सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात राजकीय वातावरण तापले; अजित पवारांच्या आठवणींना उजाळा
बारामती, प्रतिनिधी : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित करत निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र केला आहे.
पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे झालेल्या प्रचारसभेत जय पवार यांनी सोमेश्वर कारखान्याची निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन बिनविरोध करण्यासाठी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. उमेदवारांची यादी आणि जागावाटपावरून मतभेद निर्माण झाल्याचे सांगताना, “दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?” असा थेट सवाल त्यांनी पुरुषोत्तम जगताप यांना केला.
अजित पवारांच्या आठवणीने जय पवार भावूक
प्रचारसभेत जय पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. “दादांचा फोटो बघून मन भरून येतं,” अशी भावना व्यक्त करत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नाझरे-सुपे परिसरातील प्रचारसभेत बोलताना, “दादा नसताना अशा प्रचारसभा घ्याव्या लागतील, असे आयुष्यात कधीच वाटले नव्हते,” असे म्हणत जय पवार भावूक झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असतानाही जबाबदारी स्वीकारून निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागल्याचे त्यांनी नमूद केले.
‘सोमेश्वर कारखाना कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही’
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा कोणत्याही एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची वैयक्तिक मालमत्ता नसून हजारो सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकाराचा वारसा आहे, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली.
कारखान्याचा विकास, आर्थिक शिस्त, सभासदांचे हित आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणे हेच केंद्रस्थानी असले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या नावावरूनही वाद
दरम्यान, सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात दिवंगत अजित पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करण्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. जय पवार यांच्या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला प्रचार साहित्यामध्ये अजित पवारांचे नाव व छायाचित्र वापरण्याबाबत निर्देश दिल्याचे वृत्त आहे. या निर्णयावर जगताप यांनी पुनर्विचाराची मागणी केली आहे.
२१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालक जागांसाठी निवडणूक होत असून ११ ऑक्टोबर रोजी मतदान, तर १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विविध पॅनेलच्या प्रचाराला वेग आला असून पवार कुटुंबाशी संबंधित राजकीय समीकरणांमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जय पवार यांच्या ताज्या वक्तव्यामुळे पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मतदानाच्या अंतिम टप्प्यात सभासद कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
