Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रडायरीची पाने: इसूमामा

डायरीची पाने: इसूमामा

[ad_1]

इंद्रजित भालेराव8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

बांगड्या भरून झाल्या की, इसूमामा त्या बाईला हात जोडत आणि ती बाईही त्यांना हात जोडायची. मग इसूमामा पुढच्या घरी निघून जायचे.

पंचमी, दिवाळी, संक्रांत यांसारख्या सणांच्या आसपास इसूमामा हयातनगरहून आमच्या गावी येत असत. त्यांचं हयातनगर हे गाव आमच्या गावाच्या पूर्वेला सहा किलोमीटरवर होतं. ते घोड्यावर बसून येत. दोन्ही बाजूला काकणांचे पेटारे लटकवून घोड्यावर ते बसलेले असायचे. इसूमामाचं घोडं दिसलं की आडावर धुणं धुणाऱ्या बाया एकमेकींना.. ‘इसूमामा आला, इसूमामा आला..’ असा सांगावा द्यायच्या. त्या दिवशी दिवसभर इसूमामा घरोघरी जात बायांना काकणं भरायचे. गावात आल्याबरोबर घोड्याला कळवा घालून ते गावखरी सोडून देत. संध्याकाळी जाताना हे घोडं मोठ्या आनंदात मालकाला पाठीवर घेऊन जायचं. परतताना काकणांचं ओझंही कमी झालेलं असे.

सणावाराला आलेल्या लेकीबाळी या घरच्या बायांसारख्या सगळं काम उरकून गडबडीनं शेताला जाणाऱ्या नसत. त्या दिवसभर आपापल्या माहेरघरीच असत. त्यामुळं एकीचं झालं की एक अशी सगळ्या घरी, सगळ्या लेकीबाळींना काकणं भरत इसूमामा फिरायचे. बांगडी, बिल्लोर, चुडा या शब्दांना आमच्याकडं ‘काकणं’ हा पर्यायी शब्द होता. हा निजामाचा प्रदेश असल्यामुळं हिंदी-उर्दूच्या प्रभावातून ‘कंकण’ या शब्दाचाच ‘काकणं’ हा मराठवाडी शब्द तयार झाला असावा. काकणं भरायला इसूमामा बैठकीत येऊन बसत, तेव्हा आधी माय त्यांना चहापाणी, जेवणाचं विचारी. ते झालं की मग आमची एकेक बहीण इसूमामासमोर बसून काकणं पसंत करीत असे. हव्या त्या रंगाची, हव्या त्या सजावटीची काकणं निवडली जात. पसंत केलेली काकणं भरण्यापूर्वी इसूमामा नमस्कार केल्यासारखे हात जोडून समोर बसलेल्या बहिणीच्या हात हातात घेऊन, मनगटाच्या आकाराचा अंदाज घेऊन, त्यांनी सांगितलेल्या रंगाच्या बांगड्यांचा पेटारा बाहेर काढीत आणि एक एक बांगडी मनगटावर चढवत. या बाया कधीच कोण्या परक्या पुरुषासमोर डोळा उचलून वर पाहात नसत. पण, कासाराला मात्र नि:संकोचपणे आपला हात हातात देत असत. त्याचं कारण त्या दोघांचं नातं बहीण-भावाचं समजलं जात असे. त्या संदर्भात आई जात्यावर ओवी म्हणायची…

कासार माझा दादा

माझ्या माईच्या गावचा

येरे दादा भर चुडा

नंदी देते मी गाईचा।

कासारा माझ्या दादा

तुव्हं मव्हं काय नातं

बांगडीसाठी देते

भाऊ हातामधी हात।

भरल्या बाजारात

कासार झाला मायबाप

बाई माझी ती सावळी

चुड्याला देती हात।

बारीक बांगडी

माझ्या मनगटी दाटती

भावासारखे सज्जन

मला वैराळ भेटती।

हाताच्या पंजामधून बांगडी आत नेणं मोठं अवघड जात असे. पण, इसूमामा त्यात वाकबगार होते. हात दुखू न देता, बांगडी टिचू न देता ते बांगड्या चढवत. पण, एखाद्या बाईचा हातच जड असेल, तर तेही थकून जात. त्यांच्या अनेक बांगड्या फुटत. एखाद्या बांगडीचा पिचकोर बाईच्या मनगटालाही रुतत असे. त्या बाईच्या डोळ्यात टचकन् पाणी येत असे. तेव्हा इसूमामाही कळवळायचे. पण, असं क्वचित होत असे. बांगड्या भरून झाल्या की इसूमामा त्या बाईला हात जोडत आणि ती बाईही त्यांना हात जोडायची. मग इसूमामा पुढच्या घरी निघून जायचे. देण्याघेण्याचा व्यवहार जो काही ठरलेला असेल तो वडील घरी असतील तर ते नाही तर आई पूर्ण करीत असे. वडील घरी नसतील आणि आईला शक्य नसेल, तर पुढच्या वेळी तो हिशेब पूर्ण केला जायचा. त्यासाठी इसूमामा कधी अडून बसायचे नाहीत. टिचलेल्या बांगड्या ते हिशेबात धरत नसत.

कधी कधी इसूमामा लवकर यायचे नाही आणि माझी वाखारीची बहीण चतुरबाई जाण्याची घाई करीत असे. तेव्हा तिच्या सासरच्या रस्त्यावरच इसूमामाचं गाव असल्यामुळं जाताना त्यांच्या घरून बांगड्या भरून ती पुढं जायची. एक-दोनदा तिच्यासोबत मीही इसूमामाच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांचं हयातनगरमधलं साधं पत्र्याचं घर मी पाहिलं होतं. असं क्वचितच इसूमामाच्या घरी जावं लागत असे. सणावाराशिवाय आठवड्यातला एक दिवस इसूमामांनी आमच्या गावासाठी राखून ठेवला होता. त्या दिवशी ते येत आणि सगळ्या लेकीबाळींना बांगड्या भरून जात. काही घरांमधून नवऱ्याच्या मारझोडीतही बायकांच्या बांगड्या फुटत. अशा फुटल्या-टिचलेल्या बांगड्या पुन्हा भराव्या लागत. काही घरी सवाष्णी घालण्याचा कार्यक्रम असे, तेव्हा त्यांनाही बांगड्या भराव्या लागत. लग्नसमारंभात तर सर्वच वऱ्हाडणींना बांगड्या भरल्या जात. तेव्हा इसूमामा खूप पेटारे घेऊन गावी यायचे. लग्नसराईतल्या तारखा लक्षात ठेवून त्यांना यावं लागायचं. कारण सगळ्या बायका त्यांच्या भरवशावर बसत. इसूमामाही कधीच कुणाची बेजारी होऊ द्यायचे नाहीत. कधी कुणाच्या घरी अचानक काही कार्यक्रम ठरला तर मी हयातनगरच्या शाळेत होतो, तेव्हा इसूमामांना निरोप देण्याचं काम करीत असे. आणि तेही वेळेवर येऊन सगळ्या बायकांना बांगड्या भरून जात.

पुढं पुढं इसूमामांचा व्याप वाढल्यानं त्यांना सारखं सारखं येणं जमेना. त्यामुळं त्यांनी आपल्या आईला आमच्या गावात आणून भिवराबाईंच्या घरी ठेवलं होतं. बांगड्यांचे काही पेटारे इसूमामा तिच्याजवळ ठेवून जात. त्यांची वृद्ध आई भिवराबाईंच्या गोठ्यात एका कोपऱ्यात राहायची. तिची भिवराबाईंच्याच घरी जेवणाची व्यवस्था केली होती. ती बिचारी आनंदानं आमच्या गावात राहायची. भिवराबाईंनाही त्या म्हातारीची सोबत होत असे. पुढं खूप थकल्यावर इसूमामा आपल्या आईला घेऊन गेले. मग त्यांचा मुलगा येऊ लागला. बाकी इतर गोष्टींमध्ये वस्तुविनिमय चालत असे. पण, बांगड्या मात्र पैसे देऊन भराव्या लागत. कारण इसूमामांना त्या बांगड्या नगद पैसे देऊन आणाव्या लागत. त्यामुळं तेही त्यांचा भाव ठरवून पैसे घेत. आमच्या गावात इसूमामानंतर आता कोण बांगड्या भरायला येतो, हे अलीकडं गावाशी संपर्क नसल्यामुळं मला माहीत नव्हतं. परवा पुतण्याच्या लग्नासाठी भावाने सगळ्या वऱ्हाडणींना बांगड्या भरायला सांगितल्या, तेव्हा मी तिथंच होतो. तीन जण पेटारे घेऊन आले होते. लेकीबाळी बांगड्या पसंत करुन त्या भरुन घेत होत्या. मी बाहेर येऊन उभा राहिलो आणि ‘हे कुठले कासार आहेत?’ अशी चौकशी केली. तेव्हा समजलं की ही इसूमामांचीच मुलं आहेत. या तिघांपैकी वयस्कर असलेला एक जण इसूमामाचा मुलगा होता आणि बाकीचे दोघे त्याची मुलं, म्हणजे इसूमामांची नातवंडं होती. आता तिसऱ्या पिढीनेही आमच्या गावाशी नातं टिकवून ठेवलेलं दिसत होतं.

इसूमामा यांचं नाव मुळामध्ये विश्वनाथ असेल, असं मला लहानपणी वाटायचं. पण, ते तसं नव्हतं. इसूमामा मुस्लिम होते. त्यांचं नाव कदाचित इसहाक खान असं काहीतरी असावं. पण, आमच्या गावातल्या सगळ्या बायका त्यांना ‘इसूमामा’ असंच म्हणत आणि तेही सगळ्यांना ‘मायबाई, मायबाई’ म्हणायचे. त्यांचा वेश मात्र पायघोळ चोळणा, वरती शर्ट, मेहंदी लावलेली दाढी असा असायचा. पण, असा वेश मुस्लिम बांधवांचा असतो, हेही तेव्हा माहीत नव्हतं. एकमेकांविषयी जराही परकेपणा न वाटावा इतके ते आमच्या गावाशी एकरूप झाले होते.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments