Wednesday, September 23, 2026
Homeफलटणफलटण शहर पोलिसांचा नागरिकांना सायबर सुरक्षेचा इशारा

फलटण शहर पोलिसांचा नागरिकांना सायबर सुरक्षेचा इशारा

फलटण शहर पोलिसांचा नागरिकांना सायबर सुरक्षेचा इशारा

OTP, UPI PIN, QR कोडपासून ‘डिजिटल अरेस्ट’पर्यंतच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

फलटण, दि. २३ : डिजिटल तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन बँकिंग, UPI व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे नवनवीन प्रकारही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, सायबर फसवणूक टाळण्यासाठी विविध महत्त्वाच्या सुरक्षा सूचना दिल्या आहेत.

बँक अधिकारी, पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा दूरध्वनीवरून नागरिकांकडून OTP, ATM PIN, UPI PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती मागत नाही. त्यामुळे अशा प्रकारची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये. पैसे मिळविण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची किंवा UPI PIN टाकण्याची आवश्यकता नसते. UPI PIN हा प्रामुख्याने पैसे पाठविण्याच्या व्यवहारासाठी वापरला जातो, याची नागरिकांनी विशेष नोंद घ्यावी.

KYC आणि वीज बिलाच्या नावाखाली फसवणुकीचा धोका

KYC अपडेट करण्याच्या नावाखाली, वीज बिल थकीत असल्याचे सांगून, पार्सल अडकल्याचे कारण देऊन किंवा बँक खाते बंद करण्याची धमकी देऊन नागरिकांना फोन अथवा संदेश पाठविले जातात. अशा संदेशांमधील अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. कोणतेही अॅप डाउनलोड करण्यास सांगितल्यास अथवा स्क्रीन शेअर करण्याचा आग्रह केल्यास विशेष सावधगिरी बाळगावी.

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली आर्थिक फसवणूक

पोलीस, CBI किंवा ED अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना घाबरविणे आणि त्यानंतर पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीला ‘डिजिटल अरेस्ट’ असे संबोधले जाते. पोलीस किंवा इतर तपास यंत्रणा ऑनलाइन व्हिडिओ कॉलद्वारे अटक करून पैशांची मागणी करत नाहीत. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरून कोणत्याही खात्यावर पैसे पाठवू नयेत.

सोशल मीडियावरही सावधगिरी आवश्यक

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना काळजी घ्यावी. स्वतःचे फोटो, मोबाईल क्रमांक, घराचा पत्ता, आधार किंवा इतर वैयक्तिक कागदपत्रांची माहिती अनोळखी व्यक्तींना ऑनलाइन पाठवू नये. ज्येष्ठ नागरिकांनी बँक खाते, ATM आणि ऑनलाइन बँकिंगशी संबंधित माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवावी. संशयास्पद फोन किंवा संदेश प्राप्त झाल्यास तातडीने कुटुंबीयांशी किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन सुरक्षिततेची काळजी घ्यावी

ऑनलाइन चॅटिंग, गेमिंग किंवा सोशल मीडिया वापरताना विद्यार्थ्यांनी स्वतःची वैयक्तिक माहिती तसेच शाळा, कुटुंब किंवा मित्रांशी संबंधित संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करा

सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास घाबरून न जाता वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवावी आणि जवळच्या पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा.

ऑनलाइन व्यवहार करताना ‘सावधगिरी हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी’ असून, कोणत्याही संशयास्पद फोन, लिंक किंवा संदेशाला प्रतिसाद देण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याचे आवाहन फलटण शहर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments