इलेक्शन – विलेक्षन: भाऊ, निकाल काही लागो; तुम्ही जराही लोड नका घेऊ!

0
13
इलेक्शन – विलेक्षन:  भाऊ, निकाल काही लागो; तुम्ही जराही लोड नका घेऊ!


राहुल रक्ताटे4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘भावांनो, तुम्ही जवळचे मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, आमचाच उमेदवार निवडून येणारहे! कशाची बी शपत्त घेवून सांगतो भौ.. का म्हंजे? त्यांचं काम सांगायला गेलो तर रात्र नाही पुरायची. चांगलं काम म्हनतोय मी. चेष्टा नाय करायची. नंदीबैलासारखी मान नका हलवू. आता इलेक्शनचा निकाल लागला की बघा तुमच्या माना कायमच्या मोडत्यान. काय म्हंता, मतदान केलं का? तुम्ही केलं का सांगा भावांनो..?

आपलं राज्य मतदानात सगळ्यात मागं आसलं, तरी राजकारणाचा लोड घ्यायला सगळ्यात पुढं असतं. निव्वळ कृतिशून्य गप्पा झोडायला आपल्या माणसांची तोंडं कोणबी धरू शकत नाय. त्याच्यात माझंबी तोंड जमा धरा म्हणा.. पण एक सांगतो, फत्ते आमचीच होणार. काय म्हणले? कितीची पैज..? अहो, कितीचीबी लावा! नसतेन खिशात पैसे, पण तेवढा कान्फिडंस पायजे. आपला सोभाव असाचहे. निष्ठा म्हणजे निष्ठा. आमच्या उमेदवारानं दोन पक्ष बदलले. मग आम्हीबी बदलले. निष्ठा यालाच म्हंतेत. सायेब गाढवाला घोडा म्हणले का आपुनबी म्हणायचं. डोकं गहान नाय. समार्पण म्हनतेत याला. चार महिने हिंडतोय सायेबांसाठी. कामधंदे बघून हिंडतो भौ.. तशी आमच्या कुटुंबाच्या पोटापाण्याची सोय माझ्या बापानीच करून ठेवलेली हे. तुमचं काय ते बोला!

अरे प्रभ्या, महिना झालं तू दुकान उघडलं नाही. इकडं उमेदवाराच्या नावानं मोक्कार घोषणा देत फिरायचा आन् तिकडं तुझी बायको तुझ्या नावानं गावभर बोंब ठोकत फिरती. हा पक्या तर महिना झाला कंपनीत कामाला गेला नाय. आता जावू नको भौ, तुझी नोकरी गेल्यात जमाहे. आन् ह्यो गणा.. दोन महिने झाले, रानाकडं फिरकला बी नाय. अख्खा कांदा जळून गेला याचा इलेक्शनच्या नादात. हिंडतोय नेत्याच्या मागं. ते निवडून आले काय आन् पडले काय, तुझा कांदा काय परत येणारहे का? कांद्याच्या भावाचं नका बोलू, संपला त्यो विषय. आधी कुटुंबाच्या, सोताच्या पोटापाण्याची सोय महत्त्वाची. कोणी निवडून आलं, तरी तुमचं कुटुंब काय पोसणार नाय. इथं ज्याला त्यालाच झटावं लागतंय. इलेक्शनच्या काळात रोज चिकन-मटन, प्यायला बिसलरी.. आता ते इसरा. पुन्हा घरातली भाजी आन् भाकरी.. पण, कशी का असंना, ती आपल्या हक्काची तरी असतीय. फुकटच्या बिसलरीपेक्षा माठातलं कष्टाचं पाणी कसंही असलं तरी शुद्धच!

खरं म्हंजे, इलेक्शनमध्ये तरूणांचं भविष्य दडलेलं पायजेल. पण, होतं काय? आपल्याच गावातलं उदाहरण घ्या.. किती कोवळी पोरं फुकटची मिळती म्हणून प्यायला लागली. आता त्यातले काही परमनंट तळीराम होणार.. ए सुन्या, तुला पुन्हा एकदा सांगतो, परत सोयरिकीचा विषय नाय काढायचा. विक्याच्या डोक्यात आधी होतं, त्याची बहीण तुझ्या भावाला द्यायची. मस्त जोडा होता.. पण, तू समोरच्या उमेदवाराचा प्रचार करायला लागल्यावर विक्या म्हणला, ही सोयरीक काय जमायची नाय.. मी सांगितलं त्याला समजावून. वरच्या राजकारण्यांच्या सोयरिकी त्यांच्या सोयीनी होत्यात. ते पक्ष-बिक्ष काय बघत नाईत. आपल्या खालच्यांलाच लई ऊत! उगच म्हनतेत का, चहापेक्षा किटली गरम..

..आणि माणक्या, तू पण लक्षात घे.. तुझा बा सोसायटीचा चेअरमन होता. ह्या पांडूचा बा दहा वर्ष सरपंच होता. दोघाचे बाप आधी जीवलग मित्र होते. राजकारणात पडले आन् एकमेकांच्या जीवावर उठले. बरं, तुझा बा सरपंच होता म्हंजी गावाचा लई उद्धार झाला आन् याचा बा सोसायटीचा चेअरमन झाल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या, असं कायबी नाय झालं. बरं, तुम्हीबी एवढे शाने का आपण सारे मित्र असून पण दोघं ऐकमेकांवर दात खाता. राजकारणानं मन जुळलं पायजे. पण, आपला समाज लई येडा. उमेदवार निकाल लागल्यावर जुळवून घेतेत. कार्यकर्ते मात्र आयुष्यभर साप-मुंगूस, म्हैस-धामण होऊन जगतेत. आता आजूबाजूच्या गमती बघा.. इलेक्शन संपलं, तरी गल्ली-गल्लीत गट-तट. आमचाच उमेदवार येणार म्हणून हमरीतुमरी, बाचाबाची, मारामाऱ्या.. बावचळले का काय लोकं?

भावांनो, आपला पक्ष, विचारसरणी, उमेदवार वेगळे असू द्या. लोकशाही आहे. कोणी कोणाच्याबी मागं उभं राहा. फक्त इलेक्शन होऊस्तोवर हे सगळं ठीकहे. पण, बापाच्या आयत्या भाकऱ्या चोपून कायमच कोणासाठी कोणावर जोर काढणं, हा निवळ गाढवपणा.. ते तरी कोणी वाटं गेलं तरच दुगाण्या झाडतं. माणूस कायमंच एकमेकांवर लाथा झाडत राहतो. लोकशाही पवित्र आहे. निवडणूक तिचं साधन आहे. देशाचा विकास तिचं उद्दिष्ट आहे. लोक या प्रक्रियेतील कणा असतेत. ही प्रक्रिया प्रासंगिक असती. काय बोलतो, समजले नाय का भावांनो? सोप्या भाषेत सांगतो.. विरोध, मतभेद तात्पुरते असावेत. आता निवडून येईल तो लोकप्रतिनिधी आपला. एकजूट राहून, त्याच्यावर दबाव टाकून विकासाच्या वाटा निर्माण करणं, हे खरं आपलं कर्तव्य! चला, उठा..’

‘हो, हो.. चला, उठा आता..!’ वडिलांच्या आवाजानं बंडू झोपेतून खडबडून जागा झाला. किलकिल्या डोळ्यांनी तो त्यांच्याकडं बघतोय, तेवढ्यात ते पुन्हा त्याच्यावर ओरडले.. ‘म्हाराज.. जागं व्हा! अजूनही तुमच्या डोक्यावरचं इलेक्शन उतरंना.. परवा एकदाचा काय त्यो निकाल लागू द्या. मग तरी आपल्या कामाधंद्याला लागा.. न्हायतर आपल्या आयुष्याचा ‘निकाल’ लागंल. जरा याचाही विचार करा..’

(संपर्कः rahulraktate13@gmail.com)



Source link