कबीररंग: गुरू गोविन्द दोउ खडे, काको लागूं पाय…

0
20
कबीररंग:  गुरू गोविन्द दोउ खडे, काको लागूं पाय…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Guru Govind Dou Khade, Kako Lagun Pay | Kabirrang Divya Marathi Written By Hemkiran Patki

हेमकिरण पत्की30 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भवतालाच्या, प्रदेशाच्या माहितीविषयी, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी, कला आणि संस्कृती या विषयावरच्या पुस्तकांतून मिळालेल्या ज्ञानाविषयी आपल्याला किती अहंकार असतो! या सगळ्या ज्ञानाला आपण मनात जपून ठेवत असतो. बाहेरून आत प्रवेशलेल्या उधार-उसनवारीच्या नुसत्या शब्दज्ञानाचं मनाला ओझं होतं, याची जाणीव कधी आपल्याला होते का? हे शब्दज्ञान आपल्याला आकाशात उंच उडू देत नाही. प्राकृतिक बंधनांतून मोकळं होऊ देत नाही. कबीर आपल्या मनाची ही स्थिती जाणतात. आपण प्राकृतिक किंवा परिस्थितीतून निर्माण झालेल्या बंधनांतून मोकळं होऊन साधंसरळ माणसाचं जीवन जगावं. शब्दांतले व्यवहार आहे तसे ठेवून, त्या पलीकडच्या खऱ्या जीवनाचा अनुभव घ्यावा, असं कबीरांना वाटतं.

आपण साधारणपणे कधी जवळपासच्या माणसांचा, कधी आध्यात्मिक पुस्तकांचा, तर कधी आपल्याच मान्यतांचा मानसिक आधार घेत जगत असतो. पण संकटांत, आघात-अपघातात किंवा आपल्यातल्याच विकार-वासनांच्या वादळांमध्ये आपण धीर धरून जगू शकू असं मन आपल्याकडं कुठं असतं? ते ज्याच्याकडं असतं त्याला कबीर गुरू म्हणतात.

कबीरांच्या अनुभूतीतून आपल्याला एक जीवनबोध घडतो : गुरू नुसता शिक्षक नसतो. समाजानं दिलेल्या मान्यता गुरू हा शिष्याकडून काढून घेत असतो. तथाकथित समाज-धारणांपासून तो शिष्याला मोकळं करत असतो. शाब्दिक ज्ञानानं भरलेल्या शिष्याचं मन रिकामं करत असतो. कबीर आपल्या दोह्यांतून सांगतात की, गुरू शिष्याला निर्भार करतो. गुरूचं हे महत्त्व कबीरांच्या दोह्यांतून ओसंडून वाहतं…

गुरू कुम्हार सिष कुंभ है, गढ गढ काढै खोट। अंतर हाथ सहार दै, बाहर बाहै चोट।।

या दोह्याच्या ओळी अर्थाच्या सुंदरतेनं भारावलेल्या आहेत. गुरू कुंभार आहे आणि शिष्य घट आहे. गुरू शिष्याला घटाचा आकार का देतो? त्याचं रितं हृदय तहान निवारणाऱ्या जीवनानं भरून जावं म्हणून. गुरूच्या सान्निध्यात येण्याआधी शिष्याचं हृदय शून्यतेनं भरलेलं असतं. कबीरांचं निरीक्षण पाहा : फिरत्या चाकावरल्या मातीच्या गोळ्याला कुंभार आधी हातांनी आतून आधार देतो. बाहेरून त्यावर आघात करत राहतो. खरा शिष्य कुंभाराची ही कृती कुंभाराच्या डोळ्यांनी निरखतो. त्याला घटाला आतून दिलेला आधार दिसतो आणि घट तयार होताना बाहेरून केलेला आघातही दिसतो. हा आघात त्याला प्रीतीकर वाटतो, वेदना देणारा वाटत नाही. घटात पाणी भरलं जावं, यासाठी हा बाहेरचा आघात किती महत्त्वाचा असतो ते शिष्य जाणतो.

अंतःकरण अबाधित राहावं, भौतिक जगाचा जीवनविरोधी संस्कार त्यावर होऊ नये, हीच तर गुरूची बोध घडवण्याची रीत असते. शिष्याला मात्र आपलं मृण्मयी असणं उमजायला हवं.

गुरू गोविन्द दोउ खडे, काको लागूं पाय। बलिहारी गुरू आपने, जिन गोविन्द दियो बताय।।

कबीर हे जाणतात की, शिष्याच्या आयुष्यात त्याच्या मनाला द्विधा करणारी स्थिती समोर अचानक उभी राहू शकते. गुरू आणि गोविंद दोघेही एकाच वेळेला समोर येऊ शकतात, तेव्हा कुणाच्या पायांवर पहिल्यांदा माथा टेकवायचा? या स्थितीत कबीर सांगतात की, गुरूच्या पायांवर माथा टेकवायचा. गुरूच्या आध्यात्मिक संकेतामुळं शिष्य भ्रामक गोष्टींपासून, निरर्थक सामाजिक मान्यतांपासून दूर झालेला असतो. गुरूच्या दृष्टीत सर्वत्र व्यापून राहिलेलं चैतन्य असतं. आतलं-बाहेरलं असा भेद नसतो.

ईश्वराहून उंच अशा स्थानावर कबीर गुरूला नेऊन ठेवतात. या भौतिक जगाचा कायमचा निरोप घेताना गुरूनं केलेला चैतन्य-दर्शनाचा संकेत शिष्याच्या दृष्टीत, हृदयात असतो आणि तोच ईश्वर-स्वरूप असतो.

गुरू को सिर पर राखिए, चलिए आज्ञा माहिं। कहै कबीर ता दास को, तीन लोक डर नाहिं।।

आपल्यातील संवेदनेला विकसित करून, चेतनेला उंच करून माणूसपणाची पातळी शुद्ध ठेवण्यासाठी गुरूची आवश्यकता आहे, हे कबीरांनी दोह्यांतून सूचित केलं आहे. आपल्या मनानं निर्माण केलेल्या जगाला समजून घेण्यासाठी, त्या पलीकडचं चैतन्य हृदयाला उमजावं यासाठी ‘मी’पणाच्या करकचून टाकणाऱ्या बंधनांना आहे तसं पाहायची दृष्टी देणाऱ्या गुरूचा आधार कबीरांना महत्त्वाचा वाटतो.

बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता महत्त्वाची असतेच ; पण त्या पलीकडचं एक जग गुरू दाखवतो. ते कुठलाही कुतर्क न करता, संदेह न बाळगता किंवा मनाविरुद्ध असलं, तरी गुरूची आज्ञा प्रमाण मानून जगणं, हे शिष्याच्या आज्ञाधारकतेचं लक्षण असतं. कबीर म्हणतात, माझं दास असणं हे असंच आहे. शिष्याच्या जाणतेपणाहून गुरू खूप व्यापक जीवन जगणारा असतो. त्यामुळं गुरूला शिरोधार्य मानायला कसली हरकत? कबीर म्हणतात, शिष्यानं गुरूची आज्ञा धारण करताच शिष्याची बुद्धी आणि विवेक गुरूच होऊन जातो. मग त्याला त्रिलोकात कशाचं भय राहत नाही. ईश्वराच्या शोधवाटेवर गुरू वाटाड्या होतो आणि शिष्य आत्मदृष्टीनं सत्याचं दर्शन घेत राहतो…

(संपर्क- hemkiranpatki@gmail.com)



Source link