कबीररंग: तेरा साहिब है घर माहीं, बाहर नैना क्यों खोले…

0
18
कबीररंग:  तेरा साहिब है घर माहीं, बाहर नैना क्यों खोले…


हेमकिरण पत्की11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण दिवस-रात्र बोलत असतो. बोलल्याशिवाय कुठं राहवत असतं आपल्याला? कधी सुखाचा अनुभव येतो आणि कुणा दुसऱ्याशी तो आपल्याला वाटून घ्यावा वाटतो, तर कधी दुःखाच्या आघातानं आपलं मन ओझावून जातं. आपण दुसऱ्याशी बोलत राहतो. कधी हा दुसरा आपला मित्र, सहकारी, शेजारी, आप्त, घरातील व्यक्ती किंवा ऐकून घेणारा कुणीही सोशिक माणूस असतो. कधी कधी तर आपलं मन स्वतःशीच बोलत असतं.

आपल्याला शारीरिक, मानसिक पीडा असली की, आपण कुणासमोर तरी बोलून मोकळं होऊ पाहतो. आपलं शरीर, मन, ‘मी’पण अगदी स्वाभाविक स्थितीत असतं, तेव्हा आपल्याला बोलण्याची आवश्यकता भासत नाही, याचं चिंतन आपण कधी करतो का? आपलं बोलणं हे आपणच निर्माण केलेल्या जगाचा एक भाग असतं. स्वतःशी, इतरांशी बोलणं होत नसताना आपण आपल्या मूळ स्थितीचा अनुभव घेऊ शकतो, याची जाणीव आपल्याला कधी होते का? आपल्या मनात शब्दांच्या येरझारीनं एकसारखी आंदोलनं होत असतात. शब्दांशिवाय आपण असू शकतो, या स्थितीचा बोध आपण असण्याशी समरस झाल्याशिवाय, अकारण आनंदात न्हाल्याशिवाय आपल्याला होईल तरी कसा? असण्याच्या निव्वळ रसधारेत पूर्ण बुडालेले कबीर शुद्ध भावतंद्रेच्या भाषेत आपल्याशी बोलतात, तेव्हा त्यांची स्थितीच बोलकी असते. त्यांच्या मुखातून केवळ या स्थितीचं सूचन करण्यासाठी शब्द येतात…

मन मस्त हुआ तब क्यों बोले,

हीरा पायो गांठ गठियायो,

बार-बार बाको क्यों खोले।

कबीर आपल्याशी बोलतात. ते ‘मस्त’ असताना बोलतात. हे पद म्हणजे त्याचं उदाहरण असतं. कबीरांचं मस्त असणं पूर्ण ईश्वराधीनतेतून जन्मलेलं असतं. त्याला ‘मी’पणाचा गंधही नसतो. पंचप्राण जेव्हा केवळ असण्याच्या जाणिवेशी जोडलेले असतात, तेव्हाच ही ‘मस्त’ स्थिती वाट्याला येते. ही स्थिती ना कसली नशा असते ना कशाचा कैफ असते. कबीर म्हणतात, या स्थितीचं वर्णन करायची काय गरज? या स्थितीतला आनंदच पुरेसा असतो. ईश्वराच्या असण्याविषयी संदेह नसलेल्या सश्रद्ध जीवालाच या आनंदाचा बोध होत असतो. ही स्थिती आपल्या सगळ्यांसाठी कल्पना असते. मात्र, तो कबीरांचा अनुभव असतो. तरीही उमजेल अशा जीवनाशी जोडलेल्या प्रतीकांच्या भाषेतून कबीर हे ‘मस्त’पण आपल्यासाठी विशद करतात. अचानक हिऱ्याचा लाभ व्हावा, अशी ही आनंदाची स्थिती असते. या लाभामुळं हृदय आनंदानं भरून गेल्यावर पुन्हा पुन्हा त्या विषयी संदेहग्रस्त होऊन हृदय चाचपून कशाला बघायचं? चित्तानं निश्चिंत असावं, असं कबीर सांगतात…

हलकी थी तब चढी तराजू,

पूरी भई तब क्यों तोले।

सुरत कलारी भई मतवारी,

मदवा पी गई बिन तोले।

पुढच्या प्रतीकांतून आनंदाची स्थिती अधिक गडद करून कबीर सांगतात : साधी वस्तू तराजूनं मापून घ्यायची असेल, तर त्याला एका पारड्यात माप आणि दुसरीत वस्तू ठेऊन मापावं लागतं. वस्तूचं पारडं जड होऊन खाली गेलं, तर माप व्यवस्थित असतं. पण, जीवाला मस्त करणारा अनुभव असा तराजूनं तोलण्यासारखा नसतो. कारण ही वस्तू पारड्यात ठेवली की पारडं जमिनीला टेकतं. अमाप असतो हा मस्त असण्याचा आनंद! त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. कबीर म्हणतात, एखाद्या मधुशालेत मस्तीचा आनंद घेतलेल्या मद्यपींनी अवघी मधुशालाच पिऊन टाकावी तसा हा अनुभव असतो. पण, हा अनुभव पदार्थाच्या सेवनावर आधारलेल्या नशेसारखा नसतो. हे आपण समजून घ्यायचं असतं. कबीर प्रतीकांची माळ तयार करत हा ‘मस्त’ असण्याचा अवर्णनीय आनंद आपल्यापर्यंत पोहचवू पाहतात.

हंसा पाए मानसरोवर,

ताल-तलैया क्यों डोले।

एकदा जीवाला न कोमेजणाऱ्या ‘मस्त’ असण्याचा अनुभव आल्यावर तो कशाला क्षुद्र सुखामागं धावेल? त्यात गुंतून पडेल? तो कशाला काही वेळानंतर उतरणाऱ्या नशेचा आधार घेईल? ‘मस्त’ असण्याचा अनुभव आल्यावर सुख-दुःखाचं द्वंद्व विरून जातं, क्षुद्रतेचं आकर्षण नाहीसं होतं. सुख-दुःखाची आंदोलनं सांगण्यासाठी कुणा दुसऱ्याच्या उपस्थितीची गरज वाटत नाही. एकांताच्या वलयरहित सरोवरात हा प्राणाचा हंसपक्षी मस्त विहरत असतो…

तेरा साहिब है घर माहीं,

बाहर नैना क्यों खोले।

कहै कबीर सुनो भाई साधो,

साहिब मिल गए तिल ओले।

आपल्या बोलण्यात कुणी दुसरा अध्याहृत असतो. बोलणं बाहेरच्या जगाशी असलेल्या संपर्कातून घडतं. याचाच अर्थ आपण बहि:र्मुख असतो. केवळ इंद्रियांच्या आधारानं जगणं अनुभवत असतो. पण, आपल्या असण्याचा शुद्ध आनंद आपण बाहेरच्या जगात घेऊ पाहतो, तेव्हा गफलत होते. कशावरही अवलंबून नसलेला, शब्दांतून व्यक्त करण्याची गरज नसलेला हा नुसतं असण्याचा आनंद कबीरांच्या मते ईश्वरस्वरूप असतो. हाच हृदयाच्या घरात निरंतर वास करणारा ‘साहिब’ असतो. त्याला पाहण्यासाठी डोळे उघडून बाहेर पाहण्याची गरजच काय?

स्वतःला आलेला हा ‘मस्त’ असण्याचा अनुभव कबीर म्हणतात की केवळ दृष्टी निरंजन असल्यानेच येतो. तिळाएवढाही दर्शन झाल्याचा अहंकार दृष्टीत नसतो, तेव्हाच आपल्या हृदयातील ‘साहिब ’ इंद्रियांशिवाय जाणवतो. कबीरांच्या दृष्टीनं हेच ‘मस्त’ असणं असतं. सुख-दुःखांच्या आंदोलनांनी सतत विचलित होणाऱ्या आपल्यासाठी हा ‘मस्ती’त जगण्याचा कबीरांचा बोध आपल्याला अहंकारापलीकडं घेऊन जाणारा, निखळ आनंदाचा होऊ शकतो.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link