
28 नोव्हेंबरच्या रात्री उत्तराखंडच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, असा एक मजूर आहे, जो बोगद्यातून बाहेर आला मात्र, बाहेर येताच त्याला कळलं की त्याचे वडील काही वेळापुर्वीच हे जग सोडून निघून गेले.
गेल्या 17 दिवसापासून उत्तराखंडच्या सिल्कियारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Collapse Rescue: ) अडकेलेल्या 41 कामगारांनी मंगळवारी (28 नोव्हेंबर) हे जग पाहिलं. इतक्या दिवसाच्या या बचाव अभियानाला शेवटी यश मिळालं आणि हे सर्व कामगार सुरक्षितपणे 28 नोव्हेंबर रोजी बोगद्यातून बाहेर आले. त्यांचे कुटुंबीय गेल्या 17 दिवसांपासून त्यांची वाट पाहत होते. कामगार बाहेर येताच त्यांचा आंनद गगनात मावेनासा झाला. मात्र, यातील एक मजूर एवढा दुर्दैवी होता की, तो स्वत: सुखरूप बाहेर आला, मात्र तो बाहेर येताच त्याच्या वडिलांचं छत्र हरपल्याचं त्याला सांगण्यात आलं.
तो दुर्दैवी मजूर कोण?
भक्तू मुर्मू असे या दुर्दैवी मजुराचे नाव असून तो झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बंकशील पंचायतीमधील बहदा गावातील रहिवासी आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री भक्तूला सर्व मजुरांसह सुखरूप बाहेर काढण्यात आले. पण बाहेर आल्यावर त्याला एक दुर्दैवी बातमी मिळाली. काही काळापूर्वी त्यांचे वडील हे जग सोडून गेल्याचे भक्तूला सांगण्यात आले.








