Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रसोलापूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सोलापूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सोलापूर : केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरीबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे, असे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या 30 हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्यातील 15 हजार घरकुलांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख तसेच रे नगर हौसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रधानमंत्री मोदी पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व वाढत असून त्यात छोट्या उद्योगांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे. त्यासाठी सुक्ष्म, लघु व कुटीर उद्योगांची भूमिका खूप मोठी आहे. त्याकरिता अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठ्या आशा वाढल्या आहेत. अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्रक्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

केंद्र शासनाने गरिबांसाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध योजना राबवल्या. त्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देऊन मध्यस्थांची साखळी बंद केली. गेल्या 10 वर्षात 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या खात्यावर थेट पाठविले. जनधन योजना, आधार आदीद्वारे 10 कोटी बनावट लाभार्थ्यांना हटविण्याचे काम केले. याशिवाय गरिबांना साधन, संसाधने उपलब्ध करून दिल्यास ते गरिबीचा पराभव करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे लक्षात घेऊन मागील 9 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे 25 कोटी नागरीक गरिबीतून बाहेर आल्याचे ते म्हणाले.

दावोस येथे अनेक देशांचे राजकीय नेते, प्रशासक, उद्योजक व गुंतवणूकदार यांच्या भेटी झाल्या त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगात देशाचे महत्त्व वाढवत असल्याचा अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला.

सोलापूर हे देशातील सर्वात मोठे श्रमिकांचे शहर असल्याचे सांगून रे नगर येथील गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन पंधरा हजार नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त करून त्या सर्व कुटुंबांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी रे नगर फेडरेशन व गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी प्रास्ताविक केले. या गृह प्रकल्पाविषयी तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी दिली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटीच्या कामाचा शुभारंभ केले केंद्र शासनाच्या अमृत. 2 योजनेअंतर्गत भिवंडी निजामपूर, सांगली, उल्हासनगर व कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगाव, सातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण 1 हजार 201 कोटी एक हजार रुपयांच्या खर्चाच्या पाणी पुरवठा व मलनिसारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.रे नगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या रे नगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. सोलापूर महापालिका अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीची पत्रही यावेळी वितरित करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments