Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या हिश्श्याचे किस्से: कादर खान यांच्या आईने एका अपशकुनाला घाबरून त्यांना काबूलहून...

माझ्या हिश्श्याचे किस्से: कादर खान यांच्या आईने एका अपशकुनाला घाबरून त्यांना काबूलहून मुंबईला आणले

माझ्या हिश्श्याचे किस्से: कादर खान यांच्या आईने एका अपशकुनाला घाबरून त्यांना काबूलहून मुंबईला आणले

[ad_1]

रूमी जाफरी I बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कादरभाई माझ्याकडे बघून म्हणाले की, इथे अनेकांना एखाद्या मोठ्या लेखकाचा सहायक म्हणून खूप वर्षे काम करावं लागतं तेव्हा कुठं चित्रपटात संधी मिळते. तू नशीबवान आहेस की कोणासोबत सहायक म्हणून काम न करता तुला कथेसाठी क्रेडिट मिळते आहे. तू याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल…

माझ्या हिश्श्याच्या आजच्या किश्श्यांमध्ये मी कादर खान यांच्याबद्दल सांगणार आहे. कारण आज २२ ऑक्टोबर हा त्यांंचा जन्मदिवस आहे. २२ ऑक्टोबर १९३७ ला अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये त्यांचा जन्म झाला. कादर खान यांनी स्वत: मला सांगितले होते, ‘आईला माझ्या आधी दोन मुले झाली होती, पण ती चार वर्षांची होताच त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. मी चार वर्षांचा होणार होतो, त्या वेळी आईला असे वाटले की, आता मीसुद्धा जगणार नाही. त्यामुळे हे शहर आणि हा देश माझ्या मुलांसाठी ठीक नाही, अशी तिची मानसिकता झाली आणि तिने ते शहर, देश सोडण्याचा हट्ट धरला. मग आई-वडील मला घेऊन हिंदुस्थानात मुंबईला आले. सुदैवाने मुंबई मला लाभली. इथं मी स्थिरावलो, वाचलो आणि यशस्वीही झालो.’

कादरभाई यांच्यासोबतच्या माझ्या पहिल्या भेटीची आठवण खूप रंजक आहे. मी तेव्हा नुकतेच काही लिहू लागलो होतो. त्यादरम्यान मी एक गोष्ट लिहिली होती, जी दिग्दर्शक आणि निर्माते जगदीश सिडाना यांना खूप आवडली होती. त्यामुळे मी त्यावर पटकथा लिहायला सुरुवात केली. जगदीश सिडाना म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री पद्मा खन्ना यांचे पती. त्यानंतर मी त्या गोष्टींवर पटकथा लिखाणास सुरुवात केली. जगदीशजींनी मला सुरुवातीलाच सांगितले की, संवाद कादर खान साहेब लिहितील, ते माझे गुरू आहेत. आपल्याला कादरभाईंसोबत काम करण्याची संधी मिळणार म्हणून मीही आनंदात होतो. हे माझे पहिलेच काम असल्यामुळे मी खूप मन लावून पटकथा लेखन केले. नंतर चित्रपटाची ही कथा ऐकवण्यासाठी मी कादरभाईंना भेटायला गेलो. मला भेटल्यावर ते खूप खुश झाले. ते म्हणाले, की तू खूप लहान आहेस, पण कामाला लवकर सुरुवात केलीस. त्यांनी केलेल्या कौतुकामुळे मलाही आनंद झाला. एका उमेदीतील तरुण लेखकाच्या संहितेचं कादर खान यांच्यासारख्या मोठ्या माणसाने कौतुक केले, तर त्या लेखकाचा आत्मविश्वास किती वाढू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही. असो.

पुढे चित्रपटाच्या मुहूर्ताचा दिवस निश्चित झाला. या मुहूर्ताच्या आधी माझ्या मोठ्या भावाचं भोपाळ इथे लग्न होणार होतं. त्यामुळे मी भोपाळला िनघून गेलो. भावाचं लग्न झाल्यावर थेट मुहूर्ताच्या दिवशी मी मुंबईला परतलो आणि तयार होऊन जुहूच्या इस्कॉन हॉल इथे होणाऱ्या मुहूर्ताला पोहोचलो. मी रिक्षातून उतरून आत हॉलमध्ये गेलो, तर मला दिसले की, तिथे एक मोठा बॅनर लावलेला होता. चित्रपटाचं नाव होतं – ‘हम अनाडी हंै’. मुख्य भूमिकेत आयेशा जुल्का, अरमान कोहली आणि नसरुद्दीन शहा होते. चित्रपटाच्या बॅनरवर माझे नाव केवळ कथा या अंतर्गत झळकलेले होते. संवादामध्ये कादर खान यांचे आणि पटकथेपुढे दुसऱ्याच कुणाचे तरी नाव होते. ते पाहून मला धक्का बसला. मी याविषयी बोलण्यासाठी

जगदीशजींकडे गेलो, पण ते शुभेच्छा स्वीकारण्यात गुंतलेे होते. मी त्याबद्दल त्यांना तीन-चार वेळा विचारले, तेव्हा ते माझ्याशी कोरडेपणाने वागले. मी घरी आलो, पण मला झोपच येत नव्हती. सकाळ होताच मी त्यांचे घर गाठले, तर ते मला म्हणाले, ज्यांचे नाव दिले आहे, ते खूप वरिष्ठ आणि मोठे लेखक आहेत. त्यांनी खूप हीट चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. आज त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे, अशावेळी आपण त्यांना काम देणार नाही तर कोण देईल? मी म्हणालो की, त्यांनी चांगलं काम करून स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण माझी तर ही सुरुवात आहे ना? माझे असे नुकसान करून तुम्ही त्यांचे भले का करीत आहात? माझे हे बोलणे जगदीशजींना पटले नाही. मग मी कादर खान यांच्याकडे गेलो. कादरभाईंना म्हणालो, कादरजी मी तुम्हाला पूर्ण कथा ऐकवली होती. पटकथादेखील मी लिहिली आहे, तरीही ते मला केवळ कथेचे क्रेडिट देत आहेत…

मग कादरभाईंनी मला विचारले, ‘रूमी, तू कोणाचा सहायक म्हणून काम केले आहेस का?’ मी म्हणालो, ‘कोणाचाही नाही.’ मग विचारलं, ‘दिग्दर्शनात सहायक म्हणून काम केलंस कधी?’ मी म्हणालो, ‘नाही.’ त्यांनी परत विचारलं, ‘मग कुणा लेखकाला साहाय्य केलं आहेस?’ मी उत्तरलो, ‘मी कुणा लेखकाला साहाय्य केलेलं नाही.’ माझ्या त्या उत्तरावर कादरभाईंनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की, इथे अनेकांना एखाद्या मोठ्या लेखकाचा सहायक म्हणून खूप वर्षे काम करावं लागतं तेव्हा कुठं चित्रपटात संधी मिळते. तू नशीबवान आहेस की कोणासोबत सहायक म्हणून काम न करता तुला कथेसाठी क्रेडिट मिळते आहे. तू याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल. अर्धा ग्लास रिकामा आहे हे नको पाहू. अर्धा ग्लास भरलेला आहे याकडे लक्ष दे. पटकथेचे क्रेडिट तुला मिळाले नाही म्हणून निराश होण्याऐवजी कथेचे क्रेडिट तुला मिळाले आहे याचा विचार कर. कादरभाई आपल्या अनुभवाचा हवाला देऊन म्हणाले की, या इंडस्ट्रीमध्ये भांडण करणारी माणसं पुढे जाऊ शकत नाहीत. तू अजून या क्षेत्रात नवा आहेस. तू भांडण केलंस, कोर्ट केस केली, तर इंडस्ट्रीतील लोक म्हणतील की, हा मुलगा चांगला आहे, लिहितोही चांगलं, पण भांडकुद‌‌ळ आहे. आणि मग एवढ्या गोष्टीमुळे लोक तुझ्यापासून दुरावतील. एक वेळ कामाच्या गुणवत्तेत कमी-जास्त झालेलं इथं चालतं, पण माणूस मात्र उन्नीस-बीस असून चालत नाही.

कादरभाईंचे ते अनुभवाचे बोल मी मनाशी पक्के बांधून ठेवले आहेत आणि आजपर्यंत त्याप्रमाणेच काम करतो आहे. त्या दिवसापासूनच माझ्यात आणि कादरभाईंमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण झालं, ते माझ्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम करू लागले. त्यांचे निधन ३१ डिसेंबरला टोरँटोमध्ये झाले. मी त्यांना खांदा देऊ शकलो नाही ही सल मला आयुष्यभर राहील. यावर मला कासिम इमाम यांचा एक शेर आठवतो आहे…

जुड़ा हुआ जो शख़्स

उसकी बात ही अजीब थी,

बिछड़ गया जो रास्ता

वो ही सफ़र की जान था।

कादरभाई अभिनय आणि संवादलेखन या दोन्ही गोष्टी करायचे हे सगळ्यांना माहिती आहे. आपण चित्रपटाचे संवाद लिहिणार असू तर त्यामध्ये भूमिकाही करू या आग्रहापोटी त्यांनी ‘ख़ुदा गवाह’ हा चित्रपट सोडला होता. मी एवढा नशीबवान आहे की, कादरभाईंना मी आणि माझं काम इतकं आवडायचं की, मी लिहिलेल्या २० चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यावेळी माझं कौतुक करताना ते म्हणाले होते की, स्वत: लिहिलेले संवाद उच्चारून मी कंटाळलो आहे. तू लिहिलेले संवाद म्हणतो तेव्हा जिभेला काही नवीन बोलल्याचं, नव्या शब्दांची चव चाखल्याचं समाधान मिळतं. खूप छान वाटतं.

कादरभाईंनी शबाना आझमी यांच्यासोबत ‘शमा’ नावाच्या एकमेव चित्रपटाची निर्मिती केली होती. त्या चित्रपटातील हे गाणे ऐका…

चांद अपना सफ़र

ख़त्म करता रहा,

शमा जलती रही,

रात ढलती रही।

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments