रूमी जाफरी4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
उस्ताद गुलाम मुस्तफा खान, ज्यांनी ‘इससे ज़्यादा दुख ना कोई, प्यार ना बिछड़े’ या गाण्याला आपला आवाज दिला होता.
मागील आठवड्यात मी गोविंदा निवडणूक जिंकला होता, त्या दिवसाविषयी कॉलम लिहिला. गोविंदाने उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ साहेबांचा आशीर्वाद घेतला होता, अशी आठवण त्यात नोंदवली होते. त्यामुळे मला खाँ साहेबांची आठवण झाली आणि त्यांच्यासाेबत घालवलेले काही क्षण स्मृतिपटलावर उमटले. मी अशा काही भाग्यवान लोकांपैकी एक आहे, ज्यांनी त्यांच्यासोबत केवळ वेळच घालवला नाही, तर त्यांच्यासह काम करण्याची संधीही मिळाली. म्हणून आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये पद्मविभूषण गुलाम मुस्तफा खाँ साहेबांबद्दल सांगणार आहे.
माझे एक मित्र होते. त्यांना मित्रापेक्षाही थोरले बंधू म्हणणे जास्त योग्य ठरेल. त्यांचे नाव कमल शुक्ला. लिंकिंग रोडला बांद्रा टॉकीजलगत त्यांचे ऑफिस होते. विविध क्षेत्रांतील विचारवंत आणि कलाकार असे सगळे त्यांचेकडे येत असत. त्यामुळे तिथे कायम गर्दी असायची. त्या ठिकाणी बसायला खूप मजा यायची. चांगल्या लाेकांच्या भेटी व्हायच्या. खाँ साहेबांशी माझी भेट तिथेच झाली. नंतर नेहमी भेटी होत राहिल्या. दरम्यान बरेच दिवस गेले. माझे नव्या चित्रपटांच्या लेखनाचे काम सुरू झाले.
माझा ‘श्रीमान आशिक’ नावाचा एक सिनेमा सुरू झाला. त्यातील एका दृश्यासाठी शास्त्रीय धून असलेले, तशा गायकीचे गाणे हवे होते. मी निर्माता शकील नुरानी आणि दिग्दर्शक दीपक आनंद यांना गुलाम मुस्तफा खाँ साहेबांकडून हे गाणे गाऊन घेण्याविषयी सुचवले. नदीम श्रवण यांनाही तसे सांगितले. नदीमजी त्यांना ओळखत होते. त्यांना ही कल्पना खूप आवडली. त्यांनी विचारले, ‘खाँ साहेब हे गाणं गातील का?’ मी म्हणालो, ‘ते जितके मोठे उस्ताद आहेत, तितकेच चांगले माणूसही आहेत. त्यांना मी खूप चांगलं ओळखतो. मी त्यांच्याशी बोलेन. मला आशा आहे, ते नकार देणार नाहीत.’ त्यानंतर मी खाँ साहेबांशी बोललो आणि त्यांनी होकार दिला. ते गाणं तयार झालं. त्याचे रेकॉर्डिंग हादेखील खूप चांगला अनुभव होता.
असो. पण, ते चित्रीत कोणावर करायचं, असा प्रश्न पडला. खाँ साहेबांनी जे गायले आहे, त्याप्रमाणे चेहऱ्यावर हावभाव कोण आणू शकेल? मी अन्नू कपूर यांचे नाव सुचवले. अन्नू कपूर यांना सगळेच चांगले अोळखत होते. सर्वांनी तत्काळ सहमती दर्शवली.
या सिनेमाचा एक किस्सा अन्नू कपूर (ज्यांना मी अन्नूभाई म्हणतो) यांच्याशी संबंधित आहे. या सिनेमात एक कव्वालीही होती. ती कोणाकडून गाऊन घ्यावी, याचा विचार आम्ही करत होतो. मी म्हणालो, ‘अन्नू भाई.’ आधी सगळ्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. मी म्हणालो, ‘भाई, मी त्यांच्यासोबत लैला-मजनूमध्ये काम केलंय. त्यात अनेक गाणी आहेत. ज्या रेंजने अन्नू कपूर गातात, त्यावरील लोकांच्या प्रतिक्रिया मी पाहिल्या आहेत. त्यांच्यापेक्षा आणखी कोणी उत्कृष्ट गाऊ शकणार नाही.
मी अन्नूभाईंसोबत बराच काळ घालवला असल्यामुळे संगीत आणि कव्वालीबद्दल त्यांची समज काय आहे, ते मला माहीत आहे.’ त्यांची प्रतिभा मी चांगल्या प्रकारे जाणत होतो, मानतही होतो. त्यावेळेपर्यंत चित्रपटसृष्टीला अन्नूभाईंच्या गायकीविषयी फारशी माहिती नव्हती. फक्त त्यांच्या जवळच्या लोकांनाच हे माहीत होते. टीव्हीवर अंताक्षरी कार्यक्रमही सुरू झालेला नव्हता. अन्नूभाईंना बोलावण्यात आले. ट्रॅक रेकार्ड केले गेले आणि अन्नूभाईंनी कव्वाली एकदम जबरदस्त गायली. त्यांनी ट्रॅकवर हे गाणे स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही आवाजात गायले. गाण्याच्या ज्या ओळी मुलीवर चित्रीत होणार होत्या, त्याही त्यांनी गायल्या. अन्नूभाई इतके दमदार गायले की, अभिनयाप्रमाणेच त्यांच्या या गायकीनेही सगळे प्रभावित झाले. कव्वाली गाताना त्यातील मूड, ऊर्जा पूर्णपणे टिकवून ठेवण्यासाठी जे करणे आवश्यक होते ते सारे अन्नूभाईंनी केले होते.
डबिंगची वेळ आल्यावर अन्नूभाईंनी पुरूषाचा आवाज डब केला. नदीम-श्रवण यांनी ३-४ जणींना बोलावून स्त्रीच्या आवाजातील ट्रॅक गाऊन घेण्याचा प्रयत्न केला. पण, अन्नूभाईंच्या ट्रॅकशी तो अजिबात मॅच होत नव्हता. काही मजाच येत नव्हती. मग सर्वांनी ठरवलं की, एक दिग्गज गायिका आहेत, केवळ त्याच या मूडमध्ये गाऊ शकतात. त्या म्हणजे आशा भोसलेजी. आशाजींना संपर्क साधला. त्या तयार झाल्या आणि रेकार्डिंगला आल्या. अन्नूभाईंना खास रेकार्डिंगसाठी बोलवण्यात आले आणि नंतर कव्वालीचे रेकार्डिंग झाले.
ते इतके उत्कृष्ट झाले की सगळ्यांनाच खूप मजा आली. अन्नूभाईंना भेटून आशाजीही खूप खूश झाल्या. अन्नूभाईंना संगीत, लोकसंगीत, कव्वाली आणि सूफी गायकीचे चांगले ज्ञान असल्याचे आशाजींना समजल्यावर त्यांनी एक दिवस त्यांना गौतम राजाध्यक्षांच्या घरी बाेलावले आणि म्हणाल्या की, मला तुमच्यासोबत लोकगीतांचा एक अल्बम बनवायचाय. मग त्याचे कमर्शिअल्स फायनल झाले, कंपनीही बोर्डवर आली.
गाण्यांची रिहर्सल सुरू झाली. अन्नूभाई आशाजींसोबत गौतम राजाध्यक्षांच्या घरी जायचे आणि लोकगीतांची रिहर्सल करायचे. त्यांनी खूप रिहर्सल केली. गाणी तयार केली, पण काही कारणांनी ती कंपनी बंद पडली आणि तो अल्बम काही बनू शकला नाही. पण, दोन महान कलाकार एकमेकांचे प्रशंसक होते, त्यांनी एक चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगावरून; अन्नू कपूर, गुलाम मुस्तफा खाँ साहेब आणि आशाजींसारख्या महान कलाकारांसाठी जोश मलीहाबादींचा एक शेर आठवतोय… हर हुनर को जो एक दौलत है, इल्म और जिस्म की ज़रूरत है। गुलाम मुस्तफा खाँ साहेबांपासून आपला हा विषय सुरू झाला होता, म्हणून शेवटी एक गोष्ट सांगतो. ‘श्रीमान आशिक’मधील सर्वांत आठवणीत राहणारी एक गोष्ट म्हणजे, अनुपम खेर यांच्यासाठी अन्नूभाईंनी गायलेली कव्वाली आणि अन्नूभाईंसाठी गुलाम मुस्तफा खाँ साहेबांनी केलेले पार्श्वगायन. हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अविस्मरणीय किस्सा आहे. याच गोष्टीसाठी ‘श्रीमान आशिक’मधील गुलाम मुस्तफा खाँ साहेबांनी गायलेले हे गाणे ऐका… इससे ज़्यादा दुःख न कोई, प्यार न बिछड़े, किसी का यार न बिछड़े, किसी का यार न बिछड़े। स्वत:ची काळजी घ्या. आनंदी राहा.
(लेखक – बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)




