Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: 'मदनजीत सिंग' शांतता, समृद्धीचा ‘सदिच्छा दूत’

वेध मुत्सद्देगिरीचा…: ‘मदनजीत सिंग’ शांतता, समृद्धीचा ‘सदिच्छा दूत’

वेध मुत्सद्देगिरीचा…:  ‘मदनजीत सिंग’ शांतता, समृद्धीचा ‘सदिच्छा दूत’

[ad_1]

डॉ. रोहन चौधरी6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताच्या दक्षिणेकडील पुदुच्चेरी या शहरातील सुंदर अशा पूर्व किनारपट्टी रस्त्यावर पाँडेचरी विद्यापीठाच्या आवारात ‘युनेस्को मदनजीत सिंग इन्स्टिटयूट ऑफ साऊथ एशिया रिजनल को-ऑपरेशन’ या नावाचे अभ्यास केंद्र आहे. दक्षिण आशियामध्ये शिक्षण आणि संशोधनाद्वारे शांतता व समृद्धी प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाने २०१२ मध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते या अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रात पाकिस्तान वगळता भूतान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ आणि भारत या देशांतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लिंग समानतेवर आधारित विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत होती. दक्षिण आशियातील देशांच्या सहकार्याने यशस्वी ठरलेल्या या योजनेचे संपूर्ण श्रेय जाते, ते ‘युनेस्को’चे सदिच्छा दूत असणाऱ्या मदनजीत सिंग यांच्या दूरदृष्टीला.

एखाद्या मुत्सद्द्याच्या नावाने संपूर्ण अभ्यास केंद्र स्थापन होणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. परंतु, मदनजीत सिंग यांच्या कारकिर्दीचा वेध घेतल्यास या गोष्टीचे मुळीच आश्चर्य वाटणार नाही. रोम विद्यापीठात ‘बौद्ध कला आणि संस्कृतीचा इतिहास’ तसेच ‘युरोपियन कलेचा इतिहास’ यावर केलेल्या अभ्यासामुळे कला आणि संस्कृती यांचे मानवी जीवनात असणारे महत्त्व मदनजीत सिंगांना उमगले होते. या जाणिवेतूनच मुत्सद्देगिरी म्हणजे निव्वळ राजनयिक व्यूहरचना किंवा शह-काटशह नव्हे, तर कला-संस्कृती-इतिहास यांना एकाच धाग्यात गुंफून समाजाला सर्जनशील बनवणे या गोष्टीचाही मुत्सद्देगिरीत अंतर्भाव होतो, हे त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत दाखवून दिले.

भारतीय परराष्ट्र सेवेत १९५३ च्या दरम्यान सामील झालेले मदनजीत सिंग १९८४ पर्यंत तेथे कार्यरत राहिले. या काळात त्यांनी इटली, युगोस्लाव्हिया, ग्रीस, लाओस, स्वीडन, डेन्मार्क, स्पेन, सोव्हिएत महासंघ, दक्षिण व्हिएतनाम, कोलंबिया, युगांडा, रवांडा, बुरुंडी आणि फिनलँडमध्ये राजदूत म्हणून सेवा बजावली. परंतु, १९८२ ते १९८५ हा त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्ण अक्षराने नोंदवण्यासारखा काळ ठरला. या काळात त्यांची निवड ‘युनेस्को’मध्ये सांस्कृतिक विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली. १६ नोव्हेंबर १९४५ ला स्थापन करण्यात आलेली ‘युनेस्को’ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगात शांतता व सुरक्षितता कायम करण्याचे कार्य ही संस्था पार पाडते.

यावरून मदनजीत सिंग यांना दिलेल्या जबाबदारीचे महत्त्व लक्षात येते. या काळात त्यांनी मानवजातीचा वैज्ञानिक आणि सांस्कृतिक इतिहास, आफ्रिकेचा इतिहास, कॅरेबियन इतिहास, मध्य आशियाच्या संस्कृतीचा इतिहास आणि सेल्टिक भाषांचा इतिहास यांचे सखोल अध्ययन केले. या अभ्यासातून मानवी जीवन आणि संस्कृती यांचा शांतता व समृद्धीशी थेट संबध आहे, हा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान तुरुंगावास पत्करणाऱ्या मदनजीत सिंग यांच्या शांततेप्रति असणाऱ्या निष्ठेची दखल ‘युनेस्को’च्या कार्यकारी मंडळानेही घेतली. महात्मा गांधींच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘युनेस्को’ने सहिष्णुता आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मदनजीत सिंगांच्या नावाने बक्षिसाची घोषणा केली. १६ नोव्हेंबर २००० या दिवशी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवसाचे औचित्यसाधून संयुक्त राष्ट्राने त्यांची ‘युनेस्कोचा सदिच्छा दूत’ म्हणून निवड केली. २००६ मध्ये भारत सरकारनेही त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचे योजले होते. परंतु, स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळालेल्या ताम्रपत्रापेक्षा दुसरा कोणताच मोठा सन्मान असू शकत नाही, असे सांगून त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.

निवृत्तीनंतरही मदनजीत सिंगांची शांततेविषयी असणारी निष्ठा अधिक बळकट झाली. दक्षिण आशियाचे अस्तित्व आणि भविष्य पूर्णपणे प्रादेशिक सहकार्यावर अवलंबून आहे, याबद्दल त्यांच्या मनात थोडीही शंका नव्हती. या सहकार्याचा मार्ग हा शिक्षण आणि संशोधनातूनच जातो, ही त्यांची ठाम धारणा होती. या उद्देशातूनच त्यांनी ‘साउथ एशियन फाउंडेशन’ची स्थापना केली. पुदुच्चेरीतील अभ्यास केंद्र हे या संस्थेचे फलित आहे. २०१० मध्ये ‘युनेस्को’ने या शैक्षणिक उपक्रमाशी स्वतःला जोडून घेतले. या संस्थेच्या अफगाणिस्तानातील उपक्रमाची दखल स्वतः राजा झहीर शाह आणि हमीद करझाई यांनी घेतली आणि दक्षिण आशिया फाउंडेशनचे सदस्यत्व स्वीकारले. आपल्या वडिलांचा विचार आणि वारसा जिवंत ठेवण्यासाठी मदनजीत सिंगांचे चिरंजीव जीत सिंग यांनी, स्वत: स्थापन केलेल्या अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी ‘आर्ट टेक्नॉलॉजी ग्रुप’चे शेअर्स विकून फाउंडेशनला मोठ्या प्रमाणात देणगी दिली. आज बांगलादेशसह संपूर्ण आशियात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, मदनजीत सिंग यांच्यासारख्या सदिच्छा दूताची कधी नव्हे इतकी उणीव भासत आहे.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments