Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रराज्य आहे लोकांचे...: लोकशाहीचे वाहक कोण? चेहरे, पक्ष की विचार..?

राज्य आहे लोकांचे…: लोकशाहीचे वाहक कोण? चेहरे, पक्ष की विचार..?

[ad_1]

डॉ. अमोल अन्नदाते9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

रहनुमाओं की अदाओं पे

फ़िदा है दुनिया

इस बहकती हुई दुनिया को

सँभालो यारो…

कवी दुष्यंतकुमार यांच्या या ओळींची प्रचिती भारतीय लोकशाही अनेक वर्षे घेत आहे. तारणहारांच्याआणि मासिहांच्या दिखाऊ गुणांना, लकबींना जग भुलत चालले आहे. या भ्रमित जगाला सावरण्याची गरज आहे, असे दुष्यंतकुमारांना सुचवायचे आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेची सुरुवातच मुळात ‘वी द पीपल ऑफ इंडिया’ अर्थात ‘आम्ही भारताचे लोक’ अशी होते. पण, गेल्या दोन – तीन दशकांपासून आपली लोकशाही या सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेऊन नव्हे, तर नेत्यांच्या मोठ्या, कल्ट ब्रँन्डभोवती फिरत आहे.

मुळात ‘कल्ट ब्रँन्ड’ ही कॉर्पोरेट संकल्पना. पण, राजकारणात ती जाणीवपूर्वक अंगीकारली गेली. कल्ट ब्रँन्ड म्हणजे जाणीवपूर्वक एखादा चेहरा आणि त्याच्या भोवतीच्या विशिष्ट धारणा तयार करणे. या धारणांविषयी प्रश्न उपस्थित होणार नाहीत, ते तर्कशक्ती वा विचारशक्तीला आव्हानही देणार नाहीत, अशी निष्ठा निर्माण करणे. अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान, सलमान खान आदी अभिनेते म्हणते चित्रपटसृष्टीतील कल्ट ब्रँन्ड. एखाद्या वेळी त्यांचे चित्रपट कसेही असले, तरी त्यांचा म्हणून एक प्रेक्षक वर्ग तयार असतो, जो काहीही झाले तरी ते चित्रपट पाहतोच.

राजकारणही आता अशा धडाकेबाज हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणेच सुरू असते. त्यामध्येही एखाद्या नेत्याला तारणहार म्हणून प्रोजेक्ट केले जाते. लोकांना त्याच्या चेहऱ्याच्या, लकबींच्या प्रेमात पाडले जाते. त्याच्या नावाचा घोष करून घेतला जातो आणि त्याच्यावरच्या प्रेमाची जाहीर कबुलीही वदवून घेतली जाते. मग तो कधी चुकला, तरी लोकांचे हात दगडाखाली असतात. त्यांनीच त्यावरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्यामुळे त्याची चूक कशी बरोबर आहे, हे ते आधी स्वतःला आणि मग इतरांना समजावून सांगत राहतात.

अशा स्थितीमुळे भारतीय लोकशाहीसमोर एक मोठे आव्हान उभे राहते आहे. आपल्याकडील लोकसभा निवडणुकीचे स्वरूपही अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसारखे झाले आहे. आता दोन पक्ष किंवा विचारसरणी अथवा एका विचाराचे समूह निवडणूक लढत नाहीत, तर दोन चेहरे निवडणूक लढतात. असे चेहरे तीन, चार वा पाच नसतात. खरे तर नेता आणि त्याच्या क्षमता महत्त्वाच्या मानल्या गेल्या पाहिजेत. तो नेतृत्वासाठी किती सक्षम आहे, हे बघितले जायला हवे. त्याऐवजी त्याची छबी ‘लार्जर दॅन लाइफ’ असायला हवी आणि त्याच्या व्यक्तिमत्वात करिष्मा असायला हवा, असा जो विचारप्रवाह रुजतो आहे, तो लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत साध्या भासणाऱ्या व्यक्तींनी, कुठलाही करिष्मा नसलेल्या चेहऱ्यांनी सत्तास्थानी आल्यावर असामान्य कार्य केल्याची अनेक उदाहरणे भारताने आजवर पाहिली आहेत.

जगातील बहुतांश लोकशाही राष्ट्रांमध्ये, देशातील इतर लोक जसे काम करतात तसेच एक काम करणारे लोक म्हणून सत्तास्थानी असणाऱ्यांकडे बघितले जाते. त्यामुळे भारतात राजकारणी लोकांभोवती असते, तसे ग्लॅमर त्या देशांतील राजकीय लोकांच्या मागे उभे राहत नाही. तिथे चेहऱ्यापेक्षा काम महत्त्वाचे ठरते. त्यामुळे तिकडचे अगदी राष्ट्रप्रमुखही सत्तेत नसल्यानंतर सामान्य नागरिकांसारखे आयुष्य जगताना दिसतात.

राजकारणातील, सत्तास्थानावरील लोक कोणीतरी विशेष आहेत, ते सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहेत, ही धारणा आपल्याच देशात नको तितकी रुजली आहे. ती जनतेच्या मनातून जात नाही, तोवर आपल्या नावाच्या, चेहऱ्याच्या आणि पदाभोवतीच्या ग्लॅमरचा लोकांवर प्रभाव टाकण्याची वृत्ती राजकारणातून जाणार नाही.

भारतीय जनतेने हजारो वर्षे राजसत्ता अनुभवली आहे. त्यामुळे लोकांचे राज्य असलेली लोकशाही येऊन कित्येक दशके उलटली, तरी त्यांच्या मनातून ‘राजा’ ही संकल्पना काही केल्या जायला तयार नाही. देश स्वतंत्र झाल्यावर अनेक राजे आपली गादी सोडून लोकशाहीत सामील झाले. पण, लोकशाहीत सत्तास्थानी असलेले लोक हे खरे तर आपण बसवलेले म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत आणि ‘राजे’ ते नसून आपण आहोत, ही भावनाच भारतीय जनतेच्या मनातून पुसली गेली आहे.

कार्य-कर्तृत्वापेक्षा केवळ नाव, चेहरा, वलय आणि त्या व्यक्तीविषयी तयार केली जाणारी धारणा यांना अवास्तव महत्त्व देण्याची भारतीय मानसिकता, हे या मागचे प्रमुख कारण आहे. वास्तविक एखादी व्यक्ती वा चेहरा नव्हे, तर देश आणि लोकशाही ज्यावरुन पुढे जात असते, ते विचार, ती धोरणेच शाश्वत असतात. म्हणून चेहऱ्यांपेक्षाही देशाच्या प्रगतीसाठी आणि लोकशाहीच्या उन्नतीसाठी हितकारक असलेले विचार, त्यावर चालणारे पक्ष यांनाच सामान्य लोकांच्या दृष्टीने महत्त्व असायला हवे.

(संपर्कः dramolaannadate@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments