पाच जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दगडाने मारल्याने डोळ्याला दुखापत
फलटण : टाकळवाडे (ता. फलटण) येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुरांनी शेतात शौचास जाऊ नये, या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी सोपान रंगराव मिंड यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून पाच जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अलका सोपान मिंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास टाकळवाडे ते फुलेवस्ती जाणाऱ्या रस्त्याजवळ केशव शिवाजी इवरे व हरिभाऊ केरबा इवरे हे शेतात उभे होते. यावेळी केशव इवरे हे शिवीगाळ करत असल्याचे लक्षात आल्याने अलका मिंड व त्यांचे पती सोपान मिंड यांनी त्यांच्याकडे जाऊन शिवीगाळ करण्याचे कारण विचारले.
त्यावेळी, मिंड यांच्या शेतात आलेले ऊसतोडणी मजूर शेतात शौचास जात असल्याने त्यांना तसे करण्यास मनाई करावी, असे सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावर सोपान मिंड यांनी मजुरांना शेतात शौचास जाऊ नये, असे सांगितले. यानंतर केशव इवरे यांनी सोपान मिंड यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर केशव इवरे हे मोटारसायकलवरून निघून गेले. काही वेळाने ते अविनाश संपत मिंड व संपत साहेबराव मिंड यांना सोबत घेऊन पुन्हा घटनास्थळी आले. यावेळी अविनाश मिंड यांनी सोपान मिंड यांचा गचूर धरून खाली पाडले व छातीवर बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, शितल शिवाजी इवरे यांनी दगडाने सोपान मिंड यांच्या डाव्या डोळ्यावर मारल्याने त्यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संपत साहेबराव मिंड यांनी हाताने, तर संदेश केशव इवरे यांनी लाथेने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित पाच जणांनी शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेदरम्यान सोपान मिंड यांचा नातू शौर्य नानासाहेब मिंड व नात सिध्दी नानासाहेब मिंड हे घटनास्थळी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर सोपान मिंड यांना त्यांचा मुलगा नानासाहेब मिंड यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी पाठवल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना फलटण येथील सुविधा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी केशव शिवाजी इवरे, अविनाश संपत मिंड, संपत साहेबराव मिंड, शितल शिवाजी इवरे आणि संदेश केशव इवरे यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सागर अभंग करीत आहेत.
