Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगभारतातील एकमेव मुचलिंद नागाचे भित्तीचित्र #पितळखोरा_लेणीत…..!

भारतातील एकमेव मुचलिंद नागाचे भित्तीचित्र #पितळखोरा_लेणीत…..!

फलटणःआपल्या भित्तीचित्रांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणीत देखील जे भित्तीचित्र पाहायला मिळत नाही ते “मुचलिंद नागाचे” भित्तीचित्र एकांतवासात असलेली धीरगंभीर भासणारी सर्व लेण्यात पितृतुल्य असणार्‍या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्याच्या कुशीत “अरूणा” नदीच्या पात्राच्या तीरावर विसावलेल्या प्रकाशझोता पासून अलिप्त असणार्‍या पितळखोरा लेणीत आपल्याला पहायला मिळते.

प्रमुख चैत्यगृह लेणी क्र ३ च्या प्रदक्षिणा पथाच्या डाव्या बाजुच्या १६ आणि १७ क्र च्या स्तंभाच्या मागच्या भिंतीवर हे भारतातील एकमेव भित्तीचित्र चित्रित करण्यात आले आहे.
बुध्दत्व प्राप्तीच्या काळात सम्यक संबुध्द यांच्या डोक्यावर पाऊस वादळ वार्‍या पासून संरक्षण मिळावे त्यांच्या साधनेत कोणताही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून मुचलिंद नागांने आपल्या फण्यांचे छत्र त्यांच्या शिरावर उगारले होते असा प्रसंग बुध्द चरित्रात येतो या प्रसंगावर आधारित अनेक शिल्प नंतरच्या काळात तयार करण्यात आली पण भारतातील भित्तीचित्र मात्र एकमेव आणि ते पाहायला मिळते पितळखोरा लेणीत.

नैसर्गीक रंगांचा वापर करून हे भित्तीचित्र तयार करण्यात आले आहे , खंत येवढीच आहे की हे भित्तीचित्र संपूर्ण नसून अर्ध्याच स्थितीत उपलब्ध आहे कधीकाळी ते संपूर्ण होते आज ते अर्धेच शिल्लक आहे , तथागतांचा चेहऱ्याच्या खालचा भाग संपूर्ण नष्ट झाले आहे, उपलब्ध असलेल्या चित्रात ध्यान साधनेत लीन असलेले सम्यक संबुध्द पाहायला मिळतात त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव डोळ्यातील स्थिरता कलाकाराने अचूक टिपले आहे ,यातून कलाकाराचे आपल्या कलेवरील प्रभुत्व चित्रात स्पष्टपणे दिसुन येते तथागतांचे “अर्धलोम” स्थितील डोळे , काळ्या रंगातील कमनीय भुवया ज्या नाकाच्या वर दोन्ही एकत्रित जुळतात , हलक्या पिवळसर तांबुस रंगातील लाम पाल्याचे कान, गडद काळ्या रंगात रंगवलेले डोक्यावरील कुरळे केस , डोक्याच्या पाठीमागे पांढर्‍या रंगात रंगवलेले “प्रभावलय” हे सारे काही आपल्या मनाचे ठाव घेण्यास पुरेसे आहेत
कलाकाराने तथागतांना संरक्षण करण्यासाठी दोन्ही बाजुल राखाडी रंगातील पोटाखालील पांढऱ्या रंगातील खवले असलेला गुलाबी मुख उघडलेला फणाधारी मुचलिंद नाग चितारण्यात आला आहे.
मुचलिंद नागाचे हे एकमेव भित्तीचित्र आहे नैसर्गिक ह्यासामुळे जरी आज दोन फणे दिसत असले तरी कधीकाळी पाच किंवा सात फणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे पितळखोरा लेणीतील भित्तीचित्रे अजिंठा लेणीतील भित्तीचित्रा पेक्षाही प्राचीन आहेत , पितळखोरा लेणीतील भित्तीचित्रांचा काळा इ स दुसरं शतक असून अजिंठा लेणीत भित्तीचित्रांचा काळ पाचवे शतक असे आहे.

पितळखोरा लेणीतील भित्तीचित्रांचा नैसर्गिक ह्यास तर झालाच आहे पण देखभालीच्या अभावामुळे संरक्षण अभावामुळे इथे येणारे पर्यटक “भटके” इथल्या भित्तीचित्रांवर आपले नाव कोरण्याचा भित्तीचित्रे खरवडून काढण्याचा प्रताप करतात हे सारे कुठेतरी थांबायला हवे अन्यथा आपण एका राष्ट्रीय अनमोल कलाकृतीला लवकरच गमावून बसू…!

सूरज रतन जगताप

(लेणी अभ्यासक )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments