डायरीची पाने: इखाच्या उन्हात सुखाचा फुलोरा..

0
21
डायरीची पाने:  इखाच्या उन्हात सुखाचा फुलोरा..


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Purvani Indrajit Bhalerao On Chaitra Month And Summer Season

इंद्रजित भालेराव13 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

हा चैताचा महिना म्हणजे जांभळीला फुलोरा येण्याचा काळ. हा फुलोरा कुणालाही मोहून घेऊ शकतो. पण, त्या सुंदर फुलांकडं आपण कधी फारसं लक्षही दिलेलं नसतं.

  • शिवारमाथा उभा जागता, रखरखणारे ऊन
  • रान खळ्याचे गोल चोपडे, खोल मेढीची खूण।।
  • जिकडेतिकडे पाऊलवाटा, गाई म्हशींची खुरं
  • मंदमंदल्या पाऊल चाली, झळ वाहे चौखुर।।
  • भेगाळून खपल्या झालेला, कातळ खीळ फुटताना
  • कडक उन्हाने धडक पेटला, खडकही धीट उताना।।

चैत्र हा उन्हाचा महिना समजला जातो. वैशाखात आणखी रखरख वाढते हे खरं, पण चैत्रात उन्हाचा तडाखा सोसवणार नाही, असा असतो. कारण वैशाखापर्यंत ऊन सोसण्याची सवय होऊन जाते. त्यामुळं ती रखरख सहन तरी होते. चैत्रात मात्र एकदमच अंगावर येणारं ऊन असह्य होऊन जातं. हिवाळ्यात गारव्याची सवय झालेल्या जिवाला उन्हाची तलखी सहन होईनाशी होते. पण, गाव-खेड्यातल्या माणसांना घरात बसून तर राहता येत नाही. शेतात कामाची धामधूम सुरू असते. ज्वारी काढणं सुरू असतं. ते संपलं असेल, तर रानाची मशागत करून ठेवणं सुरू असतं. या उन्हात जमीन उलथीपालथी केली की तापते अन् मग पुढच्या वर्षी ती अधिक पिकते. त्यामुळं जमीन उलथण्याचं अवघड काम याच काळात करायचं असतं. त्यासाठी लोखंडी नांगर जुंपावे लागतात. हे मोठं कष्टाचं आणि तेही भर उन्हात करावं लागतं. अलीकडं ट्रॅक्टर आल्यामुळं ते थोडं सुसह्य झालं आहे. अशावेळी नवीन लग्न झालेल्या तरुणालाही या कामाच्या रामरगाड्यातून सुटका नसते. उलट आपल्या अंगातली रग त्यानं मातीशी झोंबून उपयोगाला आणावी, असं घरातल्या लोकांना वाटत असतं. पण, त्याचवेळी जिच्याशी त्याचं नुकतंच लग्न झालंय, तिला मात्र आपल्या जोडीदाराची काळजी वाटत असते. तिला वाटत असतं की, काम करायला हरकत नाही. त्या शिवाय पोट कसं भरणार? पण, उन्हापासून संरक्षणही करायला हवं. त्यासाठी काय काय करायला हवं, ते ती सूचकपणे जात्यावरच्या गाण्यात गुंफत असते…

उन्हाळ्याचं ऊन, चईताची पायपोळ माझं सुकलं जाईफळ। उन्हाळ्याचं ऊन, लागतं चईताचं तोंड कोमेजलं ताईताचं। उन्हाळ्याचं ऊन, लागतं दुपारून सेला देऊ का उपरणं? उन्हात काम करताना आपल्या नवऱ्याचा सुकलेला चेहरा तिला सुकलेल्या जायफळासारखा वाटतो. गळ्यातला ताईत असलेला आपला नवरा चैताच्या उन्हात सुकून गेलेला आहे म्हणून, असं करू नका, सोबत उपरणं असू द्या, असं ती त्याला म्हणते. नुकतंच लग्न झालेलं असतं. त्या लग्नातला शेलाही अशावेळी उपयोगाला येतो. म्हणून ती विचारते, शेला देऊ का उपरणं? आपल्या नवऱ्याची दुपारची भाकरी घेऊन ती शेतात जाते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की, ज्या शेतात आपला नवरा काम करतोय, तिथं झाडझुडूप नाही. मग सावली कुठून येईल? अशा वेळी ती निसर्गालाच प्रार्थना करते अन् म्हणते… उन्हाळ्याचं ऊन, माझ्या सख्याला सोसंना कुठं सावली दिसंना। उन्हाळ्याचं ऊन, दगडाच्या झाल्या लाह्या शेला पांघरावा राया। उन्हाळ्याचं ऊन, देवा शिराळ पडूदेना माझा सुखवाशी गेला रानोवना।। ज्याच्या सहवासात मी सुखी असते, तो माझा सुखवाशी, माझा मालक हे निसर्गा तुझ्यासोबत या कठोर उन्हात रानावनात आला आहे. त्याच्या शेतात झाडझुडूप नाही, तेव्हा तूच त्याच्यावर शिराळ पाडना रे, अशी विनवणी ती निसर्गाला करते. कारण तिथं कुठंच तिला सावली दिसत नाही. म्हणून तिचा जीव तळमळतो. ती सावलीत असली, तरी आपल्या उन्हातल्या मालकावर ऊन आहे या जाणिवेनं ती त्या सावलीतही पोळत असते. म्हणून निसर्गाला आपल्या सुखवाशी माणसाच्या अंगावर शिराळ म्हणजे ढगाची सावली पाड, असं ती सांगते.

तिथं शेतात झाडझुडुप नसलं, तरी पलीकडं नदीकाठी मात्र जांभळाचं बन असतं. दुपारी औत सुटल्यावर तो बैलांना पाणी पाजण्यासाठी तिकडं जाणारच असतो. त्या निमित्तानं दुपारचं ऊन त्याला टाळता येणार असतं. या उन्हाळ्याच्या दिवसातही तिथल्या जांभळाला हिरवागार पाला असतो. त्या गडद चमकदार हिरव्या पानांच्या सावलीत जीव सुखावतो. म्हणून तो तिलाही तिथं घेऊन जात असतो.

हा चैताचा महिना म्हणजे जांभळीला फुलोरा येण्याचा काळ. हा फुलोरा इतका सुंदर असतो की, तो कुणालाही मोहून घेऊ शकतो. त्या सुंदर फुलांकडं आपण कधी फारसं लक्षही दिलेलं नसतं. पण, त्या फुलोऱ्याचा आकार कुठल्या कलाकाराला प्रयत्न करूनही साधणं दुर्मिळ असतं. त्यामुळं जांभळीच्या फुलाचं चित्र कुणी काढल्याचं, त्याचं कौतुक केल्याचं आपल्या पाहण्यात वा ऐकिवात नसतं. हिरव्यागार पानांवर हा पांढऱ्या फुलोऱ्याचा तवर जांभळीला झाकून टाकत असतो. मोहोळाच्या माशाही त्या फुलोऱ्याभोवती रुंजी घालत असतात.

अशावेळी त्या जांभळीच्या झाडाखाली तिच्यासोबत दुपारचं ऊन टाळणं याच्यासारखं दुसरं सुख त्याच्या आयुष्यात नसतं. जवळपास माणसं नसतात. जनावरं चारा खाऊन, पाणी पिऊन, डोळे मिटून रवंथ करीत बसलेली असतात. त्यांचंही लक्ष कुणाकडं नसतं. वर जांभळीच्या झाडावर असलेली पाखरं उन्हाच्या कहारानं गडद जांभळीच्या पाल्यात स्वतःला झाकून घेण्याच्या प्रयत्नात असतात. तेव्हा इतरांकडं लक्ष द्यायला त्यांनाही वेळ नसतो. अशावेळी या चैताच्या उन्हात रानावनात कोणी माणसंही फिरताना दिसत नाहीत. कामाशिवाय कुणी घराबाहेर पडतच नाही. त्यामुळं जणू काही या नवविवाहित जोडप्यासाठीच हा एकांत अन् ही रम्य जागा निसर्गानं निर्माण केली असावी. जांभळाचा फुलोरा दाखवण्याच्या निमित्तानं तो तिलाही फुलवत असतो.

(संपर्क – inbhalerao@gmail.com)



Source link