अरविंद जगताप3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
प्रेमात नसलेल्यांना प्रश्न पडतो की, प्रेमात पडलेले लोक काय बोलत असतील तासन््तास? प्रेमात पडलेल्यांना मात्र अजून खूप बोलायचं बाकी आहे, असं वाटत राहतं. नचिकेत मोठमोठे मेसेज टाइप करत होता. वैदेही मोठमोठ्या मेसेजने उत्तर देत होती. अचानक समोरून एक कार राँगसाइड आली. तिला चुकवताना नचिकेतचा ताबा सुटला. कार थेट रस्त्याच्या कडेला मोठ्या खड्ड्यात आदळली…
नचिकेत वैदेहीला भेटून निघाला होता. अवघी पाच मिनिटे झाली असतील. पुन्हा तिचा मेसेज आला. ‘काय करतोयस?’ खरं तर तिच्यासमोरच तो कारमध्ये निघाला होता. पाच मिनिटांनंतर तो कारच चालवत असणार हे उघड होतं. पण, प्रेम वेडं असतं. लग्नानंतरचं प्रेम तर खूपच वेडं. आणि दुसऱ्याच्या बायकोवर असेल तर जवळजवळ मूर्खपणाकडं जाणारं… नचिकेतचं लग्न होऊन दहा वर्षे झालीत. वैदेही पण पाच वर्षे झाले विवाहित आहे. पण, ऑफिसमध्ये नचिकेत आणि वैदेहीची ओळख झाली. प्रेमात पडले. वैदेहीचा नवरा मार्केटिंगवाला. सारखा बाहेर. तिला फार चिंता नसायची. पण, नचिकेतला हे सगळं खूप अवघड जायचं. त्याची बायको प्रिया हाऊस वाइफ. नचिकेत आणि लहानगा प्रतीक हेच तिचं विश्व.
नचिकेतला थोडा उशीर झाला तरी ती काळजी करायची. वैदेहीला भेटण्यासाठी नचिकेतला खूप खटपट करावी लागायची. आधी वैदेही ऑफिसमध्येच होती. पण, तिथे दोघांच्या प्रकरणाचा बोभाटा झाला. नचिकेतला ते ऑफिस सोडावं लागलं. मग दोघे ऑफिस सुटल्यावर भेटू लागले. नचिकेतला घरी नेहमी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात. त्याची बायको – प्रिया खूप रागीट आहे. तिला जरा खोटं सहन होत नाही. वैदेहीमुळं नचिकेतमध्ये खूपच फरक पडलाय. राहण्यात तर फारच. याच गोष्टीचा प्रियाला संशय. त्यात नेहमीच काही ना काही कारणाने नचिकेतचं घरी उशिरा येणं. छोटी-मोठी भांडणं चालूच असतात. पण, प्रियाला संशय येईल, असा काही पुरावा अजून सापडलेला नाही. तरी नचिकेतला एका गोष्टीची खात्री आहे की, बायकोला त्याच्या प्रेमप्रकरणाची चाहूल लागली तर ती आकाशपाताळ एक करून टाकेल. अर्थात हे सगळ्याच नवऱ्यांना माहीत असतं.
जगातल्या कुठल्याच बायकोला नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध कधीच पचणार नाहीत हे माहीत असूनही या गोष्टी घडत असतातच. नचिकेतच्या बाबतीतही तेच झालं. वैदेहीला भेटून आता पंधरा – वीस मिनिट झाले होते. पण, अजूनही दोघं मेसेजवर बोलतच होते. गाडी चालवता चालवता नचिकेत उत्तर देत होता. वैदेही आपल्यावर किती प्रेम करते या गोष्टीने मनोमन सुखावत होता. दरम्यान, बायकोचा दोनदा मेसेज येऊन गेला होता. आपण प्रेझेंटेशनमध्ये आहोत, असं त्याने आधीच सांगून ठेवलेलं असल्यामुळं बायको कॉल करत नव्हती. तिने पाठवलेल्या मेसेजला नचिकेतने उत्तरही दिलं नव्हतं. मोबाइलवर आलेल्या कुठल्याच मेसेजला तो उत्तर देत नव्हता. एक वैदेहीचा मेसेज सोडला तर. प्रेमात नसलेल्या माणसांना प्रश्न पडतो की, प्रेमात पडलेले लोक काय बोलत असतील तासन््तास? प्रेमात पडलेल्या माणसाला तासन््तास बोलूनही अजून खूप बोलायचं बाकी आहे असं वाटत राहतं. नचिकेत मोठमोठे मेसेज टाइप करत होता. वैदेही मोठमोठे मेसेज पाठवत उत्तर देत होती. अचानक समोरून एक कार राँगसाइड आली. तिला चुकवताना नचिकेतचा कारवरचा ताबा सुटला. कार थेट रस्त्याच्या कडेला मोठ्या खड्ड्यात आदळली.
अंधार! काही क्षण फक्त अंधार होता. हळूहळू नचिकेतला कारच्या लाइटचा हलकासा उजेड दिसू लागला. कारच्या अजूनही चालू असलेल्या इंजिनचा आवाज येऊ लागला. कारमध्ये आपण अडकलोय याची जाणीव होऊ लागली. डोक्यात वेदना होऊ लागल्या. पाय तर उचलताही येत नव्हता. अचानक खूप गोष्टी लक्षात येत होत्या. पण, आधी काय करावं याचं भान अजूनही येत नव्हतं. डोक्याला हात गेला नकळत.. चांगलंच रक्त येत होतं. पायाची हालचाल करण्याचा प्रयत्न केला, पण शक्य होत नव्हतं. दार उघडायचा प्रयत्न सुरू केला. पण, खूप जोर लावावा लागणार होता. तेवढं बळ अंगात नाही असं वाटत होतं. आपण जगू की नाही, असं वाटू लागलं. आणि एका क्षणातच या सगळ्या गोष्टी नचिकेतला गौण वाटू लागल्या. आपण मोबाइलवर वैदेहीशी बोलत होतो. आपले मेसेज जसेच्या तसे आहेत. जगलो न जगलो तरी ते मेसेज बायकोच्या हाती पडायला नकोत. वेगात डोकं चालू लागलं. आधी ते मेसेज डिलीट केले पाहिजेत. मोबाइल उचलायला गेला. पण, तो जागेवर नव्हता. नचिकेत मोबाइल शोधू लागला. पण, काही केल्या तो दिसत नव्हता. अपघात झाला तेव्हा आपण मेसेजच टाइप करत होतो, हे त्याच्या लक्षात आलं. मोबाइल पायापाशी पडला असणार. नचिकेत थोडा वाकायला गेला तर त्याच्या पाठीत एवढी जोरात कळ गेली की डोळ्यात पाणीच आलं. आपली पाठ कायमची जायबंदी झाली की काय, अशी भीती त्याला वाटू लागली. पण, ती क्षणिक ठरली. त्याला सगळ्यात मोठी भीती होती की, आपले आणि वैदेहीचे मेसेज बायकोला सापडले तर? वाकता येत नसतानाही तो नजरेने मोबाइल शोधू लागला. काही केल्या मोबाइल दिसत नव्हता. शेजारच्या सीटवर बघू लागला. आता त्याच्या लक्षात आलं की, मान वळवतानाही त्याला मरणाच्या वेदना होत आहेत. पण, या गोष्टी सध्या किरकोळ होत्या. मोबाइल शोधणं महत्त्वाचं होतं त्याच्यासाठी. तो मोठ्या कष्टाने मोबाइल शोधू लागला. त्रास वाढतच होता.
खूप वेळ उठण्याचा प्रयत्न करूनही नचिकेतला उठता येत नव्हतं. डोळ्यासमोर अंधारी येत होती. तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागली. चमत्कार झाल्याप्रमाणं जिवात जीव आल्यासारखा नचिकेत मोबाइलकडं बघू लागला. उजव्या हाताला असलेल्या पाण्याच्या बाटलीच्या जागी मोबाइल पडलेला होता. खूप वेदना होत असतानाही त्याने मोबाइल उचलला. बघतो तर बायकोचा कॉल होता. तो उचलावा की नाही, असा विचार आला. त्याची हिंमत झाली नाही. आपण प्रेझेंटेशनमध्ये होतो, मग इकडं भलतीकडं कसं आलो? अगदी विरुद्ध दिशेला.. कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. बहाणे बनवायची अवस्था नव्हती. डोकं चालत नव्हतं. त्याने फोन उचलला नाही. कदाचित हा बायकोचा शेवटचा फोन असेल, निदान आवाज ऐकूया एवढंच वाटलं. पण, तेवढ्यात फोन कट झाला. त्या क्षणी त्याने वैदेहीला फोन लावला. अपघात झाल्याचं सांगितलं. पण, ती हसू लागली. तिला आधी गंमत वाटली. अशी गंमत करायची नचिकेतला सवय होती. पण, त्याच्या आवाजावरून तिला विश्वास वाटू लागला.
नचिकेत तिला लोकेशन सांगायचा प्रयत्न करत होता. ‘कदाचित हा आपला शेवटचा फोन..’ असंही म्हणाला. वैदेही म्हणाली,“असं वेड्यासारखं बोलू नको.. आधी मेसेज डिलीट कर..’ विवाहित लोकांचे नसतील जुळत, पण विवाहबाह्य संबंध असणाऱ्यांचे विचार खूप जुळतात. असल्या भीतीपोटी. तिच्याही डोक्यात तेच आलं. बोलता बोलता ती म्हणून गेली की, उद्या तू नसताना आपले मेसेज सापडले तर माझं काय होईल? वैदेहीला आता फक्त तिचंच पडलं होतं. तिच्या नवऱ्याला कळलं तर? नचिकेतला अपघातात मदत करायचा विचार सोडून ती ‘मेसेज डिलीट कर..’ एवढंच बोलत होती. काही लागलंय का? काही मदत हवीय का? एवढंही वैदेहीने विचारू नये, हे नचिकेतला खूप दुखावणारं होतं. तो काही बोलू बघत होता, पण वैदेही मोठ्याने रडत होती. नचिकेतला आता कधी नव्हे तेवढी बायकोची आठवण येत होती. वैदेहीला पहिल्यांदाच नवऱ्याची एवढी काळजी वाटत होती. पण, दोघांची वेळ चुकीची होती. वैदेहीला संताप आला. आपण एवढं रडून पडून विनंती करतोय मेसेज डिलीट करायची आणि नचिकेत काहीच उत्तर देत नाही.. पण, नचिकेत आता कधीच उत्तर देणार नव्हता. देऊ शकत नव्हता.. कदाचित शेवटच्या क्षणी त्याला चुकीची जाणीव झाली होती. पण, पश्चात्ताप करायला वेळ मिळाला नाही. मेसेज येत असेल, पण चुका डिलीट करता येत नाहीत.
(संपर्क – jarvindas30@gmail.com)






