Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रवेब वॉच: 'वालई' केळी मजुरांच्या  मुलांचे घुसमटलेले जग

वेब वॉच: ‘वालई’ केळी मजुरांच्या  मुलांचे घुसमटलेले जग

वेब वॉच:  ‘वालई’ केळी मजुरांच्या  मुलांचे घुसमटलेले जग

[ad_1]

सुहास किर्लोस्कर12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पोनवेल एम. याचा शिवानंदनच्या भूमिकेतील नैसर्गिक अभिनय हा ‘वालई’चा हायलाइट आहे. 

केळी हे तुलनेने स्वस्त आणि अधिक पौष्टिक असे फळ मानले जाते. भारतात महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन होते. त्यातही आंध्र प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ५८ लाख टन केळी उत्पादन होते, असे आकडेवारी सांगते. पण, केवळ सर्वांत जास्त उत्पादन होते या निकषामुळे केळी स्वस्त मिळतात का? नाही!

केळीच्या बागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना मिळणारा मेहेनताना अत्यल्प असला, तरी बाजारात मात्र केळीचे दर चढेच असतात. केळीचे मोठमोठे घड झाडावरून उतरवायचे, ते डोक्यावर घेऊन बागांमधून वाट काढत ट्रकपर्यंत जायचे आणि मग त्यामध्ये ते भरायचे.. हे काम दिवसभर करण्याचे किती पैसे या मजुरांना मिळत असतील? हातावर पोट असणाऱ्या अशा असंघटित मजुरांचे प्रश्न काय आहेत? हे प्रश्न एरवी कुणाला पडणारही नाहीत. पण, याच विषयावर सिनेमा काढला तर तो कोण बघणार?

लेखक-दिग्दर्शक मारी सेल्वाराजा यांचा ‘वालई’ (Vaazhai) हा सिनेमा या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. डिस्ने हॉटस्टारवर सादर झालेल्या या सिनेमाची कथा सेल्वाराजा यांचीच आहे. त्यांनी आपलीच गोष्ट एका लहान मुलाच्या नजरेतून मांडली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या – शिवानंदनच्या घरी त्याची मोठी बहीण आणि त्याची आई असे तिघे राहात असतात. त्यांची गुजराण केळीचे घड वाहून नेण्याच्या मजुरीतून होत असते. कधी कधी शिवालाही या कामाला जावे लागते, पण त्याला हे काम आवडत नाही. त्याऐवजी त्याला शाळेत जायला आवडते. तो वर्गातला सर्वांत हुशार विद्यार्थी असतो. कुणाच्याही बालपणातील शाळेचे दिवस खूप रम्य असतात. पण, शिवाची परिस्थिती इतकी बिकट असते की, त्याला शाळेऐवजी कामावर जावे लागते. या गोष्टीचा त्याला विलक्षण राग असतो.

या कथेत पुढे काय घडते, यापेक्षा ते ज्या पद्धतीने सादर केले आहे, ते फार महत्त्वाचे आहे. सिनेमाच्या सुरूवातीला एक मोठे रान दिसते, तिथे अनेक झाडे आहेत. शिवा मोठमोठ्याने हाका मारतो आहे. डोंगरावरून लंगडत लंगडत जाणारा, रडकुंडीला आलेला हा मुलगा काय शोधतोय, हे लवकरच समजते. विलोभनीय सिनेमॅटोग्राफी, अप्रतिम प्रकाशयोजना ही या सिनेमाची वैशिष्ट्ये पहिल्या पाच मिनिटांतच जाणवू लागतात. डोक्यावरचे केळाचे घड तो नदीत फेकून देतो आणि आपल्याला केळाच्या बागांचे विहंगम दृश्य दिसते. त्याचवेळी पडद्यावर अक्षरे उमटतात… Vaazhai ज्याचा उच्चार होतो, वालई म्हणजे केळी.

सकाळ होताच शिवाची बहीण त्याला उठवते आणि म्हणते, ‘उठ, आज केळीच्या घडांची हमाली करायला जायचं नाहीय, उठ!’ हे ऐकताच तो उत्साहानं उठतो. खरं तर त्याला रोजची सकाळ विलक्षण भीतीदायक वाटत असते. कारण शाळेत जाण्याऐवजी त्याला मजुरी करावी लागायची. या सिनेमातील प्रत्येक दृश्य अर्थपूर्ण आहे. दिवस उजाडताच कोंबड्या खुराड्यातून बाहेर काढल्या जातात आणि पिल्लं इकडंतिकडं बागडतात. हातावर पोट असलेल्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असली, तरी शिवाचं भावविश्व खूप तरल असतं. त्याला नदीत पोहायला आवडतं, नदीकाठी मित्रांबरोबर गप्पा मारायला आवडतात, केळीच्या खोडाची होडी करून त्यावर मित्रांसोबत नाचायला आवडतं. गणवेश घालून शाळेत जाणं हा तर त्याच्यासाठी खूप आनंदाचा क्षण! कारण त्याला तिथं किंमत असते. शिक्षक नेहमीच त्याचं कौतुक करतात. शिवाच्या आयुष्यातील असे विरोधाभास सिनेमात दिसत राहतात, कमीत कमी संवादांतून ते अधिक बोलके होतात.

सिनेमा हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने लेखक – दिग्दर्शक कॅमेऱ्यातून व्यक्त होतात. इथे थेनी ईश्वर यांची सिनेमॅटोग्राफी दाद देण्यासारखी आहे. संतोष नारायणन यांच्या संगीताला तमिळनाडूच्या मातीचा सुगंध आहे. पोनवेल एम. याने साकारलेली शिवानंदनची भूमिका हा या सिनेमाचा हायलाइट आहे. इतका नैसर्गिक अभिनय एका शाळकरी मुलाने केला आहे, त्यामध्ये त्याचे आणि दिग्दर्शकाचेही कौतुक आहे. दिव्या दोरायस्वामी (बहीण), जानकी (आई), राघुल (मित्र), निखिला विमल (शिक्षिका) या सर्वांचा अभिनय इतका सहजसुंदर आहे की, आपण सिनेमा बघतो आहोत, हे क्षणभर विसरुन जातो.

एखादा तुलनेने उपेक्षित असलेला सामाजिक प्रश्न किती कल्पकतेने मांडता येतो, याचे उत्तम उदाहरण लेखक – दिग्दर्शक मारी सेल्वराजा यांनी ‘वालई’तून उभे केले आहे. ‘ऑस्कर’ला पाठवण्यासाठी याची निवड झाली होती आणि तो पहिल्या दहा सिनेमांच्या यादीतही होता. पण, भारतातील सर्वोत्तम सिनेमा म्हणून तो पुढे पाठवण्यात आपण कमी पडलो. अशा स्थानिक प्रश्नांच्या उत्तम मांडणीमुळे एखादा प्रादेशिक सिनेमा जागतिक दर्जाचाही होऊ शकतो. महाराष्ट्रातील ऊस कामगारांचे, त्यांच्या कुटुंबांचे, मुलांच्या शिक्षणाचे असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. तेही अशा पद्धतीने मांडता येऊ शकतात, हे हा सिनेमा बघताना जाणवत राहते.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments