डायरीची पाने: ‘थंडी’ गुलाबी अन् बोचरी

0
14
डायरीची पाने:  ‘थंडी’ गुलाबी अन् बोचरी




पोरांसोबत मी शाळेत जायचो. मन लावून शिकायचो. कविता पाठ करायचो. त्याच कविता शेतात काम करताना उंच आवाजात म्हणायचो. त्यात खूप आनंद मिळायचा. सध्या थंडीचे दिवस आहेत. आमच्या परभणीत ऊन आणि थंडीही टोकाची असते. आम्ही आता या हवामानाला सरावलो आहोत. पण, मुलं आणि वयस्कर माणसं प्रत्येक ऋतूबदलाच्या वेळी आजारी पडतात. हा बदल त्यांच्यासाठी सुखकारक नसतो. ते उबदार कपडे घालून शेकोटीभोवती वेळ घालवतात. मर्ढेकरांनी मुंबईच्या थंडीला ‘गोड हिवाळा’ म्हटलंय. उकाड्यानं कायम हैराण असलेल्या मुंबईकरांना हिवाळा गोड वाटणं स्वाभाविकच आहे. थंडीचं हे रूप पाहिलं की, मला माझं गावाकडचं बालपण आठवतं. थंडीचे दिवस म्हणजे मजाही असायची आणि सजाही. मजा असायची ती ऊस, बोरं, जांब (पेरू), टाहाळ (ओला हरभरा) खाण्याची आणि सजा असायची ती इतक्या भयंकर थंडीत पहाटेच उठून पाखरं हाकायला जाण्याची. मी आणि माझी मोठी बहीण मुक्तूबाई पाखरं हाकायला जायचो. आमच्या रानमळ्यात ज्वारी पेरलेली असायची. तिथं पाखरं हाकायला जावं लागायचं. रानमळा शिवेवर म्हणजे खूप लांब होता. त्यामुळं पाखरं उठून ज्वारीवर झेपावण्याआधी तिथं पोहोचावं लागायचं. त्यासाठी पाखरांच्याही खूप आधी उठून, सगळं उरकून निघावं लागायचं. मी भित्रा होतो आणि मुक्तूबाई रगेल होती.आमची माय मारकुटी होती, बाबा हळवे होते. पण, तेव्हा ते घरी नसायचे. पहाटेच उठून सगळं उरकून ते कामाला निघून गेलेले असायचे. आम्हाला उठवून पाखरामागं हाकायचं काम मायकडं असायचं. माय मुक्तूबाईला उठवण्यासाठी हाका मारायची, पण ती दाद देत नसे. माय तिच्या अंगावरचं पांघरूण ओढायची. थंडीमुळं मुक्तूबाई आपोआपच उठून डोळे चोळत बसायची. माय तिच्यावर ओरडायची. त्यालाही मुक्तूबाई दाद देत नसे. मग माय बकुटीला धरून तिला न्हाणीवर नेऊन बसवायची. तिच्या हातावर राखुंडीचा ढेपसा ठेवून दात घासायला लावायची. तोंड धुतलं की चुलीपुढं आणून बसवायची. रात्रीचं, सकाळचं जे असेल ते खाऊ घालायची. हातात काठी घेऊन, तिला धाक दाखवत शेताच्या वाटेला लावायची. माय मुक्तूबाईकडून जसं सगळं करून घ्यायची, त्या भीतीनं मीही सगळं उरकायचो आणि तिच्या मागं मागं शेताला निघायचो. मुक्तूबाई चिडलेली असायची. आपला राग ती माझ्यावर काढायची. तिच्या आणि मायच्या आपाधापीत मी का हसत होतो? म्हणून माझ्या पाठीत बुक्का घालायची. मी रडत रडत तिच्या मागं चालायचो. रानात गेल्यावर सगळी कामं मलाच सांगून ती माळ्यावर बसून राहायची. माळा म्हणजे पिकाच्या मधोमध पाखरं राखण्यासाठी तयार केलेला चार डिळ्यांचा लहानसा मांडव. त्यावर उभं राहून पाखरं हाकायची. शेताकडं जाताना मुक्तूबाई दुसऱ्याच्या शेतातला ऊस मोडून घ्यायची. मला भीती वाटायची. मालकानं बघितलं, तर तो मारील, असं वाटायचं. पण, ती भीत नव्हती. बिनधास्त एक-दोन ऊस मोडून घ्यायची. शेतात गेल्यावर माळ्यावर बसून ऊस साळायची. त्याचे तुकडे करायची आणि खात बसायची. चिवट्या माळ्याखाली टाकायची. चिमण्यांचा थवा कुठं बसलाय, ते वरून सांगायची, तिकडं पळवायची. त्या बदल्यात ती मला उसाचं कांडं द्यायची. आमच्याकडं तेव्हा ऊस नव्हता. ऊस खाऊ वाटायचा, पण तो दुसऱ्याच्या शेतातून घेऊन खायची हिंमत माझ्यात नव्हती. त्यामुळं मुक्तूबाई सांगेल ती कामं मी करीत राहायचो. ऊस संपला की मुक्तूबाई ज्वारीतला टाहाळ उपटायची. त्याच्यावरची आंब धुवायला जवळपास पाणी नसल्यामुळं तो टाहाळ आम्ही तसाच खायचो. थंडीनं आधीच उललेल्या ओठांना ती आंब झोंबायची. ओठ चुरचुर करायचे. आंब जास्त असंल तर मुक्तूबाई टाहाळ मातीत घोळसायची. मातीला लागून आंब कमी व्हायची. टाहाळ खाऊन झाला की ती वाळकं तोडायची. आम्ही कोवळे वाळकं खायचो. असं आमचं सतत काहीतरी खाणं सुरू असायचं. उसाच्या चिवट्या, हरभऱ्याची झाडं, वाळकाच्या बियांचा गड्डा हे सगळं आम्ही माळ्याखाली टाकायचो. एक दिवस हा ढीग माळ्याला भिडायचा. मग घरून येताना मुक्तूबाई काडीपेटी आणायची आणि तो कचरा जाळायची. आम्ही ऊस चोरून खाल्ल्याचा पुरावा नष्ट करायची. आपण शेतातलं काय आणि किती खाल्लं, त्याचाही मागमूस ठेवायची नाही. ऊस, टाहाळ, वाळकं कितीही खाल्ले, तरी पोट भरतच नसे. लोक म्हणायचे, यानं कधीच पोट भरत नसतं. भाराभर टाहाळ खाल्ला अन् पोट चिरून पाहिलं, तर शिपभरही दाणे निघणार नाहीत. वाळकाचं तर खाताना तोंडातच पाणी व्हायचं. शिवाय, पाखरामागं सारखं पळून पळून खाल्लेलं हजम होऊन जायचं. पुन्हा खाऊ वाटायचं. आमच्यासारखंच चिमण्यांचंही होतं. त्यांना कितीदाही उठवलं, तरी त्या पुन्हा येऊन बसायच्या नि दाणे खात राहायच्या. त्यांचं पोट काही भरायचं नाही. त्यांच्या खाण्याला आम्ही वैतागायचो आणि आमच्या खाण्याला घरचे वैतागायचे. घरची कामं उरकून पाठीमागून वहिनी भाजी-भाकरी घेऊन यायच्या. आम्हाला ‘आता जेवा,’ असं म्हणायच्या. आम्ही लगेच जेवायला बसायचो. आम्ही काहीबाही खाल्लेलं सांगायचो, तेव्हा वहिनी म्हणायच्या, ‘त्या चिमणचाऱ्यानं काय होतंय? भाजी भाकरीशिवाय पोट भरत नाही.’ वहिनीनं त्या खाण्यासाठी वापरलेला ‘चिमणचारा’ हा शब्द मला फार आवडायचा. जेवण करून मी घरी यायचो. मग घरच्या दुसऱ्या वहिनी मला आंघोळ घालायच्या. डोक्याला तेल लावायच्या. तेच हात तोंडावरून आणि हातापायावरून फिरवायच्या. थंडीच्या कडाक्यानं उललेली त्वचा मऊ व्हायची. उललेल्या ओठाला वहिनी कुंकवाच्या बगव्यातलं मेण लावायची. त्यामुळं ओठ कडकडत नसत. माझ्या केसांचा भांग पाडून, कपाळावर गंध लावून माझ्या काखेत दप्तर अडकवायची आणि शाळेच्या रस्त्याला लावून द्यायची. पोरांसोबत मी शाळेत जायचो. मन लावून शिकायचो. कविता पाठ करायचो. त्याच कविता शेतात काम करताना उंच आवाजात म्हणायचो. त्यात खूप खूप आनंद मिळायचा. तेव्हा मी आठ – नऊ वर्षांचा असेन. शाळा संपली की घरी दप्तर टाकून पुन्हा शेतात जावं लागायचं. शेतात जी कामं सुरू आहेत, मोठी माणसं जे काम करताहेत, त्यांना मदत करायची. वहिनी वैरण काढत असंल, तर तिला ती काढू लागायची. दादा दूध काढत असंल, तर त्याला वासरू आखडू लागायचं. दावण साफ करू लागायची. गुरांची सोड-बांध करू लागायची. सगळी कामं संपली की मावळायची वाट बघत बसायचं. दिवस मावळताच सगळ्यांसोबत घरी जायचं, पण रिकाम्या हातानं नाही. वहिनींच्या डोक्यावर गोवऱ्यांचं टोपलं असायचं. दादाच्या डोक्यावर पराठ्याचा भारा असायचा. बाबाच्या हातात शेतातला काहीतरी भाजीपाला असायचा. माझ्या हातात दुधाची किटली असायची. घरी आलं की हातपाय धुवायचे आणि जेवायला बसायचं. घरी थांबलेल्या वहिनीनं आणि मायनं गरम गरम भाकरी-भाजी करून ठेवलेली असायची. काम करून दमून, थकून केलेलं ते जेवण अमृताच्या चवीचं असायचं. मग हिवाळ्याच्या त्या थंड हवेत येणारी रात्रीची झोप स्वर्गीय सुखाची असायची… (संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link