Sunday, September 13, 2026
Homeसातारा"फलटण-कोरेगावमधील बौद्ध समाजाचा एकच निर्धार: प्रा. रमेश आढाव यांना संविधान समर्थन समितीकडून...

“फलटण-कोरेगावमधील बौद्ध समाजाचा एकच निर्धार: प्रा. रमेश आढाव यांना संविधान समर्थन समितीकडून उमेदवारी”


फलटण :-फलटण-कोरेगाव (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी संविधान समर्थन समितीच्या वतीने विविध पक्षांकडे मागणी करण्यात आली होती. जवळपास सर्वच पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रस्थापित पक्षांनी यावेळीही बौद्ध समाजाला उमेदवारीपासून वंचित ठेवले. त्यामुळे अखेर संविधान समर्थन समितीने बौद्ध समाजातील अपक्ष उमेदवार म्हणून प्रा. रमेश आढाव यांची उमेदवारी जाहीर केली.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संविधान समर्थन समिती व परिवर्तन महाशक्ती विकास आघाडीच्या वतीने प्रा. रमेश आढाव यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा फलटण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते विजय येवले, बी. टी. जगताप, मा. नगरसेवक सचिन अहिवळे, मा. नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे, सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, गंगाराम रणदिवे आणि अॅड. आकाश आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

2009 मध्ये नव्याने निर्माण झालेल्या या आरक्षित मतदारसंघात अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे. मात्र, मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये समाजाला उमेदवारी मिळाली नसल्याने समाजात नाराजी पसरली होती. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी “एकच निर्धार … बौद्ध आमदार” अशी प्रतिज्ञा घेऊन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात संवाद अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानाला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

समाजाच्या मागणीसाठी खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदन सादर करून उमेदवारीची मागणी करण्यात आली होती. मात्र, या नेत्यांकडून बौद्ध समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संविधान समर्थन समितीच्या वतीने प्रा. रमेश आढाव, नंदु मोरे, बुवासाहेब हुंबरे आणि गंगाराम रणदिवे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नंदु मोरे, बुवासाहेब हुंबरे आणि गंगाराम रणदिवे यांनी उमेदवारी माघारी घेतली, आणि त्यामुळे प्रा. रमेश आढाव यांची संविधान समर्थन समिती व परिवर्तन महाशक्ती विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments