Tuesday, October 6, 2026
Homeसातारासातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसले, नितीन पाटील यांची बिनविरोध...

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसले, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसले, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

सातारा, प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाची घडामोड घडली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि राज्यसभा खासदार नितीन पाटील यांची संबंधित मतदारसंघातून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे २१ संचालक पदांच्या निवडणुकीत महायुतीच्या गोटात सुरुवातीच्या दोन जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १७५ उमेदवारांनी एकूण २३६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत सात प्रमुख उमेदवारांच्या अर्जांवर हरकती नोंदवण्यात आल्या. यामध्ये जिल्हा बँकेचे माजी संचालक नितीन पाटील, अनिल देसाई, नितीन भरगुडे-पाटील, रूपाली राजपुरे, राजेंद्र राजपुरे, प्रवीण धसके आणि संजय मोरे यांचा समावेश होता. या हरकतींवर दिवसभर सुनावणी झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार सुद्रिक यांनी निर्णय राखून ठेवला होता.

दरम्यान, वाई सोसायटी मतदारसंघातून नितीन पाटील यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने त्यांची संचालकपदी बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे वृत्त आहे.

गृहनिर्माण व दुग्धसंस्था मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधातील उमेदवार ज्ञानेश्वर पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने उदयनराजे भोसले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. पवार यांनी छत्रपतींच्या गादीचा मान आणि यापूर्वीची परंपरा कायम ठेवण्यासाठी माघार घेतल्याचे वृत्त आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच अनेक मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आगामी माघारीच्या कालावधीत कोण कोण उमेदवारी कायम ठेवणार आणि कोण माघार घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार ६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २२ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. १ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सध्या दोन प्रमुख नेत्यांच्या बिनविरोध निवडीने निवडणुकीतील समीकरणांना सुरुवात झाली असून, उर्वरित मतदारसंघांमध्ये माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments