
पहिल्याच प्रयत्नात आणि अत्यंत कमी वयात घवघवीत यश; तावडी गावासह फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण
फलटण, प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील तावडी येथील कु. शिवांजली रणधीर भोसले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) वर्ग-२ पदाच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. खुल्या प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात ३८ वा क्रमांक मिळवत तिने आपल्या कुटुंबाचा, गावाचा आणि फलटण तालुक्याचा मान उंचावला आहे.
विशेष म्हणजे, शिवांजलीने हे यश अत्यंत कमी वयात आणि पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे. तिच्या मेहनतीचा, सातत्यपूर्ण अभ्यासाचा आणि जिद्दीचा हा गौरवशाली परिणाम मानला जात असून, या यशामुळे तावडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवांजलीच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल रणधीर भोसले व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, कु. शिवांजली रणधीर भोसले हिला भविष्यातील शासकीय सेवेत उज्ज्वल कारकीर्द घडो, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.










