महेंद्र कदम1 तासापूर्वी
- कॉपी लिंक
गेले वर्षभर मी या सदरातून दर पंधरा दिवसाला विविध विषयांवर लिहीत आलो. आजचे हे शेवटचे टिपण आहे. साहित्य, कला, संस्कृती, शेती, व्यवसाय, शिक्षण, नोकरी, जागतिकीकरण, विज्ञान-तंत्रज्ञान, खासगीकरण, कामगार, स्त्री व तिचे प्रश्न अशा विविध विषयांवर काल, आज आणि उद्या या अंगाने लिहीत, चर्चा करत आलो. त्याला महाराष्ट्रातून उतम प्रतिसाद मिळाला. माणसं भरभरून बोलत होती. शंका विचारत होती. प्रश्न करत होती. चर्चा घडत होत्या. त्या निमित्ताने मी महाराष्ट्राशी नव्याने जोडला गेलो. अनेक जण डोळ्यांत पाणी आणून बोलायचे. कुणाला त्यांच्या बालपणीचा काळ आठवत होता, आता कालचं काहीच राहिलं नाही म्हणून ती हतबल होत होती. लिहून काय उपयोग नुसता? त्याला पर्याय सांगा.. असंही काही जण म्हणत होती.
पाक्षिक सदर लेखन करणे जोखमीची गोष्ट होती, पण वर्षभर ती गांभीर्याने केली. त्याला मिळणारा प्रतिसाद लेखनाची ऊर्जा वाढवत गेला. पण, आपण केवळ लिखितच कृती करू शकतो याची अधूनमधून खंत वाटत राहते. आपल्या लेखनाने किती बदल होणार याची शंका सतत सोबत असायची. अनेक प्राध्यापक, वकील, व्यावसायिक, पत्रकार, शेतकरी अशी मंडळी चर्चा करत असताना एका अर्थाने मीही समृद्ध होत होतो. अनेक वाचकांनी मला सतत अपडेट केले. त्यामुळे अधिक ज्ञान मिळत गेले. विविध प्रश्नांची मांडणी करताना किमान आपण बोलायला हवे. काही चुकीच्या गोष्टी थांबवता नाही आल्या तरी त्यांची साखळी तोडून अशा गोष्टींना पायबंद घालायचा, तर लेखन हा एक महत्त्वाचा ऐवज माझ्या हाती होता. त्यामुळे या लेखनातून मी किमान काही हस्तक्षेपाची भूमिका घेऊ शकलो. त्यातून अनेक विषयांना तोंड फोडता आले. त्यातून साधकबाधक चर्चा झाल्या, त्याही नवी उमेद देणाऱ्या होत्या.
अगदी आज समारोपाचं लिहिताना शेतात ऊसतोड आलेली आहे. त्या टोळीतील दोन तरुणी वीस – बावीसच्या आहेत. त्यातली एक ओली बाळंतीण आहे. पंधरा दिवसांत उसाच्या फडात हजर झाली आहे, तर दुसरी तरुणी सात महिन्यांची गरोदर आहे. ती पोटाची खळगी भरण्यासाठी मध्य प्रदेशातून आली आहे. अनेक लहान मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. ‘साखर शाळा’ बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. इतके कष्ट करूनही त्यांच्या हातातोंडाची नीट गाठ पडत नाही. त्यातून सतत एक अनामिक असुरक्षितता सोबत घेऊन जगणारी ही मंडळी अनेकदा कडाकडा भांडत राहतात, मारामाऱ्या करतात. व्यवस्थेवरचा राग असा आपल्याच जिवाभावाच्या लोकांवर काढून डोकी शांत करतात. पुन्हा पहाटे उठून उसाशी झटाझोंबा घ्यायला तयार होतात. दुसरीकडे, अनेकदा उचल घेऊन टोळी न आल्याने बरेच वाहतूकदार कर्जबाजारी झाले आहेत. त्यांना काहीच करता येत नाही. तिसरीकडे, शेतकऱ्याच्या हाती फार काही पडत नाही. हा सगळा विरोधाभास सभोवती वाढत चालला आहे. त्याने सुन्न व्हायला होते.
या आणि अशा विविध विषयांवरील प्रश्नांना शक्य तेवढं शब्दांत पकडून मला वाचकांपुढं मांडता आलं. त्याचं स्वागतही उत्तम झालं. त्यामुळं लिहिण्याची कसलीही शिस्त नसलेल्या मला या लेखनाच्या निमित्ताने एक शिस्त लागली. मर्यादित शब्दांत एखादा विषय नीट कसा मांडावा याचे भान येत गेले. वाचकांशी थेट जोडलो गेल्याने अनेक प्रश्न नव्याने समजून घेता आले. त्यासाठी तुम्हा साऱ्यांचे मनापासून आभार मानून या लेखनाला पूर्णविराम देतो.
(संपर्क – mahendrakadam27@gmail.com)







