Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रलोक-प्रशासन: जय कार्यक्रम... जय उद्घाटन..!

लोक-प्रशासन: जय कार्यक्रम… जय उद्घाटन..!

लोक-प्रशासन: जय कार्यक्रम… जय उद्घाटन..!

[ad_1]

शेखर गायकवाड10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

शासकीय कारभारात भूमिपूजन, उद्घाटन, अनावरण, शिलान्यास असे कार्यक्रम आलटून पालटून सतत सुरू असतात. विशेष म्हणजे, एकाच इमारतीच्या किंवा वास्तूच्या कारकिर्दीत आणि त्याच त्या योजनांच्या अथवा प्रकल्पांच्या वाट्याला वारंवार येणारे असे सोहळे प्रत्येक वेळी तितक्यात उत्साहात पार पडतात. एकूणच प्रशासनाच्या सर्व स्तरांमध्ये वर्षभर कुठं ना कुठं कार्यक्रम, उद्घाटन नि पुन्हा उद्घाटनाचा घोष दुमदुमत असतो!

शासकीय प्रकल्पांच्या आणि इमारतींच्या आयुष्यात उद्घाटनाचा योग बऱ्याच वेळा येतो. कधी सत्ताबदल झाल्यामुळे, तर कधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये टोकाचे मतभेद असल्यामुळे अनेक वेळा बोहल्यावर उभे राहण्याचा प्रसंग ‘सरकारी इमारती’वर येतो. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर एकाच इमारतीचे दोन ते चार वेळा भूमिपूजन, दोन – तीन वेळा पायाभरणी किंवा उद्घाटन होण्याचे प्रसंग येतात! कोणत्याही नागरिकाने किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी, ‘पुन्हा उद्घाटन का ठेवले?’ असा प्रश्न विचारला, तर त्यांना जे उत्तर मिळते, ते फार मार्मिक असते. या उत्तरांची ही काही मसालेवाईक उदाहरणे :

१) आम्ही यापूर्वी बिल्डिंगचे उद्घाटन केले, आता अभ्यासिकेचे उद्घाटन आहे. २) पूर्वी इमारत झाली होती, आता वाय-फायचे उद्घाटन आहे. ३) इमारतीमधील पुतळ्याचे उद्घाटन आहे. ४) इमारतीच्या शेजारी बांधलेल्या टॉयलेटचे उद्घाटन आहे. ५) पूर्वी इमारत बांधली होती, आता त्या इमारतीच्या बोर्डाचे अनावरण आहे.

अगोदरच्या सरपंचाने भूमिपूजन केले आणि नवीन सरपंच निवडून आले की, त्याच जागेवर इमारतीची दिशा बदलून आणि नवे डिझाइन कसे चांगले आहे, हे त्यांच्या बगलबच्च्यांना पटवून देऊन परत भूमिपूजन होते. गंमत म्हणजे, आपल्या आणि नेत्याच्या हौसेसाठी असं भूमिपूजन करताना कार्यकर्ते त्यात कुठला ना कुठला राजकीय मुद्दा घुसवून तो नेत्याला पटवून देतात. काहीच मोठं कारण मिळालं नाही, तर मग पौरोहित्य करणाऱ्या भटजींनाही त्यात ओढलं जातं. अशावेळी कार्यकर्ते नेत्याला सांगतात, की अण्णा, विरोधी पार्टीचे भटजी आपल्याला नको. आपल्या भटजींकडून कार्यक्रम करायचा बघा!’ मग गावात सत्ताधारी भटजी आणि विरोधी पक्षाचे भटजी अशी उगाचच विभागणी होते. वास्तविक तिथं तसं काहीच नसतं. कधीकधी उद्घाटन करताना प्रचंड विसंवाद निर्माण होतो. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेल्या पुरूष नेता, मॅटर्निटी वॉर्डचे उद्घाटन करताना किंवा टॉयलेट ब्लॉकचे उद्घाटन करताना गोंधळून जातो, तर कधी महिला अध्यक्षांच्या हस्ते पुरुष नसबंदी कक्षाचे उद्घाटन ठेवले जाते. त्यावेळी पेशंटचे अभिनंदन करावे की सांत्वन, हे समजत नसल्यामुळं फोटोत अतिशय विचित्र हावभाव पाहायला मिळतात.

