माझ्या हिश्श्याचे किस्से: खाण्या-पिण्यावर नीतू यांचा इतका कंट्रोल होता की ऋषी कपूरनी केला होता ‘रिटायरमेंट’चा विचार!

0
22
माझ्या हिश्श्याचे किस्से:  खाण्या-पिण्यावर नीतू यांचा इतका कंट्रोल होता की ऋषी कपूरनी केला होता ‘रिटायरमेंट’चा विचार!


रूमी जाफरी, चित्रपट लेखक-दिग्दर्शक4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नीतू कपूर यांच्यासह ऋषी कपूर (संग्रहित फोटो).

आपल्या चित्रपटसृष्टीत असे काही स्टार होऊन गेले, आजही आहेत; ज्यांच्या प्रगतीमध्ये आणि यशोशिखरावर टिकून राहण्यात, त्यांचे आरोग्य-फिटनेस राखण्यात त्यांच्या पत्नींचा खूप मोठा वाटा आहे. त्यापैकी एक आहेत नीतू सिंग. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांंमध्ये आज नीतू सिंग यांच्याबद्दल…

नीतू सिंग यांनी वयाच्या ८-९ व्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांचा “यादों की बारात’ हा चित्रपट आला आणि सुपरहिट झाला. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिल. १९८० मध्ये वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांनी ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले आणि आपल्या अभिनय कारकिर्दीला अलविदा केला. नंतर त्यांचे २-३ चित्रपट आले, पण ते पूर्वीच तयार झाले होते.

त्यांनी आपले सगळे लक्ष कुटुंबावर आणि ऋषी कपूर यांच्यावर केंद्रित केले. कपूर घराणे खाण्यापिण्याचे खूप शौकीन आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. ऋषी कपूरही खूप खवय्ये होते. पण, ते एक हिरो होते, स्टार होते आणि तेसुद्धा एक रोमँटिक स्टार. कपूर कुटुंबातील पुरुषांचे वजन खूप लवकर वाढते. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या खाण्यावर आणि मद्यपानावर नीतूजी खूप नियंत्रण ठेवायच्या. पण, ऋषी कपूरना मात्र या दोन्ही गोष्टी खूप आवडायच्या. त्यामुळे कधीतरी नीतूजी सोबत नाहीत अशा एखाद्या पार्टीत किंवा मेजवानीला ऋषी कपूर गेले असतील, तर ते जरा जास्तच मद्यपान करायचे किंवा बिर्याणी, खिमा, कबाब, पाया किंवा गोड पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचे. ते खाण्याची मजा तर लुटायचे, पण नंतर त्यांना नीतूजींचे टेन्शनही यायचे. अशा पार्टीत मीसुद्धा असेन तर ते सकाळी उठून मला फोन करायचे आणि सांगायचे.. “ऐक, तुझं नीतूशी बोलणं झालं तर मी खूप कमी खाल्लं आणि ड्रिंकही केलं नव्हतं म्हणून सांग. तिथं कुठलं डाएट फूड होतं, तर तर मला त्याचं नाव सांग. मी तेच खाल्लं असं सांगेन.’ सांगायचं तात्पर्य, त्यांना नीतूजींबद्दल खूप आदर होता.

आणि आता तुम्हाला असा किस्सा सांगणार आहे, जो कुणालाही माहीत नाही आणि ज्याचा मी स्वत: साक्षीदार होतो. १९९५ ची गोष्ट आहे. चिंटूजींचे (म्हणजे ऋषी कपूर ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने चिंटूजी म्हणायचो) ३-४ चित्रपट लागोपाठ फ्लॉप झाले होते. हे सगळेच मोठे चित्रपट होते. एक दिवस त्यांचा फोन आला आणि मला ताबडतोब घरी यायला सांगितले. मी त्यांच्या घरी पोहोचलो आणि “चिंटूजी काय झालं?’ असं विचारलं. ते म्हणाले, ‘माझे चित्रपट सलग फ्लॉप होताहेत. याचा अर्थ आता लोकांना मला पाहायची इच्छा नाही. म्हणून मी रिटायरमेंटची घोषणा करतोय. त्यामुळे पुढच्या चित्रपटांच्या निर्मात्यांना बोलावून त्यांचे पैसे देऊन टाकेन. एखाद-दुसऱ्याचं शूटिंग झालंय, त्यांना त्यांचा खर्च देईन.’

मी म्हणालो, “चिंटूजी, काय बोलताय? लोकांना तुम्हाला बघायचे नाही, हे तुमच्या मनात आले तरी कसे?’ ते म्हणाले, “पाहायचे असते तर मग गेले असते ना.. माझे चार चित्रपट आले, पण ते मला पाहायला गेले नाहीत. याचा अर्थ त्यांना मला पाहायचे नाही.’ मी म्हणालो की, पब्लिकला एखाद्या हिरोला बघायची इच्छा नाही, हे कशावरून सिद्ध होते? तर एखादा चांगला चित्रपट फ्लॉप झाला आणि लोक म्हणाले की, ऋषी कपूर ऐवजी दुसरा कोणी असता तर हा हिट झाला असता. तेव्हा लोकांना त्या हिरोला बघायचे नाही, हे समजते. पण, हे सगळे चित्रपट तसेही चांगले नव्हते. मी पाहिलेत, तुम्हीही पाहिलेत.’

तेवढ्यात चिंटूजींनी मला खुणेनेच गप्प बसायला सांगितले. मी शांत बसलो. माझ्या पाठीमागून नीतूजी आल्या आणि ‘रूमीजी, काय घेणार?’ असं त्यांनी विचारलं. मी काही नको म्हणालो. पण, त्यांनी खूपच आग्रह केला. मग मी म्हणालो की, ठीक आहे, कॉफी घेतो. त्या निघून गेल्या. ऋषीजी म्हणाले, “मी तुला बोलावून अडकलोय.’ मी विचारलं, “काय झालं?’ तर ते म्हणाले, “आत्ता नीतूनं ऐकलं असतं, तर म्हणाली असती की अगदी बरोबर बोलतोय रूमी.. तुम्ही काम करायला पाहिजे.’ मी म्हणालो, “मग?’ ते उत्तरले, “मी गाणी गाऊन गाऊन, रोमांस करून करून, उपाशी राहून राहून थकून गेलोय. आता मला आरामात भरपेट खायचंय, मनसोक्त प्यायचंय. लाइफ एन्जॉय करायचीय. मला हे वजन कमी करण्यात, रोमँटिक हिरो बनण्यात, नायिकेसोबत फिरण्यात, गाणी गाण्यात आता मजा वाटत नाही.’

हे ऐकून मी हसलो आणि म्हणालो.. तर हे खरं कारण आहे तुमच्या रिटायरमेंटचं! त्यावर ऋषीजी म्हणाले, “शांत राहा, कोणालाही सांगू नको. तुला मी भाऊ मानतो म्हणून सांगितलं.’ ऋषी कपूर यांच्या या गोष्टीवरून मला शकील बदायुनी यांचा एक शेर आठवतोय… पी शौक़ से वाइज़ अरे क्या बात है डर की

दोज़ख़ तिरे क़ब्ज़े में है

जन्नत तिरे घर की

आपल्या पत्नीची इतकी कदर करणारा, तिच्यावर प्रेम करणारा पती आणि तितकीच समर्पित, अगदी तारुण्यात पतीसाठी स्टारडम सोडणारी पत्नी.. असे दुसरे उदाहरण मिळणे कठीण आहे. पण, कोणाची तरी दृष्ट लागली. दैवाने असा अन्याय केला की ही जोडी तुटली. चिंटूजी आपल्या सर्वांना सोडून गेले आणि नीतूजी एकट्या राहिल्या.

नीतूजी किती मोठ्या आहेत, याचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी बहुतेकदा भोपाळला जाऊन कुटुंबियांसोबत ईद साजरी करतो. पूर्वी मोबाइल नव्हते, तेव्हा चिंटूजी मला भोपाळला फोन करून ईदच्या शुभेच्छा देत असत. माझ्यासोबत ते माझ्या मम्मी-पप्पांनाही शुभेच्छा द्यायचे. कधी मी मुंबईत ईद साजरी करायचो, तेव्हाही ते भोपाळला फोन करून मम्मी-पप्पांना शुभेच्छा द्यायचे. ते गेल्यानंतरची पहिली ईद आली, तेव्हा नीतूजींनी मला फोन करुन भोपाळच्या घरचा नंबर मागितला. त्या म्हणाल्या की, मला मम्मीला ईदच्या शुभेच्छा द्यायच्याहेत. चिंटूजी ज्या गोष्टी करायचे, त्या त्यांच्यानंतरही करायची माझी इच्छा आहे.

नीतूजींनी फोन करून मम्मीला ईदच्या शुभेच्छा दिल्या, तेव्हा तिनेही त्यांना मनापासून आशीर्वाद दिले. नीतूजी इतक्या भल्या मनाच्या आहेत. त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, हे लिहितानाच मी भावूक होतोय.. उद्या नीतूजींचा वाढदिवस आहे. माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ईश्वराने त्यांना दीर्घायुरोग्य द्यावं. नीतूजी आणि ऋषी कपूर या जोडीच्या आठवणीत त्यांच्या ‘खेल खेल में’ चित्रपटातील हे गाणं ऐका…

एक मैं और एक तू,

दोनों मिले इस तरह,

और जो तन मन में हो रहा है,

ये तो होना ही था।

स्वत:ची काळजी आणि आनंदी राहा.



Source link