Tuesday, October 6, 2026
Homeफलटणफलटणमध्ये १४ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; जादूटोण्याच्या नावाखाली भीती दाखवल्याचा आरोप

फलटणमध्ये १४ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; जादूटोण्याच्या नावाखाली भीती दाखवल्याचा आरोप

फलटणमध्ये १४ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; जादूटोण्याच्या नावाखाली भीती दाखवल्याचा आरोप

फलटण :- फलटण शहरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली भीती निर्माण करून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध पॉक्सो कायद्यासह महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सौरभ नाना मदने (रा. बुधवार पेठ, फलटण) याची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी ओळख होती. मुलीच्या अंगात भूत शिरल्याचे सांगत त्याने जादूटोणा करून ते दूर करण्याचा बनाव केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने निरगुडी परिसरातील एका जुन्या घरात नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तेथे आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिल्याचेही पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतर भीती आणि बदनामीच्या धास्तीने मुलगी घरातून निघून वाई येथे गेली. तेथे एका अनोळखी व्यक्तीने तिला वाई पोलीस ठाण्यात आणून दिल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर मुलीने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितल्याचे समोर आले.

या माहितीच्या आधारे पीडितेच्या आईने फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयिताविरुद्ध पॉक्सो कायदा, महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments