Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: 'चंद्रशेखर दासगुप्ता' वास्तववादी संशोधक

वेध मुत्सद्देगिरीचा…: ‘चंद्रशेखर दासगुप्ता’ वास्तववादी संशोधक

[ad_1]

डॉ. रोहन चौधरी4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय परराष्ट्र धोरणातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या काळात म्हणजेच १९६२ मध्ये चंद्रशेखर (शेखर) दासगुप्ता यांनी देशाच्या परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. त्यानंतरच्या काळात परराष्ट्र धोरणाला नवी दिशा देण्याची गरज होती. अशा स्थितीत दासगुप्ता यांनी काश्मीरपासून बांगलादेशपर्यंत आणि युरोपियन महासंघापासून ते हवामानातील बदलापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपले कौशल्य या धोरणाला दिशा देण्यासाठी वापरले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत भारत सरकारने २००८ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला. परंतु, इतिहासात त्यांची ओळख ही निष्णात मुत्सद्दी इतकीच न राहता परराष्ट्र धोरण विषयातील एक वास्तववादी संशोधक म्हणून राहील. दासगुप्ता यांनी लिहिलेली ‘वॉर अँड डिप्लोमसी इन काश्मीर’ आणि ‘इंडिया अँड बांगलादेश लिबरेशन वॉर’ ही दोन पुस्तके भारतीय आणि जागतिक राजकारण, इतिहास, सुरक्षा, परराष्ट्र धोरण यांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने वाचावी, अशीच आहेत. या पुस्तकांनी भारतीय समाजात प्रचलित असलेले बरेचसे गैरसमजही दूर केले आहेत.

ब्रिटिश अभिलेखातील संदर्भ, पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे तपासून दासगुप्ता यांनी आपले पहिले पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या युद्धावर आधारित आहे. जनरल लॉकहार्ट आणि जनरल बुचर यांच्यावर भारतीय सैन्याची जबाबदारी असूनही काश्मीर युद्धात ब्रिटिश साम्राज्याच्या हिताचे कसे रक्षण केले गेले, याचे विस्तृत वर्णन दासगुप्ता यांनी त्यात केले आहे. १९४९ मध्ये भारतीय सैन्याला पूँछ आणि मीरपूर येथे जाण्याची परवानगी दिली असती, तर आज भारत-पाकिस्तान यांच्यातील कळीचा मुद्दा बनलेली ‘प्रत्यक्ष ताबा रेषा’ वेगळी असती, असा दावा दासगुप्ता यांनी केला आहे. भारत-पाकिस्तान संघर्ष हा जितका द्विपक्षीय आहे, त्यापेक्षा जास्त त्याला जागतिक राजकारणाच्या गुंतागुंतीची झालर आहे, हे त्यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले. त्याचबरोबर, ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्यवादी वृत्तीची प्रचिती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही कशी दिली, याचे विस्तृत वर्णन या पुस्तकात आढळते.

बांगलादेशवरील दुसऱ्या पुस्तकातही दासगुप्ता यांनी आत्तापर्यंत न उलगडलेले पैलू जगासमोर आणले आहेत. बांगलादेश युद्धात इंदिरा गांधींनी आखलेले डावपेच किती परिणामकारक होते, याचे विस्तृत संदर्भ त्यात सापडतात. त्याचप्रमाणे, काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्नही दासगुप्तांनी केला आहे. त्यापैकी एक फिल्ड मार्शल माणेकशा यांच्याविषयीचा आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या माणेकशा यांच्यावरील चित्रपटातही हा संदर्भ देण्यात आला आहे. फिल्ड मार्शल माणेकशा यांनी १९७१ च्या एप्रिलमध्ये श्रीमती गांधींना भारतीय सैन्य पूर्व पाकिस्तानात पाठवण्यापासून परावृत्त केले होते, असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु, दासगुप्ता यांनी मूळ कागदपत्रांच्या हवाल्याने असा दावा केला आहे की, त्या एप्रिलमध्ये काही कॅबिनेट सदस्यांच्या दबावाखाली असतानाही इंदिरा गांधींनी बांगलादेशत हस्तक्षेप करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. जागतिक समुदायाचे लक्ष बांगलादेशऐवजी भारत – पाकिस्तान युद्धावर केंद्रित होईल आणि बांगलादेशला मिळणारी सहानुभूती कमी होईल, असा इंदिरा गांधी यांचा कयास होता. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय कायदा भारताला अनुकूल व्हावा, अशीही त्यांची इच्छा होती.

या पार्श्वभूमीवर, इंदिरा गांधींनी इतर सदस्यांना शांत करण्यासाठी फिल्ड मार्शल माणेकशा यांचे मत विचारात घेतले होते. परंतु, युद्धाचे श्रेय इंदिरा गांधींना मिळू नये म्हणून माणेकशा यांच्या नावाने रंजक कथा तयार करण्यात आल्या. मात्र, दासगुप्तांच्या संशोधनामुळे सत्य जगासमोर आणले गेले. तसेच १९७१ चे युद्ध जिंकण्यात लष्करप्रमुख फिल्ड मार्शल माणेकशा यांचे प्रमुख योगदान असले, तरी या संपूर्ण युद्धाच्या नियोजनाचे शिल्पकार सैन्याच्या पूर्व कमांडचे मेजर जनरल जे. एफ. आर. जेकब होते, याचाही दासगुप्ता आवर्जून उल्लेख करतात. त्यांच्या या पुस्तकात फिल्ड मार्शल माणेकशा यांच्याबद्दल नकारात्मक बाजू नाही, तर वास्तव काय आहे, याचा अधिक उहापोह करण्यात आला आहे.

इतिहास कथानकावर नव्हे, तर तथ्यांवर आधारित असला पाहिजे. कथानकावर आधारित इतिहास गैरसमज पसरवण्याचे काम करतो. तथ्यांवर आधारित इतिहास न्याय द्यायचे काम करतो. मुत्सद्द्याचे काम केवळ वर्तमानात जगणे नसून आपल्याला मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे, माहितीच्या मदतीने सामान्य माणसांना खऱ्या आणि वास्तववादी इतिहासाशी अवगत करणे हे देखील असते. याचा वस्तुपाठच दासगुप्तांनी आपल्या दोन्ही संशोधनपर पुस्तकात घालून दिला आहे.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments