांत ही वैशिष्ट्ये आढळून येतात. ही दोन्ही पुस्तके अभ्यासल्याशिवाय समकालीन भारतीय परराष्ट्र धोरण समजून घेता येणार नाही.

परराष्ट्र धोरणात सातत्य आणि बदल यांच्यात समन्वय साधणे अपरिहार्य असते. किंबहुना, तो परराष्ट्र धोरणाचा पाया असतो, याची स्पष्ट जाणीव सरन यांना होती. आपल्या परराष्ट्र धोरणावरील पुस्तकात या मूलभूत गोष्टीची जाणीव ते पदोपदी करून देतात. म्हणूनच कौटिल्यापासून ते २१ व्या शतकापर्यंतच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेताना, सातत्य आणि बदल यांचा समन्वय साधत भारताने राष्ट्रीय हिताचे संवर्धन कसे केले, याचा इतिहासच सरन यांनी मांडला आहे.

इतिहासाकडे प्रचंड दुर्लक्ष किंवा त्याच्याविषयी आंधळी श्रद्धा हा भारतीय जनमानसाचा स्वभाव असून, त्याचे परिणाम परराष्ट्र धोरणावरही होतात. देशाच्या परराष्ट्र धोरणाची समीक्षा करताना अभ्यासकांना या स्वभावाच्या पलीकडे घेऊन जाण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते या पुस्तकातून करतात.

चीनचा वाढता प्रभाव हे भारतीय परराष्ट्र धोरणासमोरचे सर्वात प्रमुख आव्हान आहे, याबद्दल आपले एकमत आहे. परंतु, या आव्हानाला सामोरे कसे जावे, याबद्दल मतभिन्नता आहे. चीनविषयी असणारी अनभिज्ञता हे या मागचे प्रमुख कारण आहे. ती दूर करण्याचे महत्त्वाचे काम सरन यांनी आपल्या चीनवरील पुस्तकात केले आहे.

चिनी मानसिकता कशी काम करते, इतिहास आणि भूगोल यांचे चिनी जनतेत असणारे महत्त्व, त्याचे राजकीय प्रक्रियेवर पडणारे प्रतिबिंब आणि त्यातून निर्माण झालेला आधुनिक चीन याबद्दलचे अत्यंत विस्तृत आणि तटस्थ विश्लेषण सरन यांच्या पुस्तकात आढळते. चीनच्या प्रगतीचा सर्वंकष आढावा घेतानाच, तिच्यातील मर्यादा आणि उणिवा यांचाही त्यांनी तटस्थपणे उहापोह केला आहे.

चीनच्या प्रगतीतून भारताने काय शिकावे आणि काय अंगीकारू नये, याबद्दल सरन आपल्या या पुस्तकात अतिशय आग्रही आहेत. भारतीय युवकांची क्रियाशीलता आणि संविधानाशी असणारी बांधिलकी याविषयी भारताने कधीही तडजोड करू नये, अशी सादही ते घालतात.

चीनमधील नागरिकांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक करतानाच, भारतीयांनी हा गुण अंगीकारावा अशी अपेक्षाही व्यक्त करतात. जागतिक पातळीवर भारताला चीनचा समर्थ मुकाबला करायचा असेल, तर त्या देशाला आधी सर्वार्थाने जाणून घेण्याची नितांत गरज आहे. सरन यांचे पुस्तक ही गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या परराष्ट्र सेवेतील अनुभवाचा उपयोग करून चीनची मानसिकता भारतीयांना समजून सांगण्याचा त्यांनी केलेला हा प्रयत्न त्यामुळेच खूप वाखण्याजोगा आहे.

सरन यांचे परराष्ट्र सेवेतील योगदान तर मोलाचे आहेच. शिवाय, सामान्य वाचकाला परराष्ट्र धोरण अतिशय सोप्या भाषेत सांगण्याचे कौशल्य आणि आपल्या अनुभवाचा उपयोग ज्ञाननिर्मितीसाठी करण्याचा प्रयत्न तसेच दिल्लीतील सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च, इन्स्टिट्यूट फॉर चायना स्टडीज् आणि इंडिया इंटरनॅशनल सेंटर यांसारख्या संस्थांमधून भारतीय परराष्ट्र धोरणाला आकार देण्याची तळमळ यामुळे श्याम सरन हे जागतिक राजकारण आणि भारतीय परराष्ट्र धोरण समजून घेण्यासाठी दिशादर्शक ठरतात.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)



Source link