रसिक स्पेशल: वास्तवाला मुरड : माणूस, यंत्र अन् मनाची गुंत

0
16
रसिक स्पेशल: वास्तवाला मुरड : माणूस, यंत्र अन् मनाची गुंत


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Article By Aadubaal | Twisting Reality: The Entanglement Of Man, Machine And Mind

आदूबाळ39 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

फिलिप के. डिक

काही लेखक लेखनामुळे तर महत्त्वाचे असतातच, पण ते भविष्यातील अनेक लेखकांना आणि कलाकारांना प्रेरणा देतात. त्यांचं लेखन फक्त कागदावर न राहता इतर माध्यमांतून रुपडं बदलून येतं. तरीही त्या मूळ लेखकाची अमीट छाप पुसलीही जात नाही. काळाच्या कसोटीला उतरणाऱ्या श्रेष्ठ लेखनाचं हे लक्षण आहे. ‘ओंकारा’ असो किंवा ‘अंगूर’ – याचं मूळ शेक्सपिअर आहे, हे ओळखायला फार वेळ लागत नाही. असाच एक लेखक विज्ञानकथांच्या सृष्टीतही होऊन गेला. त्याच्या लेखनाने हॉलीवूडपासून नेटफ्लिक्सपर्यंत अनेक माध्यमांना प्रेरणा दिली. या अमेरिकी लेखकाचं नाव फिलिप के. डिक.

वयाच्या चोविसाव्या वर्षी (१९५२) डिक यांची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांच्या कथांना ताबडतोब वाचकप्रियता मिळाली नाही. पण त्यांनी लेखनाचा सपाटा लावला. विज्ञानकथा आणि ‘असं झालं तर’ असा तर्क करून लिहिलेल्या कल्पनारम्य कथा (Speculative Fiction) हे त्यांचे आवडते प्रकार बनले. वास्तव आणि भ्रम यांच्या सीमारेषा धूसर करत, मानव आणि यंत्र यांच्यातले परस्परसंबंध तपासात, विवेक-अविवेकाच्या कल्पनांशी खेळत डिक यांचं लेखन गहन तात्त्विक आणि मानसिक प्रश्नांचा वेध घेतं. पण आपण केवळ विज्ञानकथालेखक म्हणून ओळखले न जाता मुख्यधारेतील लेखक म्हणून प्रसिद्धी मिळवावी, अशी त्यांची मनीषा होती. यात त्यांना यश मात्र मिळालं नाही. अनेक एजंटांनी आणि प्रकाशन संस्थांनी त्यांची विज्ञानकथा नसलेली पुस्तकं नाकारली. शेवटी त्यांनी तो नाद सोडून दिला.

१९५० चे दशक अमेरिकी साहित्यसृष्टीत विज्ञानकथांचे सुवर्णयुग म्हणून ओळखलं जातं. विज्ञान-तंत्रज्ञानात अमेरिका मजलांवर मजला मारत होती आणि सामान्य लोकांना विज्ञानाशी जोडून ठेवायची, त्यात रस निर्माण करायची कामगिरी ललित लेखक करत होते. विज्ञानकथा लोकप्रियता मिळवत होत्या आणि त्या प्रकाशित करणाऱ्या नियतकालिकांना वाचक डोक्यावर घेत होते. अशाच मासिकांतून डिक यांनी लिहायला सुरुवात केली. अंतराळ-साहसकथा (Solar Lottery) किंवा कुनस्थानी कथा (World of Null-A) लिहिताना डिक यांना लेखनसूर सापडत गेला. ‘काळा’ विनोद आणि लेखनाचे साचे पिरगाळून त्यातून भलतंच काही निर्माण करण्याची हातोटी, हे त्यांच्या लेखनाचं बलस्थान बनू लागलं. ‘The Man in the High Castle’ या १९६२ च्या कादंबरीने डिक यांना रसिकमान्यता मिळवून दिली. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांऐवजी जर्मनी-जपानला विजय मिळाला असता, तर जग कसं दिसलं असतं, ही कल्पना लढवत जेत्या जर्मनी-जपान यांनी दुभंगवलेल्या अमेरिकेत ही कथा घडते. (यावर आलेली दूरचित्रवाणी मालिका अत्यंत प्रेक्षणीय आहे.) या कादंबरीला त्या वर्षीचा ह्युगो पुरस्कार मिळाला आणि डिक यांची ख्याती दिगंतात पसरू लागली.

डिक आपल्या लेखनातून वास्तव कितपत लवचिक असतं, याचा शोध घेत राहिले. ‘Do Androids Dream of Electric Sheep?’ या १९६८ च्या कादंबरीत अँड्रॉइड (हुबेहूब माणसासारखे दिसणारे यंत्र (?) मानव) आणि खरेखुरे मानव यांच्यातल्या संबंधांचा वेध डिक घेतात. रिक डेकार्ड हा निवृत्त पोलिस जुन्या मॉडेलचे सहा अँड्रॉइड ठार करण्याचं काम स्वीकारतो. या सहांच्या पाठलागादरम्यान अनेक नाट्यपूर्ण घटना घडतात; पण तो कादंबरीचा गाभा नाही. रिक डेकार्डला सह-अनुभूतीचा अर्थ उलगडत जातो. वास्तव म्हणजे काय, यंत्र केव्हा यंत्र असणं सोडून मानव व्हायला लागतं, असे मूलभूत प्रश्न पडत राहतात. या कादंबरीवर निघालेल्या ‘ब्लेड रनर’ या हॉलीवूडपटाने अमाप लोकप्रियता मिळवली. इतकी की, त्यामुळे अशाप्रकारच्या अस्तित्ववादी विज्ञानकथा (Existential Sci-fi) हा एक उपप्रकार म्हणून उदयाला आला. डिक अर्थातच त्याचे अध्वर्यू होते.

डिक यांचा विज्ञानकथा जगतावरील प्रभाव कल्पनातीत आहे. त्यांच्यामध्ये आणि आजच्या वाचकांमध्ये किमान एका पिढीचं अंतर आहे. विज्ञान आणि एकंदर जग पुढे आलं आहे. आता अँड्रॉइड ही कल्पना राहिलेली नाही आणि शीतयुद्ध संपून तीन दशके लोटली आहेत. तरीही डिक यांचं लेखन तरुण पिढीला आकर्षून घेतं, कारण त्यातल्या कालातीत संकल्पना. (अर्थात ‘टोटल रीकॉल’, ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ वगैरे डिक यांच्या कादंबरीवर बेतलेल्या आणि अमाप गाजलेल्या चित्रपटांनाही हे श्रेय द्यावं लागेल.) डिक यांनी वाचकाला वास्तव जगाबद्दलची गृहीतके परत तपासून बघायला लावली. वाचकांना तात्त्विक प्रश्न पडले. ते सोडवण्यासाठी त्यांनी चर्चा केल्या आणि ते चर्चाविश्व अजूनही जिवंत आहे.

डिक केवळ लेखक नव्हते, ते द्रष्टे तत्त्वज्ञ होते. झकासपैकी गोष्टीवेल्हाळ होते. जोपर्यंत मानवाला अस्तित्वाच्या अर्थाविषयी प्रश्न पडताहेत, तोपर्यंत कोणी ना कोणी पुस्तकांच्या दुकानात जाऊन डिक यांचं पुस्तक मागेल. ‘संपूर्ण मी तरू, की आहे नगण्य पर्ण’ याचं उत्तर डिक यांच्याबाबत मिळालेलं आहे.

(संपर्क- aadubaal@gmail.com)



Source link