
श्रीक्षेत्र फलटण देवस्थान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला मोठे वळण; सहायक धर्मादाय आयुक्तांकडून सखोल चौकशीची शिफारस
फलटण | प्रतिनिधी
महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र फलटण येथील श्रीकृष्ण आबासाहेब मंदिर, आबासाहेब जन्मस्थान मंदिर व रंगशिळा देवस्थान ट्रस्ट (नोंदणी क्र. ए-732/सातारा) येथील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा विभाग यांनी सादर केलेल्या निष्कर्ष पत्रिकेत संबंधित विश्वस्तांकडून देवस्थानच्या मालमत्ता व निधीचा कथित अपहार आणि गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी आढळत असून त्यामुळे न्यासाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चौकशी अर्ज क्र. 82/2013 मधील अर्जदार व विरोधी पक्षकारांनी सादर केलेले लेखी-तोंडी पुरावे, कागदपत्रे आणि साक्षींचा विचार करून हा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. देवस्थानचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले, निधीचा कथित अपहार किती झाला आणि त्याचे स्वरूप काय आहे, याचा सविस्तर तपास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम 39 अंतर्गत पुढील चौकशी आवश्यक असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
निष्कर्ष पत्रिकेनुसार, संबंधित विश्वस्तांनी देवस्थानची जंगम व स्थावर मालमत्ता तसेच रोख निधी स्वतःच्या मालकीप्रमाणे वापरल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे देवस्थानच्या हिताचे रक्षण करण्यासाठी संबंधित विश्वस्तांना मालमत्तेबाबत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रतिबंध करण्याची तसेच देवस्थानची जंगम व स्थावर मालमत्ता कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करण्यास मनाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
याशिवाय देवस्थानला झालेल्या कथित नुकसानीबाबत संबंधित विश्वस्तांविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील कलम 41-एफ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्याची शिफारस करण्यात आली आहे. संबंधित विश्वस्तांना पदावरून दूर करण्यासाठी कलम 41-ड अंतर्गत कार्यवाही सुरू करून, त्या कालावधीत कलम 41-ई अंतर्गत मनाई आदेश लागू करण्याचाही प्रस्ताव निष्कर्ष पत्रिकेत नमूद करण्यात आला आहे.
देवस्थानच्या मालमत्तेवरील कब्जे, बोजे व हस्तांतरणाबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविणे तसेच देवस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही निष्कर्ष पत्रिकेत देण्यात आले आहेत. ही निष्कर्ष पत्रिका सहायक धर्मादाय आयुक्त, सातारा विभाग यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रकरणात अर्जदार म्हणून बाळकृष्ण दिगंबर मठपती, सुरेश सिन्नाप्पा मठपती, दिलीप गंगाधर मठपती, रमेश चंद्रकांत मठपती आणि दिलीप संपतराव मठपती यांनी चौकशी अर्ज दाखल केला होता. तर शामसुंदर दामोदर विद्वांस (शास्त्री), दगडोबा अंतोबा शिंदे, सुदामबुवा गुरु शेवंताबाई विद्वांस आणि किसन रुस्तम शिंदे यांच्याविरुद्ध ही कार्यवाही करण्यात आली असून, अर्जदारांची बाजू अॅड. अनिस शेरख यांनी मांडली.










