फलटणच्या जनतेसाठी संघर्ष थांबणार नाही”; श्रीराम कारखान्याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची स्पष्ट भूमिका

0
8
फलटणच्या जनतेसाठी संघर्ष थांबणार नाही”; श्रीराम कारखान्याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची स्पष्ट भूमिका

फलटण | प्रतिनिधी

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यावरून फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “मी वयाच्या ७९व्या वर्षीही खचलेलो नाही. फलटणच्या जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत कारखाना आणि सहकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, श्रीराम सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू व्हावा यासाठी कारखान्याच्या नावे कर्ज उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी सभासदांनी थकीत शेअर्स पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही पाठिंबा देत स्वतःचे शेअर्स पूर्ण करण्याची घोषणा केली आहे.

ते पुढे म्हणाले की, आपला कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक विरोध नसून सहकाराला बाधा आणणाऱ्या आणि दुसऱ्यांचे नुकसान करून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या प्रवृत्तीला विरोध आहे. विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

फलटण दहशतमुक्त करणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगत, श्रीराम कारखाना सुरू होऊ नये यासाठी काही जणांकडून सातत्याने अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचेल असे निर्णय होऊ नयेत, असा संदेश आपण मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी प्रल्हादराव साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर आणि विश्वासराव भोसले यांच्या भूमिकेवरही टीका केली.

दरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, शेअर्स पूर्ण करण्याबाबत विरोधकांकडून होत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. श्रीराम हा तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असून, राज्यातील साखर उद्योग सध्या आर्थिक अडचणीत आहे. प्रशासन आणि सभासदांनी मिळून काढलेल्या सुवर्णमध्याला विरोधकांनी स्थगिती आणल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

भागीदारी तत्त्वावर कारखाना चालवला तरी त्याचे सहकारी स्वरूप कायम राहते. कारखान्याचे खाजगीकरण होत असल्याचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. सहकाराची भाषा करणाऱ्यांनी स्वतःचे खाजगी कारखाने का सुरू केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सर्व घडामोडींमुळे कामगार, ऊस उत्पादक, ऊसतोड मजूर आणि वाहतूकदार यांच्यावर संकट ओढवल्याचे त्यांनी नमूद केले.

श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले की, रामराजे यांच्या आवाहनाला सभासदांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेक सभासद थकीत शेअर्स पूर्ण करत आहेत. विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून भागीदारी प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. श्रीराम कारखाना यापुढेही सहकारी तत्त्वावरच चालवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.