कबीररंग: न पल बिछुडे पिया हम से…

0
16
कबीररंग:  न पल बिछुडे पिया हम से…


हेमकिरण पत्की3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘प्रेम न बाडी उपजै’, ‘ढाई आखर प्रेम का पढै़ सो पंडित होय’, ‘अकथ कहानी प्रेम की’, ‘प्रेमगली अति साँकरी’, ‘जा घट प्रेम न संचरै सो घट जान मसान’ हे कबीरांच्या दोह्यांतील उद्गार प्रेमाचे निदर्शक आहेत. ते हृदयाच्या तळांतून तीव्रतेने उमटलेले आहेत. कुठल्या प्रेमाविषयी कबीर बोलताहेत? ज्या प्रेमाची मशागत-पेरणी करता येत नाही, जे पुस्तकांतून वाचून मिळवता येत नाही, ज्याचा अनुभव आपल्या शब्दांतून दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येत नाही, जे अत्यंत तरल असतं आणि जे नसतं तेव्हा आपण चेतनाहीन असतो, त्या प्रेमाविषयी कबीर बोलताहेत.

आपण या प्रेमाचा आशय नीट समजून घ्यायला हवा. कबीर ऐहिक प्रेमाविषयी बोलत नाहीत, तर ते ईश्वरासंबंधी जे परमप्रेम आढळतं त्या शुद्ध आणि नि:स्वार्थ प्रेमाविषयी बोलताहेत. कबीरांच्या भावोत्कट पदांतले शब्द आहेत… हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या रहें आजाद या जग में, हमन दुनिया से यारी क्या। कबीर म्हणताहेत, माझं हृदय प्रभूवरच्या प्रेमात पूर्ण बुडून गेलं आहे. ते त्याच एका प्रेमाच्या भावतंद्रेत आहे. या हृदयाला जगाची कुठली वार्ता! लोकव्यवहारातली जाणीवपूर्वक जोपासलेली सतर्कता या हृदयाला नाही. आपल्याच स्वार्थप्रेरित मनानं निर्माण केलेल्या जगात माझा वास नाही. मी या जगाच्या रहाटीपासून दूर आहे, स्वतंत्र आहे. चेतना विशुद्ध ‘मी’मध्ये विरून गेली आहे आणि त्यावरच्या प्रेमामुळं ती जगाला विसरून गेली आहे. या भावस्थितीत बाहेरल्या जगाचा दोस्ताना कसा असेल? जो बिछुडे हैं पियारेसे, भटकते दर-बदर फिरते हमारा यार है हम में, हमन को इंतजारी क्या। हे संपूर्ण पदच स्वतःसह इतरांशी जोडलेल्या जाणिवेच्या प्रेमातून व्यक्त झालं आहे. ऐहिक प्रेम कसं असतं? आईचं अपत्यावरील प्रेम, पतीचं पत्नीवरील प्रेम, पत्नीचं पतीवरील प्रेम, मातापित्यांप्रति असलेलं प्रेम, मित्रा-मित्रांतील प्रेम, सत्ता आणि कीर्तीविषयीचं प्रेम हे सदैव स्वार्थमूलक असतं का? स्वकेंद्रित असतं का? या प्रेमाचा आपल्याला रोजच्या जगण्यात अनुभव येतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो किंवा आपल्या हृदयात ज्याच्याविषयी प्रेम असतं ते जसंच्या तसं राहिल्याचा अनुभव आपल्याला येतो का? या प्रेमाच्या अनुभवात भेटीचं सुख असतं, विरहाच्या वेदना असतात. कधी प्राणपणे वाट पाहणं असतं, तर कधी शब्दांपलीकडं सहन करणं असतं. ऐहिक प्रेम काल आणि परिस्थितीनुसार सतत बदलणारं असतं. कबीर म्हणतात, आत्मस्थितीवरचं प्रेम अविनाशी असतं. या प्रेमाच्या अनुभवात ऐहिकातल्या प्रेमासारखं प्रेमाचा विषय शोधत भटकणं नसतं, आपल्यावर प्रेम करणाऱ्याची वाट पाहणं नसतं. प्रीतम आत असतो. आत्म्यावर, ईश्वरावर म्हणजेच विशुद्ध ‘मी’वर परमप्रेम करणाऱ्याची भावस्थिती निव्वळ चेतनेनं व्यापलेली असते. तिचा बाहेरच्या जगाशी व्यवहार घडूनही घडत नाही. खलक सब नाम अपने को, बहुत कर सिर पटकता है हमन गुरनाम साँचा है, हमन दुनिया से यारी क्या। कबीर म्हणतात : असतेपणावर प्रेम जडलेलं चित्त आपल्या आतच गुरूचा सहवास अनुभवतं. अशा चित्तासाठी सत्य, चैतन्य, आत्मा आणि अस्तित्व हे गुरूचे समानार्थी शब्द होऊन जातात. नामरूपाशी जोडलेल्या जगातील साधकांना मात्र खूप सायास करावे लागतात. न पल बिछुडे पिया हम से, न हम बिछुडे पियारेसे उन्ही से नेह लागी है, हमन को बेकरारी क्या। या परमप्रेमाचं वर्णन करताना ऐहिक जगातल्या कोणत्या स्थिती-गतींना आपल्याला सामोरं जावं लागत नाही हे सांगताना कबीर म्हणतात, ऐहिक नसलेल्या प्रेमातली भेट तत्कालिक नसते. या प्रेमानुभवात मन अस्वस्थ नसतं. हे प्रेम कुठल्या तरी नकारात्मक भावनेत कधी बदलेल असं भयही मनाला नसतं. असतेपणाशी जोडलेलं हृदय सर्वकाळ आश्वस्त असतं. कबीरा इश्क का माता, दुई को दूर कर दिल से जो चलना राह नाजूक है, हमन सिर बोझ भारी क्या। प्रेममय झालेले कबीर आपली प्रेमानुभूती व्यक्त करतात: बाहेरचं जग व्यापून टाकणाऱ्या दोनपणाला दूर केल्यावरच असतेपणावर प्रेम जडतं. ही आत्मस्थितीशी जोडली गेलेली वाट खूप सूक्ष्म नि तरल असते. या वाटेवरून चालताना देहभावाचा भार उतरून ठेवूनच चालावं लागतं. आपण ऐहिक जगातलं प्रेम पाहू लागलो तर असं दिसतं की, त्याला सुरुवात आणि शेवट आहे. ते अखंडपणे, सातत्याने प्रवाहित राहताना क्वचितच दिसतं. असं प्रेम हे बहुधा तत्कालिक आणि परिस्थितीसापेक्ष असतं. या प्रेमामध्ये आपल्याला क्वचितच निरंतरतेचा भाव दिसतो. प्रेमाला शाश्वतता कशामुळे प्राप्त होते हे कबीरांची प्रेमानुभूती खूप उत्कटतेनं सूचित करते.

(संपर्क- hemkiranpatki@gmail.com)



Source link