Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रडायरीची पाने: आमच्या गावचा पीर

डायरीची पाने: आमच्या गावचा पीर

[ad_1]

इंद्रजित भालेराव6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आमच्या या पिराचे गावाबाहेर कुणी भक्त असतील, याची कल्पना मी केलेली नव्हती. कधी कधी आपल्या जवळच्या खूप गोष्टी आपल्याला माहीत नसतात.

आमच्या त्या लहानशा गावात मुस्लिम बांधवांचं एकही घर नव्हतं. पण, आमच्या गावात एक पिराचं ठाणं मात्रं होतं. अगदी मारुती मंदिराच्या समोरच ते होतं. मारुती मंदिराचं जुनं, साधं जोडणीचं बांधकाम होतं, त्यासमोर हे पिराचं धाब्याचं ठाणं होतं. नंतर मारुती मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पिराच्या ठाण्याचा कोणी जीर्णोद्धार केला नाही. उलट होतं ते धाबं आता पडून गेल्यानं गावचा पीर उघड्यावर बसला आहे. पूर्वी गावात एकही मुस्लिम घर नव्हतं, तरी नंतर गावकऱ्यांनी एका मुस्लिमाला पिरासमोरच जागा दिली आणि तो पीर त्याच्या हवाली करून टाकला. त्या आधी हा पीर सगळ्या गावाचा होता. गावातले लोक या पिराला नवसही करायचे. आणि विशिष्ट दिवशी गावातले सगळे जमा होऊन या पिरासमोर धुलादेखील करीत असत.

धुला रे धुला

रहमलधुला..

सांच्याला पीठ नाही,

मलिदा केला…

असं गाणं म्हणत लोक धुला खेळायचे. या पिराचं वैशिष्ट्य म्हणजे, पिराचा नैवेद्य मलिद्याचाच असायचा. आमच्या गावात कुणीही मांसाहारी नसल्यामुळं त्याच्यासाठी हा पर्यायी नैवेद्य असावा. आमच्या हिंदूंच्या इतर कुठल्याच देवाला मलिदा हा नैवेद्य नव्हता. त्यामुळं बऱ्याचदा आमच्या घरीही पिरासाठी मलिदा केला जायचा. मलिदा म्हणजे गरम पोळी कुस्करून त्यात तूप आणि गुळ टाकून त्याचा लाडू तयार करणे. मलिदा खायला खूपच चवदार लागायचा. त्यामुळं या पिराच्या निमित्तानं घरात नैवेद्य झाला की, तो आम्हाला खायला मिळायचा. लहानपणी कधी कधी मीही हा नैवेद्य घेऊन जायचो आणि आमच्या घरच्या महानुभावांच्या देवाला जसा नैवेद्य दाखवायचो तसाच तिथं पिरालाही तो दाखवायचो. या मलिदा पदार्थावरून मराठीत अनेक वाक्प्रचार तयार झाले आहेत. खातो काय मलिदा, तो लई मलिदाखाऊ आहे, मलिदा मलिदा तू खातो आणि खरडन आम्हाला देतो.. असे काही वाक्प्रचार आमच्या गावातच मी ऐकले आहेत.

छोटसं मातीचं धाब्याचं एक घर होतं आणि त्यामध्ये हा पीर होता. म्हणजे पिराचा मातीचा ओटा होता. त्यावर हिरवा गलफ टाकलेला असायचा. मोरपिसाचा एक मोर्चल ठेवलेला असायचा. या गाभाऱ्यात गेलं की, नेहमीच उदाचा आणि धुपाचा वास यायचा. पिराच्या ठाण्यासमोर मोठमोठी लिंबाची झाडं होती. झाडांच्या मधोमध खोलगट जागा होती. ते एक बऱ्यापैकी मोठं पटांगणच होतं. तिथं आम्ही मुलं लिंबाच्या सावलीला खेळ मांडून बसायचो. पण, ही माझ्या खूप लहानपणची गोष्ट आहे. पुढं माझं तिकडं जाणं हळूहळू बंद झालं. गावातली कट्टरता वाढत गेली. महानुभाव, वारकरी पंथ त्यांच्या देवाविषयी कडवे झाले आणि पिराची भक्ती करणारे लोक कमी झाले. एकेकाळी एका मुस्लिम बांधवाला मुद्दाम गावात आणून त्याच्या हवाली केलेला पीर पुढं फक्त मुस्लिमांचाच राहिला.

आमच्या गावात मुस्लिम घर नसलं, तरी शेजारी असलेल्या वडगावच्या शिवारात निजामाच्या काळात जहागीरदार राहत होता. तिथं शिवारातच त्यानं चांगलं घर बांधलेलं होतं. त्या काळात त्याचा खूप दरारा असायचा. ही सगळी आम्हाला कळायच्या आधीची गोष्ट. आमचा तेव्हा जन्मही झालेला नव्हता. फाळणीनंतर हा जहागीरदार पाकिस्तानात पळून गेला. नंतर त्याच्या या जमिनी आमच्याच गावच्या लोकांनी विकत घेतल्या. त्यात काही जमीन आमच्या वडिलांनीही विकत घेतलेली होती. बाराभाई आणि कासमाची पट्टी अशी त्या शेताची नावं होती. तिथं औताला पासेला, फाळाला लागून बऱ्याच गोष्टी निघायच्या. कधी बंदुकीची नळी निघायची, कधी पिस्तूल निघायचं, तर कधी आणखी काही निघायचं. या सगळ्या त्या जहागीरदाराच्या खुणा होत्या. कधी तरी सोन्याच्या मोहरांचा हंडाही निघतो की काय, याची वाट लोक पाहायचे.

हा जहागीरदार रझाकारीनंतर तिथून पळून गेला. कारण तिथं राहत असताना त्यानं दहशतीनं बऱ्याच लोकांवर अन्याय केलेला होता. त्यामुळं नंतर त्याला पळून जाणं भाग पडलं. पण, वडील सांगतात की, आमच्या गावच्या दत्तात्रयाची आणि पिराची जत्रा या जहागीरदारानंच सुरू केली होती. पिराची जत्रा जहागीरदारांनं सुरू केली, हे आपण समजू शकतो. पण मग दत्तात्रयाची जत्राही त्यानं का सुरू करावी? त्यामागचं कारण आज माझ्या लक्षात येतं. आमच्या गावाच्या पूर्वेला दहा मैलांच्या अंतरावर हयातनगर नावाचं एक मोठं गाव होतं. तिथं मुस्लिमबहुल वस्ती होती. इकडच्या परिसरातल्या वेगवेगळ्या जत्राखेत्रांमधून फिरणारे बहुतेक सगळे व्यापारी हे तिथले होते. त्या काळात गावोगाव बाजार भरत नसत. जत्रा हाच सगळ्यात मोठा बाजार असे. त्यामुळं तिथं खरेदी-विक्री चांगली व्हायची. बहुतेक या जहागीरदारानं त्या मुस्लिम व्यापाऱ्यांना संधी मिळावी म्हणून आमच्या गावात या दोन जत्रा सुरू केल्या होत्या. अशा जत्रा त्यानं त्याच्या जहागिरीत इतरत्रही सुरू केल्या होत्या.

आमचा हा पीर फारसा प्रसिद्ध नाही. त्यामुळं आमच्या गावाबाहेर या पिराचे कुणी भक्त असतील, याची कल्पना मी केलेली नव्हती. पण, माझ्या ज्ञानोपासक महाविद्यालयातील शेवटच्या काळातला माझा विद्यार्थी गणेश घनसावंत एकदा त्याच्या मामांना घेऊन माझ्याकडं आला. तेव्हा त्याच्या मामांनी सांगितलं, ‘तो पीर आमचं कुलदैवत आहे. त्या पिराला आम्ही नवस करतो. तो फेडायला नेहमी तिथं येतो. आमच्या कुटुंबात लग्न झालेले नवीन नवरदेव-नवरी अजूनही देवाच्या पाया पडायला तिथंच जातात.’ त्याच काळात कधीतरी त्यांनी आमच्या गावच्या गंगा डाकूला पाहिलेलं होतं, असंही गणेशच्या मामांनी मला सांगितलं. गणेशचे मामा म्हणजे इकडचे खूप दूरचे. परभणीच्याही पलीकडचे. त्या काळात तिथपर्यंत आमचा पीर पोहचलेला होता आणि आमच्या पिराचे भक्तही पसरलेले होते, असा त्याचा अर्थ होतो. कधी कधी आपल्या जवळच्याच खूप गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्या माहीत करून घेण्याची कधी गरजही पडत नसते. पण, कधीतरी अपघातानं या गोष्टी कळतात.

त्या काळात हा पीर म्हणजे मुस्लिमांचा देव आहे, हेही आम्हाला माहीत नव्हतं. गावात कुणीच मुस्लिम नसल्यामुळं आणि आम्ही कधीच गावाच्या बाहेर जात नसल्यामुळं त्यांच्याविषयी आम्हाला फारसं माहीत नव्हतं. गावात येणारा मणेरी, कासार, डाकेकरी मात्र मुस्लिम होते. हयातनगरवरून घोड्यावर माल घेऊन यायचे आणि गावात दुकान मांडायचे. तेवढ्यापुरतेच ते माहीत असायचे. पण, तेही नंतर कळू लागलं. खूप लहानपणी ते कळण्याचा प्रश्नच नव्हता. इसूमामा असं कासाराचं नाव होतं. बाकी दोघांची नावंही माहीत नव्हती.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments