Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका...: तबकडी

गोष्ट सांगतो ऐका…: तबकडी

[ad_1]

अरविंद जगताप7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

धैर्यने सहज वर पाहिलं. आभाळाकडं. आणि अचानक त्याची नजर तबकडीकडं गेली. आधी त्याचा विश्वास बसला नाही. आकाशात अशी कुठली गोष्ट त्याने यापूर्वी पाहिली नव्हती. धैर्यशील असं त्याचं नाव ठेवलं घरच्यांनी. त्यांना वाटलं, पोरगा मोठा धीराचा निघेल. पण, धैर्य सारखा भुताखेतांच्या गोष्टी सांगायचा. लोकांना घाबरवायला. आणि स्वतःच झोपेत घाबरायचा. दचकून ओरडायचा. धैर्य आता तिशीत आहे. तो आणि बायको एवढाच संसार. तीन – चार कार आहेत, त्या तो भाड्याने देतो. पैसा चांगला कमावतो. रात्री मित्र जमवून भुताखेतांच्या गप्पा. लहानपणी गोष्टींमध्ये फक्त भूत असायचं. आता एलियन्स असतात. इंग्रजी सिनेमे पाहण्याचा हा परिणाम. हळूहळू उडती तबकडी त्याच्या आयुष्यात आली. त्याचा तिच्यावर ठाम विश्वास बसला. एक-दोनदा त्याला आकाशात उडती तबकडी दिसल्यासारखीही झाली. आता बघावं तेव्हा तबकडीची गोष्ट चालू असते.

गावाबाहेर बायपासला दहा – बारा ढाबे आहेत. तिथल्या कुठल्या तरी एका ढाब्यात धैर्यचं कथाकथन चालू असतं. ऐकणाऱ्याला मजा येते. कारण बिल धैर्य भरतो. गोष्टी रंगवणं ही आता धैर्यची हातोटी झालीय. ढाब्यावर इतर टेबलांवर बसलेले लोकही अनेकदा धैर्यची गोष्ट ऐकण्यात मग्न व्हायचे. मजा यायची त्यांना. पृथ्वी कशी नष्ट होईल.. तबकडीत बसून एलियन्स येतील आणि माणसाला गुलाम करून टाकतील.. असं काय काय धैर्य सांगत राहायचा. ऐकणारे सहसा निर्विकार असायचे. पण, धैर्य मात्र आपणच रंगवलेल्या गोष्टीने स्वत:च चिंतेत असलेला दिसायचा. कधी कधी सगळं काही नष्ट झाल्यासारखा चेहरा करून बसायचा. तेव्हा ऐकणाऱ्याला काही क्षणासाठी जरा चिंता वाटायची. कारण एवढा निराश झालेला, आता सगळं काही संपलं, असा चेहरा केलेला धैर्य बिल देईल की नाही, अशी त्यांना शंका यायची. पण, गोष्ट संपली की धैर्य बिल द्यायचा. अशीच नेहमीप्रमाणं एक गोष्ट रंगवून धैर्य घरी येऊन झोपला होता. आणि अचानक त्याला जाग आली.

धैर्यला झोपेतून जाग येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. खरं तर दररोज रात्री एक-दोनदा असं झालंच होतं. पण, आज जरा चमत्कारिक वाटत होतं त्याला. बाहेर काहीतरी आवाज आला होता. विचित्र आवाज. एलियन्स येतात तेव्हा होणारा यंत्राचा आवाज. आता धैर्यने कधी एलियन्स पाहिलेही नव्हते. इंजिनचा आवाज त्याला कुठून माहीत असणार? पण त्याने त्या आवाजाची मनात कल्पना केलेली होती. तशा आवाजाच्या जवळपास जाणारा कुठला तरी आवाज बाहेर झाला होता. धैर्यने शेजारी बघितलं. बायको शांत झोपली होती. धैर्य घरी येऊन जेवला की कविता बिनधास्त झोपते. त्याने शेजारी ठेवलेली पाण्याची बाटली उचलली. दोन घोट पाणी प्यायला. आणि शांतपणे बेडरूममधून बाहेर पडला. पायऱ्या चढून गच्चीवर गेला.

खूप वेळ भिंतीआडून कानोसा घेतला. रस्त्यावर कुणी दिसत नव्हतं. आता तो गच्चीत आला. आवाज बंद झाला होता. काहीतरी भास असावा, असं त्याला वाटलं. आता गोष्टी सांगणं कमी केलं पाहिजे, असंही वाटून गेलं. त्याने सहज वर पाहिलं. आभाळाकडं. आणि अचानक त्याची नजर तबकडीकडं गेली. सुरूवातीला त्याचा विश्वास बसला नाही. पण, ती काही चांदणी नव्हती. आणि तिचा आकारही बऱ्यापैकी मोठा होता. आकाशात अशी कुठली गोष्ट त्याने यापूर्वी पाहिली नव्हती. तो तरीही आठवू लागला. काय असेल? पण, आता ती वस्तू हालचाल करू लागली. धैर्यची खात्री झाली ती तबकडीच आहे. आपण सांगत होतो, त्या गोष्टीवर आजपर्यंत कुणी विश्वास ठेवला नाही. पण, आज शेवटी ती गोष्ट खरी होताना दिसत होती. धैर्यची बायकोसुद्धा त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवायची नाही. बायकोची आठवण झाल्याक्षणी तो खाली गेला.

कविताला झोपेतून उठवून तिला घेऊन वर आला. ती वैतागली होती. गोष्टी सांगत होता तोपर्यंत ठीक होतं, पण आता तबकडी दिसली म्हणायला लागलाय नवरा. ही तिच्या दृष्टीनं गंभीर गोष्ट होती. ती नवऱ्याच्या या तबकडीच्या वेडाबद्दल आपल्या बहिणीशी बोलायची. तिच्या बहिणीने तिला सांगितल होतं की, अशा गोष्टी सांगणाऱ्या माणसाला नंतर वेड लागतं. कवितालाही आपल्या नवऱ्याला वेड लागायची सुरूवात वाटू लागली. धैर्य तिला आनंदाच्या भरात ओढत गच्चीकडं नेत होता आणि तिला नवरा वेडाच्या भरात आपल्याला ओढत नेतोय, असं वाटत होतं. दोघं गच्चीत पोचले.

खूप वेळ आकाशात काहीच दिसलं नाही. बायकोने झोपमोड केल्याच्या रागात धैर्यकडं पाहिलं आणि ती परत बेडरूमकडं जायला निघाली. ती पायऱ्या उतरायला सुरूवात करणार एवढ्यात धैर्य ओरडला.. ‘ते बघ..!’ त्याला पुन्हा तबकडी दिसली होती. धैर्य बोट करत होता, त्या दिशेने कविता बघत होती. तिलाही खरोखरच काहीतरी वेगळी गोष्ट दिसत होती. आकाशात एरवी न दिसणारी. आधी तिला वाटलं, विमान असेल. पण एवढं छोटं? आणि विमान असं एकाच जागी का राहील एवढा वेळ? खूप वेळ दोघंही बघत राहिले. धैर्य तिला तबकडीच्या गोष्टी सांगू लागला. त्याच्यात आता आपली गोष्ट सिद्ध केल्याचा आवेश होता. अभिमान होता. आजवर लोकांनी आपल्याला मूर्खात काढल्याचा राग होता. एखाद्या वैज्ञानिकाला शोध लावल्यावर जेवढा आनंद होत नसेल तेवढा आनंद त्याला झाला होता. खूप वेळ त्याची तीच ती बडबड ऐकून कविता कंटाळली. तिच्या सांगण्यावरून धैर्य आपल्या फोनमध्ये फोटो काढू लागला. जसजसे फोटो काढत होता, तसतसा तो आणखी खुश होत होता. पुरावे गोळा होत होते ना.. पण, जेव्हा त्याने झूम करून फोटो काढायला सुरूवात केली, तेव्हा तो निराश होऊ लागला. कारण ती तबकडी खूप अंतरावर खाली उतरत होती. जसजशी ती खाली येत गेली तसतसे फोटो क्लिअर येऊ लागले. झूम केल्यावर लक्षात येऊ लागलं की, ती तबकडी नाही ड्रोन आहे!

धैर्य निराश झाला. नवरा – बायको खाली उतरले. आणि घरात शिरून बघतात, तर चित्र बदललेलं होतं. घरात चोरी झाली होती. दोघे रात्रभर जागेच राहिले. हे काय झालं? सकाळी पोलिसांनी सांगितलं… चोरांची नवीन टोळी आली आहे, ते ड्रोन वापरतात. त्या घराभोवती कुणी येत जात नाही ना यावर ड्रोनने लक्ष ठेवतात. मुख्य चोर चोरी करून बाहेर येईपर्यंत ड्रोन लक्ष ठेवून असतो. चोर बाहेर पडला की ड्रोन खाली… तबकडी समजून धैर्य बघत बसला, तो ड्रोन काम फत्ते करून गेला होता. त्या रात्रीनंतर धैर्यने पुन्हा कधीच तबकडीची गोष्ट सांगितली नाही. उडती तबकडी वगैरे नसते, याची त्याला खात्री झाली. आपली वाट लावायला एलियन्सची गरज नसते. माणसंच ती लावतात, हे त्याला आता मनापासून पटलं होतं

(संपर्कः jarvindas30@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments