रात्रीच्या अचानक पाहणीने प्रशासनात खळबळ; पालखी मार्ग व ‘नमो उद्यान’ कामांना नगराध्यक्षांचे गतीचे निर्देश

0
27
रात्रीच्या अचानक पाहणीने प्रशासनात खळबळ; पालखी मार्ग व ‘नमो उद्यान’ कामांना नगराध्यक्षांचे गतीचे निर्देश

रात्रीच्या अचानक पाहणीने प्रशासनात खळबळ; पालखी मार्ग व ‘नमो उद्यान’ कामांना नगराध्यक्षांचे गतीचे निर्देश


फलटण | प्रतिनिधी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बुधवारी रात्री अचानक फलटण शहरातील सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या विकासकामांची तसेच प्रस्तावित ‘नमो उद्यान’च्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. दिवसभर नगरपरिषदेत पालखी मार्गाच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर रात्रीच त्यांनी कामाच्या ठिकाणी भेट देत प्रगतीचा आढावा घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच हालचाल निर्माण झाली.
पालखी मार्गावर उभारण्यात येणाऱ्या पथदिव्यांच्या कामाबाबत नगराध्यक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. स्ट्रीट लाईटसाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी दिव्यांच्या उभारणीदरम्यान सर्व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देत, दिव्यांचा पाया मजबूत व सुरक्षित असावा यावर त्यांनी विशेष भर दिला. भविष्यात कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी स्वामी विवेकानंद नगर परिसरातील रायगड हॉटेल शेजारी प्रस्तावित ‘नमो उद्यान’च्या जागेचीही त्यांनी पाहणी केली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून या उद्यानासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा साचणे आणि खोल खड्डा असल्याने उद्यान उभारणीस अडथळे निर्माण होत होते. सध्या खड्डा भरून जागा समतल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहराला आधुनिक आणि आकर्षक उद्यान मिळावे यासाठी आवश्यक कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
पाहणीदरम्यान फिरण्यासाठी बाहेर पडलेले शहरातील काही नामांकित वकील नगराध्यक्षांना भेटले. यावेळी उद्यानासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. संवाद साधताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “अनेक वर्षे सत्ता हातात असूनही पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना शहराचा अपेक्षित विकास साधता आला नाही. मात्र, येत्या काही वर्षांत फलटण शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा आमचा निर्धार आहे.”
या पाहणी दौऱ्यावेळी महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन रणजीतसिंह भोसले, ज्येष्ठ नगरसेवक सुदाम (आप्पा) मांढरे, नगरसेवक संदीप चोरमले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते अमोल सस्ते तसेच बांधकाम व्यावसायिक दीपक देशमुख उपस्थित होते.