
अस्थी विसर्जनाऐवजी शेतात बोधीवृक्षाचे रोपण; जगताप परिवाराने जपला धम्ममय पर्यावरण संवर्धनाचा आदर्श
फलटण : कालकथित तात्याबा बापू जगताप यांच्या अस्थी विसर्जनाचा पारंपरिक मार्ग न स्वीकारता त्यांच्या अस्थी शेतामध्ये खड्डा खोदून ठेवून त्यावर पिंपळाच्या रोपाचे, बोधीवृक्षाचे रूपाने वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचे संगोपन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम जगताप परिवाराच्या वतीने राबविण्यात आला.
यानंतर आयोजित पुण्यानुमोदन कार्यक्रमातील सर्व विधी भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली व बौद्धाचार्य म्हणून करण्यात आले. यावेळी त्यांनी वर्षावास म्हणजे काय, भगवान गौतम बुद्धांचा कर्मसिद्धांत आणि बौद्ध जीवनपद्धती याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना आयु. महावीर भालेराव म्हणाले, “घरातील एखादी व्यक्ती काल झाली की तिच्या स्मृती जपण्यासाठी एक वृक्ष लावावा. वयोवृद्ध आई-वडिलांची सेवा करावी. आपण आज त्यांची सेवा केली तर उद्या आपली मुलेही आपली सेवा करतील. हा कर्मसिद्धांत प्रत्येकाच्या जीवनात लागू होतो.”
जगताप परिवाराने यापूर्वीही समाजासमोर आदर्श निर्माण करणारा उपक्रम राबविला होता. काल तात्याबा जगताप यांचे चिरंजीव आयु. तानाजी तात्याबा जगताप सर यांनी गेल्या वर्षी आई-वडिलांच्या जिवंतपणीच त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची मिरवणूक काढली होती. समाजातील विधवा महिलांच्या हस्ते आई-वडिलांचा पुष्पहाराने सत्कार करून त्या महिलांना साडी-चोळी देण्याचा स्तुत्य उपक्रमही त्यांनी राबविला होता. त्यामुळे जगताप परिवार धम्माच्या मार्गाने वाटचाल करणारा आणि सामाजिक परिवर्तनाचा आदर्श निर्माण करणारा परिवार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बायडाबाई मधुकर निकाळजे, सविता संजय गायकवाड, छाया बाळू मोरे, सरिता राजेश चव्हाण आणि राधा चंद्रकांत शिंदे या पाच मुलींच्या उपस्थितीत हा पुण्यानुमोदन कार्यक्रम पार पडला.
यावेळी भगवान गौतम बुद्ध कोण होते, त्यांनी मानवाला दुःखमुक्तीचा कोणता मार्ग सांगितला आणि तो मार्ग आचरणात आणण्याचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. “आचारो परमो धम्मो” या विचारानुसार आचरण शुद्ध करूनच खऱ्या अर्थाने बुद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करता येते, असा संदेश देण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत आयु. महावीर भालेराव यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र प्रत्येकाने आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिक्षणाला जीवनातील परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून बाबासाहेबांनी दिलेला “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” हा संदेश समाजाने आचरणात आणावा, असेही त्यांनी सांगितले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्ममार्गावर जो मार्गक्रमण करेल, त्याचे जीवन सुखाच्या दिशेने वाटचाल करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमातील सर्व विधी भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत पार पडल्या. कालकथित तात्याबा बापू जगताप यांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी उपस्थित बौद्ध उपासक-उपासिका व ग्रामस्थांनी बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांच्या धम्मप्रबोधनपर प्रवचनाचे श्रवण केले. त्यांच्या सुंदर व प्रेरणादायी मार्गदर्शनाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली. “भोजनदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अन्नाचा स्वीकार करावा,” असा संदेशही यावेळी देण्यात आला.
जगताप परिवाराने अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन, पालकसेवा, सामाजिक समता आणि धम्म आचरणाचा दिलेला संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरला.









