पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

0
8
पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अस्थी संकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न

कालकथित पार्वती निवृत्ती भोसले यांच्या स्मरणार्थ बोधिवृक्षाचे रोपण; महावीर भालेराव यांचे समाजप्रबोधन

फलटण : कालकथित पार्वती निवृत्ती भोसले यांच्या अस्थी संकलन व पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे औचित्य साधून भोसले परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ बोधिवृक्षाचे रोपण करण्यात आले. अस्थी दफन करून त्यावर बोधिवृक्ष लावण्यात आला. पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

अस्थी संकलन व विधी भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेचे माजी अध्यक्ष तथा समाजप्रबोधनकार आयुष्यमान महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली व विधीने संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना, “कुटुंबातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिच्या स्मरणार्थ एक वृक्ष लावावा. आयुष्यभर ज्या आई-वडिलांची सावली आपल्यावर होती, त्यांच्या स्मृतीची सावलीही वृक्षाच्या रूपाने पुढील पिढ्यांना मिळावी,” असे आवाहन केले.
आई-वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणे हीच खरी आदरांजली आहे. त्यांच्या निधनानंतर केलेली सेवा व्यर्थ ठरते; त्यामुळे जिवंतपणीच आई-वडिलांची मनोभावे सेवा करा, असा संदेशही महावीर भालेराव यांनी दिला.

भगवान गौतम बुद्धांच्या धम्मातील दुःखमुक्तीचा मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे स्वीकारलेला धम्म प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे महत्त्व त्यांनी समाजबांधवांना समजावून सांगितले. “आचारो परमोधम्म” धम्माचे आचरण हाच सर्वोत्तम धम्म आहे, हा विचार त्यांनी अधोरेखित केला.

कालकथित पार्वती निवृत्ती भोसले यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आलेले बोधिवृक्षाचे रोपण हे पर्यावरण संवर्धनाबरोबरच आईच्या प्रेमाची व मायेच्या सावलीची आठवण जपणारे ठरले.
या कार्यक्रमास भोसले परिवारातील आयु. सिद्धार्थ निवृत्ती भोसले (कृषी अधिकारी, मलवडी, ता. माण), आयु. गौतम निवृत्ती भोसले (ग्राम रोजगार सेवक, राजाळे), आयु. शांता कांतीलाल दणाणे तसेच भोसले परिवारातील सदस्य, नातेवाईक व समाजबांधव उपस्थित होते.

अस्थी संकलन, पुण्यानुमोदन व आदरांजलीचा कार्यक्रम बौद्ध धम्मातील करुणा, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत संपन्न झाला.