
फलटणकरांना लवकरच नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा; पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी नगरपरिषदेचे युद्धपातळीवरील काम
फलटण | प्रतिनिधी. फलटण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तसेच आगामी १७ जुलै रोजी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, नियोजन समितीचे सभापती संदीप चोरमले, नगरसेवक अमित भोईटे तसेच अमोल सस्ते, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून चोवीस तास सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. पावसाने ओढ दिल्यामुळे शहराला सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे (पाटील) जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहेत. येत्या महिनाभरात पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
फलटणकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे काम सुरू असून परिसर स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जात आहे. गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेल्या काही यंत्रणा आणि प्रणाली पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नियोजन समितीचे सभापती संदीप चोरमले म्हणाले की, पावसाअभावी एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असला तरी तो नियमित करण्यासाठी नगराध्यक्ष, पाणीपुरवठा विभागाचे सभापती राहुल निंबाळकर, अधिकारी आणि कर्मचारी २४ तास काम करत आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे (पाटील) यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमोल सस्ते यांनी सांगितले की, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या माध्यमातून यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी मिळाली असून त्यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्ते, पथदिवे आणि इतर मूलभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. नाना पाटील चौक ते कोळकीपर्यंत पथदिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून शहरातील अंतर्गत ड्रेनेज, भूमिगत वीजवाहिन्या (अंडरग्राउंड केबल), स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठीही नियोजन सुरू आहे.
सुमारे २५ लाख रुपयांच्या कामांचे टेंडर न काढता नगरपरिषदेच्या कामगारांमार्फतच ती कामे करून जनतेच्या पैशाची बचत करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील विविध विकासकामांवर लक्ष ठेवून आहेत. दिवाळीपर्यंत फलटण शहराच्या विकासाचे चित्र लक्षणीय बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहर हरित आणि सुंदर करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांची विविध प्रकारची झाडे खरेदी करण्यात येत असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ठिकाणी त्यांची लागवड केली जाणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध फलटण घडविण्यासाठी नगरपरिषद प्रामाणिकपणे प्रयत्नशील असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.










