
दत्ता पाटील8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आमच्या बारदानात गोष्टी आता तशाही गोष्टी उरलेल्या नाहीत. ‘आमच्याकडं पाऊस नाही,’ ही गोष्ट सांगावी, तर तीच गोष्ट समोरच्यांकडं आहे. ‘आमच्याकडं पिकांवर रोग पडल्यानं पिकं फेकून दिली,’ ही गोष्ट सांगावी, तर तीही सगळ्यांकडं आहे. मग गप राहतात माणसं. गर्दीतही मनातून गप्प असतात. देशाच्या विकासावर बोलतात, परदेशातील युद्धावर बोलतात. आपल्या जगण्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी ऐकवतात.
पलीकडच्या शिवारातला मळकट फाटक्या कापडाच्या तुकड्यासारखा दिवसरात्र शिवारभर भटकत, फडफडत राहणारा म्हातारा आज पहाटे गेला. पंचवीस-तिशीत निबर झालेल्या गावशिवारातल्या तरूण पोरांनी गावातून म्हाताऱ्याच्या रंगीत फोटोचे फ्लेक्स बनवून जागोजागी लावले. म्हातारा जिवंतपणीही कधी प्रत्यक्षात इतका रंगीत दिसला नव्हता. म्हाताऱ्याच्या वावराच्या कोपऱ्यावरही उभा फ्लेक्स लावला. “सौंसाराला सोडून तुम्ही वैकुंठाला गेला, पोरके झालो कायमचे कोण वाली आम्हाला” यासह सात-आठ ओळी फ्लेक्सवाल्यानं टाकलेल्या. नावाआधी स्वर्गीय लिहिलेलं. वरही “कळविण्यास अत्यंत दुःख होते की प्रगतीशील शेतकरी आणि आधारवड अमुक यांना स्वर्गवास झाला..” वगैरे लिहिलेलं.
‘स्वर्गवासी’ होणंही एकूणच आमच्या शेतकरी बारदानाच्या जीवनातील सर्वात दुःखदायक घटना असते. स्वर्ग हे काही सुख नाही. सगळ्या धर्मांनी लोकांना स्वर्गप्राप्ती करून देण्याचं उक्तं घेतलेलं असतं. त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्या धर्मांना राजकीय लोकांची, मध्यस्थांची गरज भासते. जगभरातील धर्मांनी राजकारणाला सत्तेसाठी खूप मतदार मिळवून दिले आहेत. धार्मिक लोकांचं मतदारात रूपांतर करणं खूप सोपं असतं. धर्मासोबत जोडल्या गेलेल्या राजकीय पक्षांना मग सहज सत्ता मिळते. राजकीय पक्ष धर्मासाठी मतदारांचं रूपांतर धर्मरक्षकात करतात. कुणी विरोध केला, तर त्यावर धर्माला विरोध केल्याचा ठपका ठेवून द्रोही ठरवलं जाणं सोपं जातं. अशा धर्मांनी स्वर्गप्राप्ती करून देण्याची सिस्टीम त्यांच्या त्यांच्या देशात उभी केलेली असते. त्या त्या धर्माच्या पंडितांकडून, मध्यस्थांकडून यथावकाश घोषणा झाली की, आत्मा मोक्ष मिळून निघून जातो नि मग आत्मा नसलेल्या आपल्याकडील घरशिवारात वाटण्यांचा मार्ग मोकळा होतो. दहा – बारा एकर दारिद्र्याचे दोन किंवा तीन किंवा चार भाग केले जातात. या देशातलं दारिद्र्य संपत नाही. ते आणखी चार घरात उगवतं.
दारिद्र्याचं विकेंद्रीकरण… एक दारिद्र्य चार जणांनी मिळून पेलण्यापेक्षा चार दारिद्र्यांवर चार जणांची सत्ता. आपापल्या वाट्याला आपापलं दारिद्र्य असलं, तरी काहीतरी आपल्या मालकीचं असल्याचं सुख केवढं मोठं… सत्ता असते आपापल्या दारिद्र्यावर आपली! अजून काय हवं? आधारवड म्हणून फ्लेक्सवर छापलेला हा शिवारातला बाबा तिरडीला वापरलेल्या एकूण बांबूंच्या वजनापेक्षाही हलका होता. बांधावर उभा राहिला, तर वाऱ्यानं त्याची पातळ सावलीही इतस्ततः विखरून जायची… खोकल्याच्या आवाजाव्यतिरिक्त त्याच्याकडं सांगण्यासारखं काही उरलंही नव्हतं. काही बोलायला जायचा, तर शब्दांची जागा खोकलाच घेई. नातवांना सांगायला गोष्टही उरली नव्हती त्याच्याकडं. तशाही शिवारात कुठल्याच गोष्टी शिल्लक नाहीत.. पुढच्या पिढीला रिझवू शकतील अशा.. होत्या त्या बाहेरच्या. राजकारणाच्या. किंवा पुराणातल्या. त्या गोष्टींचा या मातीशी संबंध नाही. स्वर्गाचं वर्णन त्यातूनच ऐकलेलं सगळ्यांनी… विकासाचं वर्णन प्रचारातून ऐकलेलं.. सकाळी-संध्याकाळी रेग्युलर आपापल्या घरात खायला मिळतं सगळ्यांना. गेली अनेक शतकं. परंतु, आपल्याला घरात खायला मिळतंय, ही घटना म्हणजेच विकास, असं सांगणारी प्रचारकी माणसं गावशिवारात फिरत राहतात हल्ली. त्यामुळं स्वर्ग ही गोष्ट यापेक्षा नेमकी वेगळी कशी असेल, याचा आमच्या बारदानाला अजून अंदाज येत नाहीय… आता आपला हा काटकुळा, कुरूप नव्वदीचा म्हातारा मोक्ष मिळवून चिंधीभर आत्म्यासह वर स्वर्गात जाऊन काय करेल? तिथं आधीच पोहोचलेले कसं पाहतील त्याच्याकडं? अंगाचा घामट उग्र वास अत्तराची अंघोळ घालून बंद करतील का ते? त्याला भरजरी सोनेरी कापडं घालतील का? हातात सोन्याचं कडं, अंगठ्या, गळ्यात मोत्यांच्या माळा, पायात सोन्याच्या खडावा.. कसा दिसेल तो? त्याचा अर्धवट जळालेल्या काळ्या खोडासारखा रंग या श्रीमंती रंगाला मॅच होईल का? सोन्यानं लिंपलेल्या कृश मृतदेहासारखा फिरत राहील का स्वर्गात?
सगळं शिवार जमू लागलंय. अंगणातलं, आतून पोखरलेलं काळं ठिक्कर पडलेलं झाड केव्हा ना केव्हा पडेल, हे माहीत असलं, तरी ते कोसळल्यावर त्याच्या आकाराचं रिकामं झालेलं अवकाश पाहून माफक शोकाचे कढ यावेत, त्याप्रमाणं घरातल्या काही बायका रडत होत्या. रडताना म्हाताऱ्याच्या आयुष्यातल्या घटना सांगत होत्या. पुढच्या काही दिवसांसाठी म्हातारा त्याच्या कुटुंबकबिल्यासाठी स्वत:ची छोटीशी गोष्ट देवून तर गेला… आमच्या बारदानात गोष्टी आता एवढ्याच उरल्या आहेत. ‘आमच्याकडं पाऊस नाही,’ ही गोष्ट सांगावी, तर तीच गोष्ट समोरच्यांकडं आहे. ‘आमच्याकडं पिकांवर रोग पडल्यानं पिकं फेकून दिली,’ ही गोष्ट सांगावी, तर तीही सगळ्यांकडं आहे. मग गप राहतात माणसं. गर्दीतही मनातून गप्प असतात. देशाच्या विकासावर बोलतात, परदेशातील युद्धावर बोलतात. आपल्या जगण्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी ऐकवतात. आपल्या जातीची माणसं एक झाली पाहिजे, म्हणतात. आपला धर्म जन्माला आला नि मग आपल्या धर्मानं पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे तयार केले, असं सांगून एकमेकांना चकित करतात.
म्हाताऱ्याला पोहोचवून आल्यावर घरापुढची गर्दी संपली. शिवार शांत झालं. रेग्युलर कामात व्यस्त झालं. संध्याकाळच्याला भाकरी पोहोचवायला गेल्यावर अंगणात गप्पा रंगल्या होत्या. प्लास्टिकच्या खुर्चीवर चादर टाकून म्हाताऱ्याचा फोटो ठेवलेला होता. भावबंदकीतले तीन म्हातारे घोळक्यात बसूनही एकेकटे वाटत होते. खुर्चीतल्या फोटोसारखे. आजूबाजूच्या गप्पांचा, हसण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. जणू ते वर्तमानात नाहीतच. गावशिवारातले वयस्क, अकाली वयस्क असलेले खूप लोक मरण येत नाही म्हणून जगताहेत. ते हालचाल करतात. जमलं तर शेतात झुलत राहतात. दरवेळी मतदान करतात. विचारून घेतात, कोणाला करायचं ते… अंगणातले नातलग जेवायला बसले. जेवतानाही कोणाकोणाला मोबाइलवर कॉल येत होते. तरूण पोरं रिल्स बघत होती. काही एकमेकांना मेसेज वाचून दाखवत होती. गावांकडं एकमेकांना आधार देतील किंवा रमवतील अशा गोष्टीच शिल्लक राहिलेल्या नाहीत… गेलेल्या म्हाताऱ्यावरही कोणी बोलत नाही… कुणाकडंच गोष्ट नाही.. मोबाइलच्या रिल्समधल्या रेकॉर्डेड लाफ्टरचे आवाज.. जेवतानाचे तोंडांचे मचमच आवाज.. हे वाढू का? चतकोर दे.. बस बस.. पाणी द्या.. एवढेच संवाद… काहीच नाही सांगायला कोणाकडं…
अंधार पडला होता. पोरांनी मंडपवाल्याकडून अंगणात मोठा चौकोनी फोकस लाइट लावला होता. त्यासमोर असंख्य पतंगांची गर्दी जमलेली.. जेवून घरी निघताना उजेडाच्या भोवतालचा अंधार अधिकच घट्ट झालेला.. झाडावर बांधलेला फ्लेक्स वाऱ्यानं तिरका झालेला.. एका बाजूची सुतळी निघाल्यानं तो गळफास घेतल्यागत लटकलेला.. वाऱ्यानं फडफड चालू.. काळोखात पिंगळा पक्ष्यांच्या समूहानं ओरडून उच्छाद मांडलेला.. जरा दूर आल्यावर थांबलो. हवेतील गार, उदासवाणा गंध अस्वस्थ करत होता. विशाल आकाशातल्या तारकांच्या असंख्य पुंजक्यात कुठं तरी स्वर्ग आणि दूरवर क्षितिजापर्यंत मैलोन मैल पृथ्वीवर सबंध अंधाऱ्या भवतालात लुकलुकणाऱ्या अनेक पिवळ्या – पांढऱ्या दिव्यांच्या पुंजक्याचा भाग झालेलं म्हाताऱ्याचं घरही…
(संपर्क : ९४२२७६२७७७, dattapatilnsk@gmail.com)