जिवंत असताना आपल्याच गावात तीन-तीन वेळा स्मशानभूमीच्या उद्घाटनाची वेळ नेत्यावर आणणारा असा हा आगळा वेगळा ‘वारंवार उद्घाटन योग’ आहे. एका जिल्हा परिषद सदस्याच्या हस्ते गावातील स्मशानभूमीच्या शेडचे उद्घाटन ठेवले होते. त्यावेळी त्या पदाधिकाऱ्याच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी १० फूट बाय १५ फुटांचा मोठा बॅनर फोटोसह लावला. त्यावर लिहिले.. ‘येणार.. येणार.. एक दिवस भाऊ नक्की येणार!”

एकदा एका नव्याने जिल्हा परिषद अध्यक्ष झालेल्या नेत्याने सर्व विभाग प्रमुखांना हुकूम सोडला की, मी अध्यक्ष झाल्याचे जनतेला कळले पाहिजे. त्यासाठी दर आठवड्याला जिल्ह्यात आणि विशेषत: मतदारसंघात कोणता तरी उद्घाटनाचा समारंभ किंवा कार्यक्रम आयोजित करावा. तसेच प्रत्येक कार्यक्रमाच्या / भेटीच्या वेळी फोटोग्राफर सोबत ठेवा. थोड्याच दिवसांत अध्यक्षांना तो फोटोग्राफर सीईओपेक्षा मोठा वाटू लागला! चांगल्या फोटोच्या मोठ्या फ्रेम अध्यक्षांना देऊन हजारो रुपयांचे बिल कसे करायचे, याची कला हा फोटोग्राफर एका महिन्यात शिकला. मग जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी फोटोंचा खर्च करण्याची सूचना कार्यकारी अभियंते कंत्राटदारांना देऊ लागले. या सगळ्या प्रक्रियेमुळे सर्वांचाच विकास होत असल्याचा भास निर्माण झाला! जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याने अध्यक्षांचे हे मर्म नेमके ओळखून पावले उचलायला सुरूवात केली. पुढच्या चार महिन्यांत दर आठवड्याला त्याने जिल्हा परिषद अध्यक्षांबरोबर खालीलप्रमाणे कार्यक्रम घेतले…

१) पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम निश्चित करण्यासाठी विभागप्रमुखांची बैठक. २) पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांची बैठक. ३) पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम जाहीर करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स. ४) पल्स पोलिओ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी तालुकानिहाय बैठका. ५) मुख्य कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सर्व पोलिओ टीमसोबत बैठक. ६) लसीकरणाच्या दिवशी बालकाच्या तोंडात दोन थेंब टाकण्याचा कार्यक्रम इ.

अर्थात, थोड्याच दिवसांत जिल्हा आरोग्य अधिकारी हे या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गळ्यातले ताईत बनले नसते तरच नवल! तर शासकीय कारभारात भूमिपूजन, उद्घाटन, अनावरण, शिलान्यास असे कार्यक्रम आलटून पालटून सतत सुरू असतात. एकाच इमारतीच्या किंवा वास्तूच्या कारकिर्दीमध्ये आणि त्याच त्या योजना अथवा प्रकल्पाच्या वाट्याला वारंवार येणारे हे सोहळे प्रत्येक वेळी तितक्यात उत्साहात पार पडतात. एकूणच प्रशासनाच्या सर्व स्तरांमध्ये वर्षभर कुठं ना कुठं कार्यक्रम, उद्घाटन अन् पुन्हा उद्घाटनाचा घोष दुमदुमत असतो!

(संपर्कः shekharsatbara@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments