मोठी घरं नव्हे, माणसांमधील नाती मोठी हवीत – आयु. बाबासाहेब जगताप
फलटण : पवारवाडी येथे कालकथित बबन दामू भोसले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे विधी संचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप यांनी केले, तर भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी धम्मप्रवचनातून मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आयु. बाबासाहेब जगताप म्हणाले, “जीवनामध्ये धम्माचा विचार आचरणात आणून आई-वडिलांचे महत्त्व ओळखले पाहिजे. आई-वडील आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी रक्ताचे पाणी करून त्यांना शिक्षण आणि चांगले संस्कार देतात. त्यामुळे त्यांच्या उतारवयात त्यांची सेवा करणे, काळजी घेणे आणि औषधोपचार करणे ही आपली जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. पूर्वी घरं छोटी होती; मात्र माणसं माणसात होती. आता घरं मोठी झाली, पण माणसं एकमेकांपासून दुरावत आहेत. ही दुरावलेली नाती पुन्हा जोडायची असतील, तर धम्माचे विचार आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. मोठी घरं नव्हे, तर माणसांमधील नाती मोठी असणे महत्त्वाचे आहे.”
धम्मप्रवचनात आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी धम्मदानाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, “तथागतांना विचारलेल्या चार प्रश्नांपैकी ‘जगामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणते?’ हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तथागतांच्या शिकवणीत धम्मदानाला विशेष महत्त्व आहे. भौतिक दानाचे महत्त्व असले तरी त्याचा परिणाम मर्यादित असतो; धम्मदान मात्र माणसाला दुःखातून मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाते.”
बौद्ध परंपरेतील दानशूर उपासक-उपासिकांचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, केवळ भौतिक वस्तूंचे दान करण्यापेक्षा धम्माचा विचार आत्मसात करून विमुक्तीच्या मार्गावर वाटचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे. तथागत बुद्धांनी आपल्या पुत्र राहुल यालाही लहान वयात धम्ममार्गाकडे वळवले. त्यामुळे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ असलेले धम्मदान स्वीकारून कुशल कर्माचा संचय करावा, असे आवाहन त्यांनी केले.
विधी संचालन करताना आयु. महावीर भालेराव यांनी कुशल व अकुशल कर्माचे महत्त्व स्पष्ट केले. “मानवी जीवनात प्रत्येकाच्या हातून कुशल आणि अकुशल अशी दोन प्रकारची कर्मे घडत असतात. त्यामुळे धम्माचे आचरण करून कुशल कर्माचा संचय करावा. आई-वडिलांची सेवा करणे हेही कुशल कर्माचाच भाग आहे. त्यांच्या अन्न, निवास, औषधोपचार आणि आवश्यक गरजा पूर्ण करून त्यांची सेवा करणे ही आपली जबाबदारी आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार आचरणात आणून जीवन मंगलमय करावे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी आयु. अमोल भोसले, रमेश भोसले व हणमंत भोसले यांच्या कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा वृक्ष व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासोबतच वाचन संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने पुस्तक भेट देऊन बबन दामू भोसले यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास आयु. भीमराव लोंढे, अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका; माजी सरचिटणीस विठ्ठल निकाळजे; माजी संस्कार सचिव बजरंग गायकवाड; प्रचार-पर्यटन माजी उपाध्यक्ष रामचंद्र मोरे; संघटक आनंद जगताप; गायक एल. एन. निकाळजे; माजी तालुका संघटक आयु. राजेंद्रकुमार गायकवाड; आयुनि. छाया गायकवाड, आयुनि. पारिजातका जगताप, आयुनि. योगिता घोरपडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच डॉ. इंद्रजीत भोसले, डॉ. रोहित शिंदे, डॉ. नवनाथ डोंबाळे, डॉ. प्रवीण बाराते, निवासी आश्रमशाळा निंबोरेचे संचालक मुरलीधर सावंत, पवारवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल जाधव, ग्रामसेवक दादासाहेब गावडे, हनुमान भोसले सर, मारुती केंगार, अंगणवाडी सेविका व कर्मचारी, महावितरण बेडके वस्ती उपकेंद्राचे कर्मचारी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय हरी करचे, पेंटिंग-प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर, कात्रज पुणे; अनिल भाऊसो भोसले, इलेक्ट्रिशियन इंजिनियर, आयटीआय कंपनी, हिंजवडी पुणे; विशाल हरिश्चंद्र शिंदे, फौजी, सातारा; सचिन शिद्रुक, पीएमटी बस कंडक्टर, हडपसर पुणे; मच्छिंद्र साहेबराव ढवळे, निकिता इंटरप्राईजेस, भोसरी पुणे एमआयडीसी; संपत हनुमंत भोसले, डॉक्टर, भोर पुणे; राजेंद्र शिवाजी सकुंडे, सुपरवायझर, सुबोधन इंजिनिअरिंग प्रा. लि., बारामती एमआयडीसी; राहुल भास्कर भोसले, कृषी सहाय्यक, बारामती पुणे; तसेच प्रहार अपंग क्रांती संघटना शाखा फलटणचे अध्यक्ष सागर दादा गावडे, राजेंद्र फाळके व पदाधिकारी, जिल्हा परिषद केंद्र शाळा वडूजचे केंद्रप्रमुख आयुष्यमान राजेंद्र शिवाजी भोसले सर आणि माजी सरपंच सुहास (आप्पा) पवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमातून कालकथित बबन दामू भोसले यांच्या स्मृतीला अभिवादन करताना धम्माचरण, आई-वडिलांची सेवा, कुशल कर्म, पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृती यांचा संदेश देण्यात आला.
