Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रखलनिग्रहणाय: सलोख्यासाठी हवा सुसंवाद

खलनिग्रहणाय: सलोख्यासाठी हवा सुसंवाद

खलनिग्रहणाय:  सलोख्यासाठी हवा सुसंवाद

[ad_1]

डॉ. भूषणकुमार उपाध्याय2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पोलिस खाते हे या समाजाचे अभिन्न अंग आहे. शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी पोलिसांना सर्वांच्या सहाय्याची आवश्यकता असते. अशी सहकार्याची भावना निर्माण होण्यासाठी नागरिक आणि पोलिसांतील संबंध विश्वासाचे, तितकेच सलोख्याचे हवेेत. दोन्ही बाजूच्या सुसंवादी पुढाकारातूनच हे शक्य होऊ शकते.

जातील सलोख्याच्या संबंधासाठी सुसंवाद आवश्यक असतो. समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये सुसंवाद असणे सामाजिक प्रगतीसाठीही अपेक्षित आहे. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सरकारी खात्यांमध्ये पोलिस खाते अग्रस्थानी मानले जाते. पोलिसांकडून झालेल्या कारवाईचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर फार दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे एखादा अपराधी सुटला तरी चालेल, पण कुणा निर्दोष माणसाला त्रास होता कामा नये, असे आपल्या न्यायव्यवस्थेचे तत्त्व आहे. त्यामुळे पोलिस आपलेच आहेत, अशी भावना सामान्य जनतेच्या मनात निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्याला अतिशय गौरवशाली परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस खात्यालाही खूप चांगला लौकिक लाभला आहे. मी मूळ बिहारचा रहिवासी आहे. मला ‘आयपीएस’मध्ये महाराष्ट्र केडर मिळाले, तेव्हा हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकॅडमीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या केडरचे भरभरून कौतुक केले होते. त्यानंतर प्रत्यक्ष या राज्यात येऊन काम सुरू केल्यावर मला पदोपदी या गोष्टीची प्रचिती येत राहिली. मात्र, अलीकडच्या काळात काही ठराविक अधिकाऱ्यांमुळे आपल्या पोलिस खात्याच्या या लौकिकाला डाग लागत असल्याचे दिसते. अर्थात या स्थितीला काही प्रमाणात राजकीय नेतेही जबाबदार असतात. वास्तविक महाराष्ट्र पोलिसांना महान परंपरा लाभली आहे आणि असे काही अपवाद वगळता ती आजही कायम आहे. आपल्या राज्यात आधीपासूनच पोलिसांनी सुसंवादाची सुदृढ परंपरा कायम ठेवली आहे. काळानुसार त्यामध्ये बदल होत गेला. या परंपरेला पुढे नेणाऱ्या काही उपक्रमांची, पुढाकारांची माहिती समाजातील प्रत्येकाला असायला हवी.

१. शांतता समिती : प्रत्येक पोलिस ठाण्याच्या आणि जिल्ह्याच्या स्तरावर शांतता समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये समाजाच्या सर्व जाती-धर्मांचे लोकप्रतिनिधी सदस्य असतात. प्रत्येक महत्त्वाच्या सण-उत्सवाच्या वेळी या समितीच्या बैठका होतात. याव्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अशा बैठका घेण्यात येतात. आता या समित्या अधिक बळकट आणि व्यापक करण्याची गरज आहे. समित्यांच्या बैठकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहायला हवे. कारण शांतता समित्या हा सामाजिक सुसंवादाचा एक मोठा दुवा असतात.

२. महिला सुरक्षा समिती : या समित्यांची स्थापनाही प्रत्येक पोलिस ठाणे आणि जिल्हा स्तरावर केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी या समित्यांच्या नियमित बैठका होत नाहीत. काही वेळा बैठकांचा केवळ सोपस्कार पूर्ण केला जातो. सध्याच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला आहे. त्यामुळे या समित्या अधिक बळकट करून त्यांच्या नियमित बैठका घेणे आवश्यक बनले आहे.

३. मोहल्ला समिती : जातीय तसेच धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागांसाठी मोहल्ला समित्या अत्यंत उपयुक्त ठरतात. नागपूरमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना एकदा मी पाहिले की, मोहल्ला समित्यांचे सदस्य पोलिस बल कमी असतानाही चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळत होते. अशा रीतीने सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी मोहल्ला समित्या सक्रिय असणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या समितीतील सदस्यांच्या संपर्कात राहिले पाहिजे.

४. भरोसा सेल : अलीकडच्या काळात कुटुंबांमधील, परिवारांतील कलहांमध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधितांचे समुपदेशन करून त्यांच्यात एकोपा निर्माण करण्यासाठी समाजाला तसा विश्वास देण्याची गरज असते. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामधील भरोसा सेल चांगले काम करीत आहेत. परस्परांतील विसंवादामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक कुटुंबांना एकसंध ठेवण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे.

५. ज्येष्ठ नागरिक सेल : गेल्या काही वर्षांत ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीतही बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत काळजी घेणारे असे सेल आहेत. पुढच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे अशा सेलना अधिक व्यापक आणि कार्यक्षम करण्याची गरज आहे.

६. विधिसंघर्षग्रस्त बालक कक्ष : बालन्याय कायद्याप्रमाणे प्रत्येक पोलिस ठाण्यात हा कक्ष स्थापण्यात आलेला आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकांची समस्या खूप मोठी आहे. मी नागपूरमध्ये पोलिस आयुक्त असताना आम्ही ‘केअर’ नावाचा एक उपक्रम सुरू केला होता. अशा बालकांचे समुपदेशन, शिक्षण आणि पुनर्वसन हे त्याचे उद्दिष्ट होते. या उपक्रमामुळे साधारण एक वर्षाच्या कालावधीत विधिसंघर्षग्रस्त बालकांकडून होणारे गुन्हे निम्म्याने कमी झाले होते.

७. जनता दरबार : समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या तक्रारींची दाखल घेण्यासाठी, त्यांचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस राखीव ठेवणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

याशिवाय विद्यार्थी पोलिस, पोलिस दादा, पोलिस दीदी यांसारखे उपक्रमही सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. त्यासाठी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शाळा – कॉलेजांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आवश्यक आहे. ‘पोलिस मित्र’ ही संकल्पनासुद्धा जनतेशी सुसंवादाचे एक चांगले माध्यम आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये असा उपक्रम राबवण्यात आला असून त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. या उपक्रमालाही अधिक चालना देण्याची गरज आहे.

वर उल्लेख केलेल्या गोष्टी सगळ्याच पोलिस घटकांना लागू होतात. पण, प्रत्येक पोलिस घटकाच्या काही विशेष आणि स्थानिक समस्याही असतात. त्यामुळे त्या त्या समस्यांनुसार उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. काही घटक प्रमुख या गोष्टींना म्हणावे तेवढे महत्त्व देत नाहीत. त्यामुळे पोलिस महासंचालक कार्यालयाने या सगळ्या उपक्रमांचे, पुढाकारांचे वेळोवेळी अवलोकन आणि काटेकोर समीक्षा करण्याची आवश्यकता आहे. जे पोलिस घटक या संदर्भात चांगले काम करतात त्यांचा गौरवही केला पाहिजे. शेवटी पोलिस खाते हे या समाजाचे अभिन्न अंग आहे. शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी पोलिसांना सर्वांच्या साहाय्याची आवश्यकता असते. अशी सहकार्याची भावना निर्माण होण्यासाठी नागरिक आणि पोलिसांतील संबंध विश्वासाचे, तितकेच सलोख्याचे असले पाहिजेत. आणि दोन्ही बाजंूच्या सुसंवादी पुढाकारातूनच हे शक्य होऊ शकते.

(संपर्क – bhushankumarupadhyay@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments