दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनाला बळ; फलटण तालुक्यात दुचाकी मोटरसायकलींचे वाटप
फलटण | प्रतिनिधी : पंचायत समिती, फलटण यांच्या सेस फंडातून तसेच विशेष प्रयत्नांतून फलटण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दुचाकी मोटरसायकलींचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती फलटण येथे झालेल्या या कार्यक्रमातून दिव्यांग बांधवांना स्वावलंबन, आत्मविश्वास आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी नवी दिशा मिळणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनातील प्रवासासाठी तसेच रोजगार, व्यवसाय आणि विविध शासकीय कामांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर दुचाकी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम त्यांच्या गतिशीलतेला चालना देणारा ठरणार आहे. या माध्यमातून दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.
यावेळी बोलताना, समाजातील प्रत्येक घटकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि कोणालाही विकासाच्या प्रवाहापासून वंचित ठेवू नये, ही भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले.
दुचाकी मिळाल्यानंतर दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या प्रतिक्रियांमधून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले. स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी या दुचाकी उपयुक्त ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार सचिन पाटील, सभापती कु. शिवांजली भोसले, गटविकास अधिकारी अक्षय घावटे, जिल्हा परिषद सदस्य विष्णु लोखंडे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सौ. वनिताताई आढाव, सौ. शुभांगीताई शिंदे, विकास नाळे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित लाभार्थी उपस्थित होते.
