म्हसवड–स्वारगेट एसटीची फलटण बसस्थानकासमोरील नव्या विद्युत खांबाला धडक; खांब कोसळला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

0
17

फलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरातील एसटी बसस्थानकासमोर नुकतेच बसविण्यात आलेल्या नवीन पथदिव्याच्या खांबाला म्हसवड–स्वारगेट मार्गावरील एसटी बसची धडक बसल्याने खांब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड–स्वारगेट ही एसटी बस फलटण बसस्थानक परिसरातून मार्गक्रमण करत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने बसचा धक्का नव्याने उभारण्यात आलेल्या पथदिव्याच्या लोखंडी खांबाला बसला. धडक इतकी जोरदार होती की खांब जागेवरून वाकून खाली कोसळला.

घटना घडली त्यावेळी परिसरात प्रवासी आणि नागरिकांची वर्दळ होती. मात्र, सुदैवाने खांब कोणावरही न पडल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनेनंतर काही काळ परिसरात वाहतूक आणि नागरिकांची गर्दी झाली.

नुकतेच शहर सुशोभीकरण आणि रस्ते प्रकाशयोजनेसाठी बसविण्यात आलेल्या पथदिव्याच्या खांबाचे नुकसान झाल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी बसस्थानक परिसरात मोठ्या वाहनांची सुरक्षित हालचाल होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.