श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये साकारला केदारनाथ मंदिराचा भव्य देखावा
फलटण | प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एस.एस.ई.एम.एस.), जाधववाडी येथे गणेशोत्सवानिमित्त यंदा केदारनाथ मंदिराची भव्य व आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून साकारलेला हा देखावा गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
शाळेत दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या प्रतिकृती साकारण्याची परंपरा आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, कला, वास्तुकला, श्रमप्रतिष्ठा आणि सृजनशीलतेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी साकारण्यात आलेली केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली आहे. मंदिराची रचना, बाह्य स्वरूप आणि सजावट यामध्ये बारकाईने लक्ष देण्यात आले असून, उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून हा देखावा साकारण्यात आला आहे.
या भव्य देखाव्याची माहिती विधान परिषदेचे मा . सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली . यावेळी निकम सर, शाळेच्या प्राचार्या सौ. मीनल दीक्षित, उपप्राचार्या सौ. भोसले मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
केदारनाथ मंदिराचा भव्य देखावा माहिती घेऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला, कल्पकता, श्रम आणि भारतीय सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी, या उद्देशाने शाळेत दरवर्षी अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
केदारनाथ मंदिराच्या या भव्य प्रतिकृतीमुळे जाधववाडी परिसरासह फलटण शहरातील पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेटी दिल्या
